Nagpur Municipal Corporation

जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमीत्य प्राविण्यप्राप्त विद्यार्थी सन्मानित

नागपूर, ता २० : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त प्रभाग क्र. २६ मधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना आमदार कृष्णा खोपडे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला विदर्भ प्रदेशचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रा. प्रमोद पेंडके, मंडळ अध्यक्ष महेंद्र राऊत, परिवहन सभापती बंटी कुकडे, नगरसेविका मनीषा कोठे, समिता चकोले, निरीक्षिका संध्या ठाकरे, प्रा. हर्षद घाटोळे, योगेंद्र शाहू, संत गोरा कुंभार समाज भवन समितीचे अध्यक्ष राजु खरे, प्रभाग २६ अ चे अध्यक्ष राजेश संगेवार, प्रभाग २६ ब चे अध्यक्ष प्रदीप निनावे, डॉ.हरीश राजगीरे, सैतराम सेलोकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक व विधी समितीचे सभापती ॲड धर्मपाल मेश्राम यांनी केले.
यावेळी प्रभागातील दहावी व बारावीमध्ये प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांना पालकांसह गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेश बारई, विलास कुराडे, रितेश तांगडे, विनोद बांगडे, विनोद कुट्टे, भुपेंद्र अंधारे, शिला वासमवार, सुनील आग्रे, दिनेश येवले, कल्पना सारवे, संगीता मोहरकर, कृष्णराव देशमुख, चंद्रशेखर पिल्ले, नारायणसिंह गौर, हिरालाल कमाले, मोनाली काथवटे, अभिजीत ठाकरे, मीनल चरपे, शेख मेहबूब, अशोक लेदे, रमेश दोनाडकर, किशोर धकाते, राम सामंत, सचिन भगत, प्रविण जगताप, लकी वराडे,संगीता कामडे आदींनी सहकार्य केले.
 

 

 

‘व्हाईस ऑफ विदर्भ’ची प्राथमिक फेरी आजपासून- ४ ऑगस्टला महाअंतिम फेरी

नागपूर, ता. २० : नागपूर महानगरपालिका व लकी इव्हेन्ट्स ॲण्ड म्युझिकल एंटरटेनमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस्‌ सोल्यूशन्स ॲन्ड सर्विसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ ऑगस्टला होणार असून उद्या शनिवारपासून प्राथमिक फेरीला सुरूवात होणार आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शनिवार व रविवारी (ता. २२) १४ वर्षावरील व १४ वर्षाखालील वयोगटासह ज्येष्ठ गायक कलावंतांनाही प्राथमिक फेरीमध्ये सहभागी होता येणार आहे. प्राथमिक फेरीचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते होणार आहे.
 
स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या ठरणाऱ्या कलावंतांना २१,००० रुपये प्रथम, ११,००० रुपये द्वितीय व ७००० रुपये तृतीय असे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी मनपाच्या क्रीडा समिती सदस्यांसह लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान, विजय चिवंडे आदी सहकार्य करीत आहेत. स्पर्धेला मानव सुधार प्रन्यास संस्थेसह आदित्य-अनघा बँक आणि युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन यांचे सहकार्य लाभले आहे. सदर स्पर्धेत विदर्भातील उदयोन्मुख कलावंतांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी ८८८८८९९३२१, ९७६४०२६३६५  या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

 

 

नागनदीच्या सौंदर्यीकरणाबाबतचा प्रस्ताव सप्टेंबरपर्यंत सादर करा – महापौर

एएफडी फ्रान्सच्या शिष्ट्यमंडळासोबत मनपा अधिका-यांची बैठक
 
नागपूर,ता.२०. नागनदीच्या दर्शनी भागातील सौंदर्यीकरणाबाबतचा प्रस्ताव सप्टेंबरपर्यंत महापालिकेला सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. महानगरपालिका आणि एफडी फ्रान्स यांच्यात शुक्रवारी (ता.२०) महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
 
यावेळी एनईएसडीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.झेड.सिद्दिकी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, उपअभियंता मोहम्मद ईजारईल, पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले, एएफडीचे पी.के.दास, समर्थ दास, सिबिला, जेसिक्स प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नागपूर महानगरपालिका, एएफडी फ्रान्स यांच्या साहाय्याने नाग नदीच्या दर्शनी भागाचे सौंदर्यीकरणाबाबतचा प्रस्ताव तयार करणार आहे. नागनदीच्या काठावरील 15 मीटर भागात नो डेव्हलपमेंट झोन तयार करण्यात येणार आहे. नागनदीच्या काठावर राहणा-या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनासाठी एएफडी फ्रान्स हे सहकार्य करणार असून या कामासाठी येणा-या खर्चाला त्यांनी या बैठकीत मान्यता दिली.  नाग नदीच्या काठावर राहणा-या अन्य घरे, संस्थाने, दुकाने यांचे पुनर्वसन महापालिका करणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख मोहम्मद ईजराईल यांनी दिली.
 
एएफडी फ्रान्स या प्रकल्पाअंतर्गत घरे, शैक्षणिक व्यवस्था, पर्यावरणीय व्यवस्था यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. नागनदीमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा, द्रव पदार्थ, फॅक्टरी वेस्ट टाकले जाणार नाही याबाबत मनपाने नवे धोरण तयार केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी या प्रकल्पाअंतर्गत केली जाणार आहे. एफडी ही संस्था फ्रान्स सरकार कडून मनपाला कर्ज मिळवून देण्याकरिता सहकार्य करणार असल्याची माहिती मोहम्म्द ईजारईल यांनी दिली.

 

 

बीपीएमएस करणार इमारत बांधकाम परवानगीचे काम सुलभ

स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचा विश्वास
 
मनपा आयुक्त व महापौर करणार आज शंकांचे निरसरण
 
नागपूर.२०.  केंद्र शासनाच्या सुलभ व्यवसाय उपक्रमा अंतर्गत राज्य सरकारने नगरपरिषद, महानगरपालिका व संबंधीत नियोजन प्राधिकरणे यांच्याकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणा-या विविध परवानगी प्रकरणात एकसुत्रता आणण्यासाठी अद्ययावत ‘बिल्डींग प्लान मॅनेजमेंट सिस्टीम’ (बीपीएमएस) पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल येत्या २५ जुलैपासून नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारकडून डिजिटल इंडियाचा नारा देण्यात येत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे अनेक कामांमध्ये वेळ वाचत आहे. इमारत बांधकाम परवानगीच्या कामासाठी बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या बीपीएमएस पोर्टलमुळे इमारत बांधकाम परवानगीचे कार्य अधिक सुलभ होईल व वेळही वाचेल, असा विश्वास मनपाचे स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी व्यक्त केला.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्यासाठी ‘महा-आयटी’ संस्थेच्या बीएमपीएस सॉफ्टवेअरचे शुक्रवारी (ता. २०) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात सादरीकरण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती श्री. कुकरेजा बोलत होते. याप्रसंगी स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, उपायुक्त राजेश मोहिते, नगररचनाकार श्रीकांत देशपांडे यांच्यासह शहरातील वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना श्री. कुकरेजा म्हणाले, राज्य शासनातर्फे ‘लाँच’ करण्यात आलेल्या पोर्टलमुळे सर्वांचे काम सुलभ होणार आहे. नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे काही अडचणी येणे स्वाभाविक आहे. मात्र या तंत्रज्ञानामुळे इमारत बांधकाम परवानीसाठी अनेक दिवस पडून राहणा-या फाईलचा त्रास कमी होणार आहे. शिवाय कामामध्ये पारदर्शिताही येईल. याचा पुढे होणारा फायदा लक्षात घेऊन याचा स्वीकार करा, असे आवाहनही त्यांनी केले.
 
राज्य सरकारने सुरू केलेले पोर्टल दिर्घकाळासाठी आपणास उपयोगी ठरणार आहे. बीपीएमएस सॉफ्टवेअरचा यापुर्वी अनेक नगरपरिषदांनी स्वीकार केला आहे. या तंत्रज्ञानात येणा-या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी उद्या शनिवारी (ता. २१) महापौर नंदा जिचकार व आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत सर्व वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होउन अडचणी मांडाव्यात असे आवाहन स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी केले.

 

 

महिला सक्षमीकरणासाठी एकीची हाक

मनपा समाजकल्याण विभागाचे ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियान
 
मंगळवारी झोनमधील कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
 
नागपूर,ता.१९ : आजच्या आधुनिक युगात महिला पुरूषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांमध्ये गृहिणींचे योगदान महत्वपूर्ण आहे. घराची जबाबदारी सांभाळणा-या महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समाजात सन्मानाचे स्थान मिळविण्यासाठी आता एकत्र येणे गरजेचे असे सांगत नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी एकीची हाक दिली. 
 
नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गुरूवारी (ता. १९) मंगळवारी झोनमधील महिला बचत गटांच्या सदस्यांकरिता ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानांतर्गत छावनी येथील दुर्गा माँ प्रार्थना भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रगती पाटील बोलत होत्या. शहरी महिला बचत गटातील महिलांना लघुउद्योगाचे धडे देत त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या अभियाला सुरूवात करण्यात आली. व्यासपीठावर महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील यांच्यासह उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या मनिषा अतकरे, रश्मी धुर्वे,  नसिम बानो खान मोहम्मद इब्राहिम, अर्चना पाठक, संगीता गि-हे, सुषमा चौधरी, स्वच्छ असोसिएशनच्या शेफाली दुधबडे, उषा बागडी उपस्थित होते.
 
पुढे बोलताना सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, उत्तमपणे कुटुंबाचा भार वाहणा-या महिलांमध्ये व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य असते. लघु उद्योग हा स्त्रीच्या उन्नतीचा मार्ग आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या व्यवसायात योग्य भरारी घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या उत्थानासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची पूरेपूर माहिती घेउन त्याच्या अंमलबजावणीसाठी कशी करावी, शिवाय बँकांकडून आर्थिक सहकार्य कसे मिळविता येईल याची माहिती एकत्रितरित्या मिळावी, यासाठी प्रत्येक झोनमध्ये अभियानाची ओळख करून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. स्वयं सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढाकार घेत अभियानात सहभागी व्‍हावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी केले.
 
कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका सुषमा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला मंगळवारी झोनमधील पंचशील महिला बचत गट, वैष्णवी महिला बचत गट, शितला माता महिला बचत गट, अमरदीप महिला बचत गट, सखी महिला बचत गट, साची महिला बचत गट, मानसी महिला बचत गट, जयमाता महिला बचत गट, यशस्वी महिला बचत गट आदी महिला बचत गटांनी सहभाग घेतला.
 
टाकाऊ पासून सुदंर व टिकाऊ वस्तू निर्मीतीचे प्रशिक्षण
 
‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानामार्फत स्वच्छ असोसिएशनच्या शेफाली दुधबडे यांनी कार्यक्रमात उपस्थित विविध बचत गटाच्या महिलांना टाकाऊ पासून सुंदर व टिकाऊ वस्तू कशा तयार करता येतील, याची माहिती दिली. यावेळी सभागृहात लघुउद्योगामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.

 

 

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एक हजार घरे बांधणार : २०१ कोटीच्या कामांसाठी संचालक मंडळाची मंजुरी
 
नागपूर,ता.१९. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे बांधण्याच्या कामाला नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. गुरूवारी (ता.१९) ला मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेत संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली.
 
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आयुक्त वीरेंद्र सिंह, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, बसपा गट नेते मोहम्मद जमाल, नगरसेविका मंगला गवरे, पराग दासरवार प्रामुख्याने उपस्थित होते.
 
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे बांधण्यात येणार आहे. चार हजार पैकी तीन हजार घरे हे पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येणार असून एक हजार घरे हे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात येणार आहेत. एक हजार घरे हे नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड यांच्यावतीने बांधण्यात येणार आहे. याकामाला एकूण २०१ कोटीचा खर्च अपेक्षित असून त्याला संचालक मंडळाने मंजुरी प्रदान केली आहे. लवकरच या कामासाठी निविदा काढण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांनी दिली.

 

 

विदर्भातील प्रतिभावंत कलावंतांसाठी व्यासपीठ ‘व्हाईस ऑफ विदर्भ’

-नागपूर महानगरपालिका व लकी इव्हेन्ट्सतर्फे २१ व २२ जुलैला प्राथमिक फेरी
 
- ४ ऑगस्टला महाअंतिम फेरी
 
नागपूर, ता. १८ : नागपूर महानगरपालिका व लकी इव्हेन्ट्स ॲण्ड म्युझिकल एंटरटेनमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस्‌ सोल्यूशन्स ॲन्ड सर्विसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ ऑगस्टला होणार असून येत्या २१ व २२ जुलैला स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी पत्रपरिषदेत दिली.  
 
१४ वर्षावरील व १४ वर्षाखालील अशा दोन वयोगटात ही स्पर्धा होणार असून प्राथमिक फेरीमध्ये ज्येष्ठ गायक कलावंतांनाही सहभागी होता येणार आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या ठरणाऱ्या कलावंतांना २१,००० रुपये प्रथम, ११,००० रुपये द्वितीय व ७००० रुपये तृतीय असे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.
 
स्पर्धेच्या माध्यमातून विदर्भातील उदयोन्मुख व प्रतिभावंत कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा स्पर्धेचा उद्देश आहे. मागील वर्षी महापौर चषकांतर्गत अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले होते. यावर्षी क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात येईल. गीत, गायन, अभिनय क्षेत्रातील कलावंतांना यामाध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचा नागपूर महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी सांगितले. स्पर्धेच्या आयोजनासाठी मनपाच्या क्रीडा समिती सदस्यांसह लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान, विजय चिवंडे आदी सहकार्य करीत आहेत. स्पर्धेला मानव सुधार प्रन्यास संस्थेसह आदित्य-अनघा बँक आणि युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन यांचे सहकार्य लाभले आहे. सदर स्पर्धेत विदर्भातील उदयोन्मुख कलावंतांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी ८८८८८९९३२१, ९७६४०२६३६५  या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
 
पत्रपरिषदेला सभापती नागेश सहारे यांच्यासह उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक संजय चावरे, नगरसेविका सरला नायक, नगरसेविका दर्शनी धवड, लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान उपस्थित होते.

 

 

नागपूरला करणार सांस्कृतिक चळवळीचे केंद्र

मनपा क्रीडा सभापती नागेश सहारे यांचा संकल्प : वर्षभर करणार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
 
नागपूर,ता.१७ : नागपूर महानगरपालिका नागरिकांना सेवा देण्यासोबतच शहरातील क्रीडा आणि सांस्कृतिक वातावरण निर्मितीसाठी कटिबद्ध आहे. स्थानिक खेळाडूंना आणि कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न मनपाच्या क्रीडा आणि सांस्कृतिक समितीतर्फे करण्यात येणार आहे. भविष्यात नागपूर शहर सांस्कृतिक चळवळीचे केंद्र व्हावे आणि सांस्कृतिक शहर म्हणून नावारूपास यावे या दृष्टीने कार्य करणार असल्याचा संकल्प मनपाचे क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे यांनी केला आहे.
 
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, नागपूर महानगरपालिका ही केवळ नागरिकांना सेवा देते ह्या ओळखीसोबतच स्थानिक खेळाडू, कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी महानगरपालिका अशी नवी ओळख निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागपुरात अनेक कलावंत आहे. गरीब कुटुंबातील अनेक कलावंत व्यासपीठाअभावी समोर जाऊ शकत नाही. प्रत्येक कलावंताला पुणे-मुंबईला जाता येत नाही. या कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आता मनपा पुढाकार घेत आहे. मागील वर्षी खेळाडूंसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी क्रीडा स्पर्धांसोबतच सांस्कृतिक स्पर्धांचीही रेलचेल राहणार आहे. नृत्य, गायन, अभिनय क्षेत्रातील कलावंतांना समोर जावे यासाठी विविध स्पर्धांसोबतच प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात येईल. या क्षेत्रातील दिग्गज मंडळीकडून प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. एकंदरच वर्षभरात नागपुरात सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याचा मनपाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
 
हे करीत असतानाच सांस्कृतिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचाही मनपाचा प्रयत्न राहील. यासाठी नागपूरकरांचीही साथ आवश्यक आहे. यामध्ये ज्या कोणाला योगदान द्यावयाचे आहे, त्यांनी मनपाच्या क्रीडा समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी केले आहे.

 

 

उठ भगिनी जागी हो, लघुउद्योगाचा धागा हो!

मनपा समाजकल्याण विभागाचे ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियान
 
नागपूर,ता.१७ : ‘उठ भगिनी जागी हो, लघुउद्योगाचा धागा हो’ असा मंत्र देत नागपूर शहरातील बचत गटांच्या महिलांना लघुउद्योगाच्या माध्यमातून प्रगती साधण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी केले.
 
नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरी महिला बचत गटातील महिलांना लघुउद्योगाकडे वळविण्याच्या दृष्टीने ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानाला सुरुवात झाली. याअंतर्गत हनुमान नगर झोनमधील महिला बचत गटांच्या सदस्यांकरिता मानेवाडा मार्गावरील मार्कंडेय सभागृहात मंगळवारी (ता. १७) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील यांच्यासह हनुमान नगर झोन सभापती रूपाली ठाकूर, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका मंगला खेकरे, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, कल्पना कुंभलकर, मिटकॉनचे ज्ञानेश्वर चौधरी उपस्थित होते.
 
पुढे बोलताना सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, स्त्री संसार उत्तम सांभाळते. त्यामुळे व्यवस्थापन हा गुण उपजतच तिच्या अंगी असतो. कुठल्याही गोष्टीचे सुयोग्य व्यवस्थापन ती उत्तमरीत्या करू शकते. लघु उद्योग हा स्त्रीच्या उन्नतीचा मार्ग आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून सामूहिकरीत्या अथवा वैयक्तिक उद्योग महिलांनी सुरू केला तर त्या व्यवसायात योग्य भरारी घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांची त्यांना माहिती व्हावी, त्याचा लाभ कसा घ्यायचा त्याचे तंत्र माहिती व्हावे, बँकांकडून अर्थसहाय्य मिळविण्यासाठी काय करता येईल, या संपूर्ण बाबीची माहिती एकाच छताखाली व्हावी, याकरिताच सदर अभियानाचे झोननिहाय आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी या अभियानाचा लाभ स्वत:करिता करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
नगरसेविका विशाखा बांते यांनी यावेळी महिलांना रेशन कार्डचा उपयोग आणि त्यामाध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळतो, त्यासाठी महिलांनी काय करायला हवे, याबाबत मार्गदर्शन केले. महिलांना लघु उद्योगाच्या कुठल्याकुठल्या संधी आहेत, याबाबत संबंधित क्षेत्रातील साधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समुदाय संघटक नीता गोतमारे, योगेश्वर डांगे, कविता खोब्रागडे, संगीता मोटघरे, शशी फुलझेले, सुनंदा रामटेककर, चंद्रकांता गायधने, महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
 
विविध प्रशिक्षण संस्थांनी दिली माहिती
 
‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम स्थळी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना जे मोफत प्रशिक्षण देण्यात येते, त्याची माहिती देणाऱ्या विविध संस्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. डाटा-टेक, सिगमा, समाधान, लावण्य या विविध संस्थांच्या स्टॉल्सला महिलांनी भेटी देऊन प्रशिक्षणाबद्दल माहिती घेतली.
 
५०० वर महिलांना रोजगार देण्याचा संकल्प
 
महिलांच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘चलो चले प्रगति की ओर’ या अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी उद्युक्त करण्याचा उद्देश आहे. या माध्यमातून सुमारे ५०० वर महिलांना रोजगार देण्याचा संकल्प मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने करण्यात आला.

 

 

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर महापालिकेचा भर : महापौर

गणेशोत्सव व नवरात्रोत्सव पूर्वतयारीचा आढावा
 
नागपूर,ता.१७ :   यंदाचा गणेशोत्सव १३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर महानगरपालिका भर देणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली. मंगळवारी (ता. १७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गणेशोत्सव व नवरात्रोत्सव पूर्वतयारी बैठक   आयोजित करण्यात आली.
 
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपनेते बाल्या बोरकर, उपनेत्या वर्षा ठाकरे, उपायुक्त नितीन कापडनीस, उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, कार्यकारी अभियंता सी.जी.धकाते, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, मोती कुकरेजा, गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके,  प्रामुख्याने उपस्थित होते.
 
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रशासनिक आढावा  उपायुक्त जयंत दांडेगावकर यांच्यामार्फत घेतला. यावर्षी दहा झोनमधून ११२ कृत्रिम तलावाची मागणी आली आहे. त्यापैकी काही मागील वर्षी वापरलेले आहेत, ते यावर्षीही वापरण्यायोग्य असल्याची माहिती उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी दिली. यावर्षी काही सेंट्रींग तलावांचा वापर करण्यात यावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शहराबाहेर असलेल्या रिकाम्या खाणीही शोधून काढण्यात याव्या, जेणेकरून त्याचा वापर गणेशोत्सवासाठी करता येईल, असे निर्देश महापौरांनी दिले. गणेशोत्सवाच्या एकदिवसाआधी हरतालिका हा महिलांचा सण असतो, त्या सणासाठी गौर विर्सजित करण्यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. विसर्जनस्थळी निर्माल्य विसर्जित करण्यासाठी कलश ठेवण्यात यावे, संकलित केलेले निर्माल्य मनपाच्या उद्यानात कम्पोस्टिंगसाठी पाठविण्यात यावे, असे निर्देश महापौरांनी दिले.
 
गणेश मंडळांच्या परवानगीसाठी प्रत्येक झोनमध्ये एक खिडकी पद्घतीने ठेवण्यात यावी, अशी सूचना महापौर प्रवीण दटके यांनी केली. धर्मादाय ट्रस्ट, अग्निशमन विभाग, एसएनडीएल, पोलिस विभाग, वाहतूक विभाग या सहा विभागांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना मनपाच्या दहाही झोनमध्ये सुरू करण्यात यावी, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. परवानगी ऑनलाईन पद्धतीने करता येईल का, याबाबतही विचार करण्यात यावा, असे निर्देश महापौरांनी दिले.याबाबत पालकमंत्र्यांशीही चर्चा करून त्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.
 
कृत्रिम तलावाजवळ व विसर्जन मार्गावर विद्युत व्यवस्था सुरळीत राहिल याची व्यवस्था करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी सर्वात आधी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी करताना त्यांना शासनाच्या अटी सांगण्यात याव्यात, अशी सूचना ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी केली.
 
मागीलवर्षी शहरातील सक्करदरा, सोनेगाव, गांधीसागर तलावात गणेश मूर्ती विसर्जन पूर्णत: बंद होते. त्यामुळे तलावाचे सौंदर्यीकरण अबाधित राहिले. यंदाही या तलावांवर गणेश विसर्जन न करता कृत्रिम तलाव तयार करून त्यातच लोकांना मूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करण्यात यावी. शिवाय प्रत्येक झोनमधील विसर्जन स्थळांची माहिती देण्यासाठी मागील वर्षी ‘ॲप’चे लोकार्पण करण्यात आले. त्याचा नागरिकांसह मनपालाही खूप फायदा झाला. यंदाही ‘ॲप’च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नि:शुल्क ‘हेल्पलाईन’ नंबर जाहीर करून त्याची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी, असेही महापौर श्रीमती जिचकार यांनी सांगितले.
 
दरवर्षी फुटाळा तलाव येथे मोठ्या मूर्तींचे विसर्जन होत असते. त्यामुळे फुटाळा तलावात प्रदूषणाचे प्रमाण वाढते. यावर्षी फुटाळा तलावावरील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेद्वारे काही उपाययोजना करता येईल का, याचा विचार करावा, असे महापौर नंदा जिचकार यांनी सूचित केले. 
 
तलावाला बाजूने अस्थायी स्वरुपात सभोवताल शेड टाकण्यात यावे आणि त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात यावा, असे निर्देश श्रीमती नंदा जिचकार यांनी दिले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील मोठ्या मंडळांसोबत मंगळवारी २४ जुलैला बैठक राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सामाजिक संस्था व झोन सभापती यांना आमंत्रित करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्यावा
 
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले. पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोणत्याही नवीन कल्पना मंडळाकडे किंवा सामाजिक संस्थेकडे असल्यास त्यांनी सूचवाव्यात, मनपा त्या सूचनांचे स्वागत करेल, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

 

 

कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प देशासाठी पथदर्शी

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस : शहरातील प्रमुख विकास कामांचे डीजिटल भूमिपूजन व लोकार्पण
 
नागपूर, ता. १६ : नागपूर शहरातील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया होऊन त्यातून वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे भांडेवाडीत साचणारा कचरा यापुढे साचणार नाही. मोठी जागा तेथे रिक्त होईल. बायोमायनिंगच्या माध्यमातून तेथे उद्यान व अन्य प्रकल्प साकारले जातील. मनपाच्या उत्पन्नात यामुळे भर पडणार आहे. आजचे युग ‘इनोव्हेशन’चे आहे. पारंपरिक पद्धतीने काहीच शक्य नाही. काहीतरी इनोव्हेटिव्ह केले तर पुढील पाच वर्षात नागरिकांचे आयुष्य बदलून जाईल. नागपुरातील कचऱ्यापासून वीज निर्मिती हा ‘इनोव्हेशन‘चा भाग असून हा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
सोमवारी (ता. १६) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित विविध विकास कामांच्या डिजीटल भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे व कोळसा मंत्री पीयूष गोयल, राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, खासदार विकास महात्मे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार मल्लिकार्जून रेड्डी, आमदार सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, मनपाचे स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, प्रधान सचिव (ऊर्जा) अरविंद सिंह, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (महानिर्मिती) बिपीन श्रीमाळी, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (वेकालि) राजीव रंजन मिश्रा, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मंडळ रेल्वे प्रबंधक सोमेश कुमार, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी, जी. के. पिल्ले, भाजपचे नागपूर ग्रामीण अध्यक्ष राजीव पोतदार यांच्यासह नागपूर मेट्रो, रेल्वे व महाजनकोचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कोळसा पाईप कन्व्हेयर प्रकल्प, भानेगाव सांडपाणी वापर प्रकल्प, भांडेवाडी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प या कामांचे डिजीटल भूमिपूजन करण्यात आले. शिवाय मान्यवरांच्या उपस्थितीत मेट्रो, महाराष्ट्र शासन व रेल्वे मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरीही करण्यात आली.
 
अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर-मुंबई समृद्धी मार्गावर सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन रेल्वे असावी, ही केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची संकल्पना स्वागतार्ह आहे. तसे व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकल्प अहवाल तयार केला होता. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यावर विचार झाला नाही. आता रेल्वे मंत्र्यांनीच त्याला हिरवी झेंडी दाखविल्याने नागपूर-मुंबई अंतर पाच तासांत कापण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले,  आजचे युग ‘इनोव्हेशन’चे युग आहे. ‘इनोव्हेशन’च्या युगात तंत्रज्ञानाची जोड देऊन विकसीत उपक्रमांद्वारेच लोकांच्या जीवनात क्रांतिकारक परिवर्तन करता येऊ शकते. नागपुरातही अशीच विकास कामे साकारत असून ही विकास कामे संपूर्ण राज्यच नव्हे तर देशासाठी आदर्श उदाहरण ठरेल. नागपुरात ब्रॉडगेज मेट्रोच्या कामाने गती पकडली असून येत्या काळात ब्रॉडगेज मेट्रोचे कोचही नागपुरातच तयार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कोळसा खाणीतील पाण्याचा वापर आता सुमारे १० हजार एकर जमीन सिंचित करण्यासाठी होईल आणि १० एमएलडी पाणी वीज निर्मिती केंद्राला जाईल. यामुळे आता पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष थांबेल. यापुढे पिण्याचे शुद्ध पाणी जे वीज निर्मितीसाठी वापरले जात होते त्याचा उपयोग आता पिण्याचे पाणी म्हणूनच होईल. शहरातील सांडपाणी शुद्ध करून उद्योगांना त्याचा फायदा होणार आहे. भांडेवाडीवासीयांना डम्पिंग यार्डमुळे होणारा त्रास, आरोग्याच्या उद्‌भवणाऱ्या समस्यांना पुढील १८ महिन्यात विराम मिळणार आहे. कारण येथे येणाऱ्या कचऱ्यापासून आता वीजनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे शहराला नवी ओळख मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मेट्रोमुळे नागपूरसह जवळच्या शहरांमधील लोकांच्या जीवनमानाला गती मिळणार आहे. येत्या काळात वर्धा, रामटेक, भंडारा, काटोल, सावनेर अशा नागपूरच्या ५० ते ६० किमी अंतरावरील शहरांना ब्रॉड गेज मेट्रोने जोडले जाणार आहे. त्यामुळे वर्धा ते नागपूर हे अंतर ३५ मिनटात अवघ्या ६० रुपयांमध्ये तर रामटेक ते नागपूर हे अंतर अवघ्या २० मिनिटात पूर्ण करता येणार आहे. यानंतर शहरातही सर्वत्र मेट्रोचे जाळे असल्याने स्वत:चे वाहन घेऊन फिरण्याची गरज राहणार नाही, असेही गडकरी म्हणाले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वाहने खरेदी करणे बंद करा, पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करा, सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 
नागपुरातील कामांची गतीशीलता देशासाठी आदर्श : पीयूष गोयल
 
नागपुरात सुरू असेलेली विद्युत कामांमधील गतीशीलता संपूर्ण देशासाठी आदर्श आहे, अशा शब्दांमध्ये केंद्रीय रेल्वे व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा गौरव केला. नागपुरातील विद्युतीकरणाच्या कामांचे उदाहरण पाहता केंद्र सरकार संपूर्ण रेल्वेच्याही विद्युतीकरणासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे येत्या काळात सुमारे १२ ते १५ हजार कोटी रुपये वाचणार आहेत, असेही केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले.
 
वेकोलिच्या पाच कोळसा खाणींमधून पाईप कन्व्हेअरद्वारे कोराडी व खापरखेडा औष्णक विद्युत केंद्रात कोळसा पुरवठा करण्याचा महाजनकोचा प्रकल्प हा ऐतिहासिक आहे. याशिवाय चंद्रपूरच्या दोन खाण जोडण्याचेही प्रकल्प असून त्याचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. चंद्रपूर व कोराडी दोन्ही केंद्रांवरील प्रकल्पासाठी ६०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे, असेही बावनकुळे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. मंडळ रेल्वे प्रबंधक सोमेश कुमार यांनी आभार मानले.
 
नागपुरातील विकासकामे ठरेल मैलाचा दगड : वीरेंद्र कुकरेजा
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्त्वात नागपूर विकासाचे एक-एक शिखर पादाक्रांत करीत आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे आज करण्यात आलेले विविध कामांचे ई-भूमिपूजन म्हणजे जागतिक स्तरावर छाप सोडण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे. ई-भूमिपूजन झालेले विविध प्रकल्प नागपूरच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. ब्रॉड गेज मेट्रो ही संकल्पनाच देशासाठी नवीन असून त्याची सुरुवात नागपुरातून होणे, हे प्रत्येक नागपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेले विविध प्रकल्पही देशातील अन्य शहरांसाठी पथदर्शी ठरत आहेत. नागपूर भविष्यात देशातील सर्वात स्मार्ट शहर होईल, यात शंका नसल्याची प्रतिक्रिया स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी व्यक्त केली. 

 

 

समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा : महापौर नंदा जिचकार

मनपा व दृष्टी – स्पर्श आर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन
 
नागपूर,ता.१४ : आपले व्यक्तिमत्व घडत असताना आपले पालक, मित्र मंडळी, नातेवाईक यांचा जेवढा हातभार असतो  तेवढाच हातभार समाजाचा देखिल असतो. त्याच समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
नागपूर महानगरपालिका, दृष्टी – स्पर्श आर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि सक्षम यांच्या सहकार्याने सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचा उद्‌घाटन सोहळा शनिवारी (ता.१४) रोजी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
यावेळी व्यासपीठावर उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने, सक्षमचे विदर्भ प्रांत अध्यक्ष सुधाकर इंगोले, सक्षम नागपूरचे अध्यक्ष उमेश अंधारे, दक्षिण मध्य सांस्कृतिक क्षेत्राचे संचालक दीपक खिरवडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, अतिशय स्त्युत्य असे प्रदर्शन मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवत आहे. या सर्व चित्रांमधून कलाकाराची प्रतिभा दिसून येत आहे. ही चित्रे दृष्टीहीन मित्रांनाही अनुभवता येत आहे. चित्राला स्पर्श करून दृष्टीहीन मित्रांना ब्रेल लिपीच्या साह्याने ही चित्र ओळखता येतात. याशिवाय डोळसांसाठी चित्रांच्या सौंदर्यात भरही पडते, असेही महापौर नंदा जिचकार यांनी प्रतिपादित केले.
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी केले. या चित्र प्रदर्शनामागील पार्श्वभूमी त्यांनी विषद केली. त्यांनी साकारलेल्या एका ब्रेल पेन्टींगचे मान्यवरांच्या हस्ते विधीवत उद्‌घाटन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
 
या प्रदर्शनात सुप्रसिद्ध नट अभिताभ बच्चन यांची बॅल्क चित्रपटातील भूमिका साकारलेले चित्र, सुप्रसिद्ध नट दिलीप प्रभावळकर यांच्या आवडत्या दहा व्यक्तीरेखा पेंटीगच्या माध्यामातून साकारण्यात आल्या आहेत. याशिवाय रस्ता सहज ओलांडणारी दृष्टीहीन मुलगी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, कोरलेला प्राचीन शिलालेख, निसर्गचित्र, ललितकला मांडणारी चित्रे या प्रदर्शनात मांडलेली आहे.
 
या प्रदर्शनासाठी नागपूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व अंध शाळेतील विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या बसेसची सोय करण्यात आली आहे. हे चित्रप्रदर्शन अर्थपूर्ण आणि मनमोकळा संवाद साधणारी पर्वणीच नागपूरकरांसाठी आहे. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी आयोजकांच्या वतीने केले आहे.    

 

 

लकडगंज आणि सतरंजीपुरा झोनमध्ये अतिक्रमण कारवाई

नागपूर,ता.13.  मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर शुक्रवारी (ता.13) लकडगंज व सतरंजीपुरा झोन मध्ये कारवाई करण्यात आली. ही कारवाई नागपूर महानगरपालिकेचे सहायक आयुक्त (अतिक्रमण विभाग) अशोक पाटील, लकडगंज झोन सहायक आयुक्त सुभाष जयदेव, सतरंजीपुरा झोन सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
 
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर अवैध ठिकाणी धार्मिक स्थळे, स्मारक, पुतळे उभारण्यात येऊ नये अशी याचिका नागपूर खंडपीठात दाखल आहे. याप्रकरणी न्यायालयाने शहरातील अनधीकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिले होते. त्याआदेशानुसार मनपाने शहरातील धार्मिक अतिक्रमण हटविण्याची मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
 
लकडगंज झोन मधील दळवी हॉस्पीटल जवळील नागोबा मंदिर, जुना बगडगंज येथील नागोबा मंदिर तसेच सतरंजीपुरा झोन मधील विठ्ठल रूक्मिणी मंदिर, शांतीनगर येथील हनुमान मंदिर आणि नाग मंदिर, खंडवानी ले आऊट मधील नागराज मंदिर, शांतीनगर नगर कॉलनी येथील देवी मंदिर, हनुमान मंदिर, नागोबा मंदिर या ठिकाणचे धार्मिक अतिक्रमण हटविण्यात आले. गुरूवारी (ता.12) मंगळवारी झोन अंतर्गत खदान आर.ओ.बी जवळ आदिवासी नगर येथील ताज बाबा दर्गा देखील हटविण्यात आला होता. 
 

 

चिंतामणी हसबनीस यांच्या चित्रप्रदर्शनीचे आज उद्‌घाटन

मनपा-दृष्टी-स्पर्श आर्ट फाऊंडेशनचे आयोजन : तीन दिवस आयोजन
 
नागपूर,ता.१३ : नागपूर महानगरपालिका, दृष्टी-स्पर्श आर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या सहकार्याने प्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनी यांच्या चित्रप्रदर्शनीचे आयोजन १४ ते १६ जुलै दरम्यान दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आले आहे.
 
प्रदर्शनीचे उद्‌घाटन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होईल. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. सदर प्रदर्शनीतील चित्र दृष्टीहीन मित्रांनाही अनुभवता येईल. सदर प्रदर्शन १४ ते १६ जुलै दरम्यान दुपारी १२ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहील. प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे आणि धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले आहे.

 

 

नेताजी मार्केट स्थानांतरण करण्यासाठी महापालिकेचा पुढाकार

आमदार सुधाकर कोहळे यांनी घेतली आढावा बैठक
 
नागपूर,ता.१३ : सीताबर्डी येथील मुंजे चौकात असलेले नेताजी मार्केट हे फूल मार्केट मौजा बाबुलखेडा येथील मनपाच्या विस्तारीत जागेमध्ये स्थानांतरण करण्यासाठी नागपूर महानगरपालिका पुढाकार घेत आहे. यासंदर्भातील आढावा बैठक आमदार सुधाकर कोहळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१३) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आली.
 
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त वीरेंद्र सिंह, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (बाजार विभाग) विजय हुमणे, धंतोली झोन सहायक आयुक्त स्मिता काळे, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौगंजकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नेताजी फूल मार्केट हे सीताबर्डी मुंजे चौकात स्थित आहे. मुंजे चौकात मेट्रो रेल्वेच्या विस्तारीत कामामध्ये नेताजी मार्केट हलविण्यात येत आहे. हे मार्केट मौजा बाबुलखेडा मनपाच्या मालकीच्या विस्तारीत जागेत स्थानांतरण करण्याचा विषयावर बैठकीत चर्चा झाली. मार्केटकरिता राखीव असलेली दोन एकर जागा फूल विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना ९९ वर्षांकरिता लीजवर उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली. बैठकीला महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कोढे, उपअभियंता शकील नियाजी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.       

 

बचत गटांच्या महिलांशी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’

नागपूर,ता.१२ : दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन, दीनदयाल ग्रामीण कौशल्य विकास योजना आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान अंतर्गत असलेल्या देशभरातील लाभार्थ्यांशी गुरुवारी (ता. १२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. हा संवाद कार्यक्रम अनुभवण्याची व्यवस्था नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात करण्यात आले होते.
 
यावेळी महापौर नंदा जिचकार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, प्रतोद दिव्या धुरडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा कीर्तिदा अजमेरा, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नगरसेविका सोनाली कडू, श्रद्धा पाठक, पल्लवी श्यामकुळे, विशाखा मोहोड, उज्ज्वला शर्मा, जयश्री वाडीभस्मे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शहरातील बचत गटांतील महिला उपस्थित होता.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमांतर्गत देशातील महिला बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी आपल्या यशोगाथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्या. इतरांनी प्रेरणा घ्यावी, अशाच या यशोगाथा होत्या. या यशोगाथा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ‘मन की बात’ ऐकण्यासाठी नागपूर महानगरपालिकेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर महापौर नंदा जिचकार यांनी ‘मन की बात’च्या निमित्ताने येथे एकत्रित आलेल्या महिलांशी संवाद साधला. येथे आलेल्या महिला बचत गटांच्या महिलांनी आपल्याही यशोगाथा सर्वांना ऐकविल्या. नागपूर महानगरपालिका महिलांच्या उत्थानासाठी सतत कार्यरत असून महिला बचत गटांच्या महिलांना अधिक सक्षम बनविण्याचे कार्य करीत असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.
 
महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादन विक्रीसाठी आणि प्रशिक्षणासाठी वर्धेत असलेल्या केंद्राला नागपुरातील महिला बचत गटांच्या सदस्यांना भेट देण्यासाठी लवकरच अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या महिलांना आवश्यक आहे, अशा महिलांना प्रशिक्षणाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. ज्या प्रशिक्षण हवे त्या महिलांनी नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागात नोंदणी करावी, असे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले.

 

 

पणजी महानगरपालिकेला द्या ग्रीन बसची माहिती 

गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांचे नागपूर मनपाला निमंत्रण : छत्रपती ते विधानभवन पर्यंत केला ग्रीन बसने प्रवास
 
नागपूर,ता.१२ : स्मार्ट नागपूरची सार्वजनिक वाहतूकही स्मार्ट आहे. पणजी शहरातही अशाप्रकारची वाहतूक व्यवस्था तयार झाल्यास रस्त्यांवरील इतर वाहनांचा भार कमी होईल. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने येथील ‘ग्रीन बस’चे सादरीकरण पणजी महानगरपालिकेच्या पदाधिकारी आणि सदस्यांसमोर करावे, असे निमंत्रण गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांना दिले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात परिवहन विभागाच्या संचालित ग्रीन बसमधून गुरुवारी (ता. १२) गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी छत्रपती चौक ते विधान भवन असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी सदर निमंत्रण दिले. ग्रीन बसच्या या प्रवासात उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील आमदार संजयप्रताप जयस्वाल, परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, नागपूर शहर उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष अजय पाठक, भाजप अनुसूचिजत जाती मोर्चाचे महामंत्री मनीष मेश्राम, भाजपचे तेजप्रताप सिंग, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे आदी उपस्थित होते.
 
प्रारंभी परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत आणि आमदार संजयप्रताप जयस्वाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर बस प्रवासादरम्यान सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी ग्रीन बस आणि मनपाच्या परिवहन विभागांतर्गत संचालित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची माहिती दिली. नागपूर शहरात सुरू असलेल्या ग्रीन बस इथेनॉलवर चालत असून ग्रीन बस आणि आपली बस शहरात दररोज ८४ हजार कि.मी.चा प्रवास करतात. सुमारे दोन हजार चालक आणि दोन हजार वाहकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. इलेक्ट्रिक टॅक्सी, बॅटरीवर चालणारे ई-रिक्षानंतर आता इलेक्ट्रिक बसचा प्रयोगही नागपुरात होऊ घातला आहे. भविष्यात नागपुरात येणाऱ्या सर्व खासगी बसेस शहराच्या बाहेर थांबविण्यात येतील. तेथून शहरात येण्यासाठी ग्रीन बस आणि आपली बस सेवा देतील. यामुळे उत्पन्नात भर पडेल, अशी माहिती श्री. कुकडे यांनी दिली.
 
नागपूर महानगरपालिकेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ग्रीन बस आणि वाहतूक व्यवस्थेची प्रशंसा करीत विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी अशी वाहतूक व्यवस्था सर्वच शहरात असेल तर प्रदूषण कमी होण्यास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे म्हटले. वॉटस्‌ ॲप तक्रार क्रमांक, टोल फ्री क्रमांक, येणाऱ्या तक्रारींचे केलेले निरसन ह्या सर्वच बाबी प्रशंसनीय आहेत. पणजीमध्येही अशी व्यवस्था व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

 

 

मनपाच्या परवानगीशिवाय यापुढे कुठलेही खोदकाम नाही!

आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बजावले : विविध विभागांसोबत समन्वय बैठक
 
नागपूर,ता.११ : नागपूर शहरात ज्या विविध एजंसी किंवा सरकारी विभाग काम करतात, ते शहरात खोदकाम करताना कुठलीही परवानगी घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे असे चालणार नाही. कुठल्याही खोदकामासाठी नागपूर महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे. परवानगी घेताना अनामत रक्कम जमा करावी. ही प्रक्रिया न करता खोदकाम केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, या शब्दात मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बजावले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता. १०) विविध शासकीय/निमशासकीय विभागांच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्यासह मनपाच्या वतीने प्रभारी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके तसेच नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशन लि., राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर पोलिस, नगर भूमापन, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., रेल्वे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह पुढे म्हणाले, रस्ता खोदकाम करण्यापूर्वी अनामत रक्कम आवश्यक राहील. कार्य पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनी पुनर्भरणास नाहरकत दिल्यानंतर अनामत रक्कम परत दिल्या जाईल. बऱ्याचदा खोदकाम करताना पूर्वीच असलेल्या केबल, जलवाहिनी आदींचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक विभाग, एजंसीला यापुढे खोदकाम करण्यापूर्वी जीपीआर सर्वेक्षण करणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले.
 
यापुढे कुठल्याही प्रकारचे शहराचे विद्रुपीकरण खपवून घेणार नसल्याचेही आयुक्त वीरेंद्र सिंह म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, शहरातील कुठल्याही शासकीय इमारतीच्या सुरक्षा भिंतीवर, कार्यालयाच्या भिंतीवर कुठल्याही प्रकारच्या जाहिराती रंगविल्या असेल, स्टीकर लावले असेल तर संबंधित कार्यालयाने संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई करावी. पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. कार्यालयासमोरील फुटपाथ मोकळे राहील, याची काळजी घ्यावी. अतिक्रमण होणार नाही, ही त्या-त्या कार्यालयाची जबाबदारी आहे. अतिक्रमण आढळल्यास मनपा कायदेशीर कारवाई करेल आणि त्याचा भुर्दंड शासकीय कार्यालयांना भरावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
 
यानंतर आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेत ज्या प्रकल्पांना ज्या विभागाकडून अडचण आहे, त्या विभागांना पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. यासाठी कालमर्यादाही ठरवून दिली. यामध्ये मेट्रोतर्फे बांधण्यात येणारे तीन मीटर रुंदीचे फुटपाथ, ऑरेंज सिटी स्ट्रीटच्या जमीन डिमार्केशनबाबतचा नगर भूमापन कार्यालयाला पाठविलेला प्रस्ताव, जरिपटका मार्केटच्या जागेची मोजणी, लकडगंज फायर स्टेशन, पाचपावली फायर स्टेशन, गंजीपेठ फायर स्टेशन जागा मोजणी, सीमेंट रस्त्यावरील विद्युत पोल हटविणे आदींचा आढावा घेत जेथे अडचण आहे ती पुढील सात दिवसांत दूर करण्याचे निर्देश दिले.
 
प्रलंबित कर भरा!
 
विविध शासकीय कार्यालयांकडे सुमारे ३३ कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे तर १० कोटींचा पाणी कर थकीत आहे. हा कर तातडीने भरावा, असे निर्देश मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. मागील करामध्ये काही अडचण असेल तर त्या तातडीने सोडवाव्या. किमान नवीन कर भरण्यासंदर्भात यंदाच्या आर्थिक वर्षात त्याबाबतचे नियोजन करावे, असेही ते म्हणाले.
 
समन्वय बैठकीला उपस्थिती आवश्यक
 
मंगळवारी झालेल्या समन्वय बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व अन्य काही विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते. या सर्व विभागांना तातडीने पत्र देऊन समन्वय बैठकीला उपस्थिती आवश्यक असल्याचे पत्र पाठवावे, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

 

 

बुटी दवाखान्याचा होणार कायापालट!

सभापती संजय बंगाले : ३० खाटांच्या रुग्णालयासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश
 
नागपूर,ता.११ : सीताबर्डी येथील १३० वर्षे जुनी बुटी दवाखान्याची इमारत आणि त्याच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेवर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि ३० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले यांनी दिले.
 
शहरातील काही प्रलंबित प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने बुधवारी (ता. ११) मनपा मुख्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात स्थापत्य व प्रकल्प समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, समितीचे उपसभापती किशोर वानखेडे, सदस्य राजकुमार साहू, पल्लवी श्यामकुळे, उपायुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (जाहिरात) विजय हुमणे, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, स्थावर अधिकारी आर. एस. भुते, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, अधीक्षक मदन सुभेदार आदी उपस्थित होते.
 
बुटी दवाखाना हा मुख्य व्यापारी क्षेत्रात असल्याने त्याचे नूतनीकरण करून अथवा नव्याने एनयूएचएमच्या माध्यमातून मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल बांधण्याच्या दृष्टीने बैठकीत विषय चर्चेला आला. मात्र, एनएचयूएमच्या अंतर्गत मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटलचे प्रावधान नसल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे यांनी दिली. चर्चेअंती या जागेची मालकी, त्यासंदर्भातील दस्तावेज १० दिवसांत एकत्रित करून आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपवावा. त्याच्या उपलब्धतेनंतर आरोग्य अधिकाऱ्या ३० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करावा आणि एनयूएचएमकडे पाठवावा, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले.
 
सुपर मार्केटच्या विषयावर सभापतींची नाराजी
 
सीताबर्डी येथील मनपाच्या सुपर मार्केटमधील प्रस्तावित प्रकल्पाची सद्यस्थिती आणि या जागेसंदर्भातील न्यायालयीन प्रकरणे याबाबत सभापतींनी विचारणा केली असता समितीला समाधानकारक माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली नाही. या जागेसंदर्भात सुमारे ३६ जणांनी न्यायायलयात प्रकरण प्रविष्ठ केले होते. त्यापैकी सर्व निकाल मनपाच्या बाजूने लागले असल्याची माहिती विधी अधिकारी व्यंकटेश कपले यांनी दिली. याव्यतिरिक्त अजून काही प्रकरणे आहेत का याची तपासणी करून समितीपुढे अहवाल ठेवतो, असे त्यांनी सांगितले. सदर जागेसंदर्भात ५ सप्टेंबर २००६ रोजी लोककर्म विभागाने दिलेला शॉपिंग मॉलचा प्रस्ताव पारीत झाला होता. मात्र त्यानंतर काहीच कार्यवाही झाली नसल्याची माहिती अधीक्षक मदन सुभेदार यांनी दिली. सध्या या प्रकरणाची फाईल नेमकी कुठे, याबाबत कुणालाही माहिती नसल्याने सभापती संजय बंगाले यांनी नाराजी व्यक्त केली. संपूर्ण माहिती घेऊन पुढील १५ दिवसांत समितीसमोर या प्रकरणाचा अहवाल ठेवण्यात यावा, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले. नेताजी मार्केट स्थानांतरीत करण्याच्या प्रक्रियेचाही यावेळी सभापती संजय बंगाले यांनी पाठपुरावा केला. सदर प्रकरणाची फाईल आयुक्तांकडे असल्याची माहिती अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते यांनी दिली.
 
सुपर मार्केट, नेताजी मार्केट आणि कमाल चौक मार्केट हे तीन प्रकल्प महत्त्वकांक्षी असून मनपा याबाबत गंभीर आहे. या मार्केटलगतचे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सातत्याने सुरू ठेवावी, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. यासाठी एक स्वतंत्र चमू करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
 
‘त्या’ इमारतीतील अतिक्रमण हटवा, अन्यथा कारवाई!
 
धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या धंतोली परिसरातील सार्वजनिक वापराच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईत होणाऱ्या दिरंगाईवरही सभापती संजय बंगाले यांनी नाराजी व्यक्त केली. सदर अतिक्रमणासंदर्भातील याचिका न्यायालयाने खारीज केली. यासंदर्भातील फाईल अतिक्रमण विभागाकडे १२ जून रोजी पाठविण्यात आली. एक महिन्याचा कालावधी उलटूनही कारवाई का झाली नाही, याबाबत सभापतींनी अधिकाऱ्यांना विचारणा केली. पुढील १० दिवसांत जर कारवाई झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाईचे निर्देश देण्यात येईल, असा इशारा सभापती संजय बंगाले यांनी दिला.

 

 

ड्रेनेज लाईनच्या देखभाल दुरूस्ती व नियंत्रणाचे काम बांधकाम विभागाकडे सोपविण्यात यावे : मनोज चापले

वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीने घेतला आढावा
 
नागपूर,ता.१० : शहरातील सर्व ड्रेनेज लाईनच्या देखभाल दुरूस्ती व नियंत्रणाचे काम बांधकाम विभागाकडे सोपविण्यात यावे, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले. मंगळवारी (ता.१०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
 
यावेळी समिती उपसभापती विजय चुटेले, सदस्य लखन येरावार, विशाखा बांते, गार्गी चोपरा, दिनेश यादव, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, सुनील धुरडे, हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख जयश्री थोटे, कारखाना विभागाचे योगेश लुंगे, राजेश हाथीबेड प्रामुख्याने उपस्थित होते.
 
शहरातील ड्रेनेज लाईन चोकेजच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्या दुरूस्त करण्यासाठी मनपाचे कर्मचारी सातत्याने व्यस्त असतात. ड्रेनेज लाईनच्या देखभाल दुरूस्तीचे व नियंत्रणाचे तांत्रिक कामे बांधकाम विभागामार्फत करण्यात यावी, बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत मनपाचे कर्मचारी व अधिकारी कामावर लक्ष देतील, असे निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले.
 
पावसाळ्यात आरोग्य विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीचा झोननिहाय आढावा सभापतींनी घेतला. नाले सफाईच्या कामाची गती ही समाधानकारक बघून सभापतींनी समाधान व्यक्त केले. नाले सफाईकरिता मनपाच्या मालकीच्या मशीन्स खरेदी करण्याच्या प्रस्तवाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मनपा सहा जेसीबी, दोन पोकलेन, तीन रोबोट मशीन्स, एक ट्रोजर, सात टिप्पर नव्याने घेत आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर करण्यात येणार आहे.
 
प्रारंभी मागील महिन्यात झालेल्या आढावा बैठकीच्या कार्यवृत्ताला मंजुरी देण्यात आली. संसर्गजन्य व किटकजन्य रोगावर केलेल्या उपाययोजनेचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला.

 

 

नवनिर्वाचित आमदार भाई गिरकर ह्यांनी दीक्षाभूमी ला दिली भेट:: भाजपा

अनुसूचित जाती मोर्चाने केले स्वागत
 
नागपूर ता. ९. नवनिर्वाचित आमदार व विधान परिषदेचे मुख्य प्रतोद भाई गिरकर आज अविरोध निवडून आल्यानंतर दीक्षाभूमी ला भेट देवून डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेवून आदरांजली अर्पित केली. त्यांचेसमवेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, शहर महामंत्री संदीप जाधव, शहर अनु जाती मोर्चाचे शहराध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. दीक्षाभूमी समिती च्या वतीने प्रा फुलझले व श्री म्हैसकर ह्यांनी आ. भाई गिरकर ह्यांचे स्वागत केले
 
ह्याप्रसंगी शहर मोर्चा महामंत्री सतीश शिरसवान, मनीष मेश्राम, राहूल मेंढे, विशाल लारोकर, शंकर मेश्राम, बंडु गायकवाड, धनंजय कांबळे, मनोज डकाहा, विनोद कोटांगळे, रोशन बारमासे, चंद्रशेखर केळझरे व बरेच पदाधिकारी उपस्थित होते .
 

 

शेषनगर ते गांधीबाग बससेवेचा शुभारंभ

आमदार सुधारकर कोहळे यांनी दाखवली हिरवी झेंडी
 
नागपूर,ता.९. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत आपली बस या योजनेअंतर्गत शहरातील विविध भागात सार्वजनिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. रविवारी (ता.८) रोजी शेषनगर ते गांधीबाग बससेवेचा शुभारंभ दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते करण्यात आला.
 
यावेळी नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, नागेश मानकर, नगरसेविका मंगला खेकरे, माधुरी ठाकरे, मुकुंद डगवार, दामोदर बोबडे, प्रमोद सारंगे, वसंत गणोरकर, नानाभाऊ आदेवार, शुभांगी  घ्यार, सुधीर सोनटक्के, रामराव मातकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
शेषनगर ते गांधीबाग ही बस सेवा सुरू करण्यासाठी नागरिकांची वारंवार मागणी येत होती. त्यावर परिवहन समिती बंटी कुकडे आणि परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी पुढाकार घेऊन ही बस सेवा सुरू केली. ही बस शेषनगरहून सकाळी ९.२० ला सुटेल तर शेवटची बस दुपारी ४.५० ला सुटेल. गांधीबागहून ही बस सकाळी १०.२० ला सुटेल तर शेवटची बस ५.४० ला सुटेल. ही बस तपस्या शाळा, मानेवाडा चौक, क्रीडा चौक, आयचित मंदिर मार्गे गांधीबाग धावेल. या मार्गाचे पूर्ण तिकीट १३ रूपये आहे तर अर्धे तिकीट सात रूपये आहे. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.    

 

मालमत्ता सर्वेक्षण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा!

कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव यांचे निर्देश
 
नागपूर,ता.७ : नागपूर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा. यामध्ये आता कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. सर्वेक्षण झालेल्या सर्व मालमत्तांना वेळेत डिमांड पाठवा आणि यावर्षी दिलेल्या उद्दिष्टानुसार कर वसुली करा, असे निर्देश कर  आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात कर आकारणी व कर संकलन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, समितीचे उपसभापती व ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सदस्य यशश्री नंदनवार, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, भावना लोणारे, मंगला लांजेवार, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम उपस्थित होते.
 
नागपूर शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम सायबरटेक कंपनीकडे देण्यात आले होते. कामाची गती लक्षात घेता अनंत टेक्नॉलॉजीला काही सेक्टरचे काम सोपविण्यात आले होते. या दोन्ही कंपनींसाठी आता सर्वेक्षणाची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. या काळात संपूर्ण मालमत्ताचे कार्य पूर्ण होईल, असे नियोजन करण्याचे निर्देश सभापती संदीप जाधव यांनी दिले. दरवर्षी कर वसुली ज्याप्रमाणे होते तशीच स्थिती यावर्षी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. वसुलीचे उद्दिष्ट मोठे आहे. त्यामुळे केवळ कर वसुलीसाठी स्वतंत्र सेल उभारण्याची सूचना त्यांनी केली. जेथे कर्मचारी कमी आहे, तेथे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी केली. यानंतर सभापती जाधव यांनी ३० जून पर्यंत दिलेल्या कर वसुली उद्दिष्टाचा झोननिहाय आढावा घेतला.
 
स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी स्थायी समितीने झोन कार्यालयांना दिलेल्या उद्दिष्टांवर चर्चा केली. यावर्षी ५०९ कोटींचे कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या वसुलीची विभागणी तिमाहीनुसार करण्यात आली आहे. या कार्यात कुठलीही हयगय चालणार नाही. ३० जून पर्यंत पहिल्या तिमाहीचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. आता मागील तिमाही आणि पुढील तिमाही असे एकत्र उद्दिष्ट ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
तत्पूर्वी सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम यांनी २ मे रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार झालेल्या कामाची सद्यस्थिती सांगितली. संपूर्ण निर्देशांची पूर्तता करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सायबरटेक आणि अनंत टेक्नॉलॉजीकडून प्राप्त झालेल्या डाटासंदर्भात ३२४४ आक्षेप प्राप्त झाले होते. त्यापैकी २६६७ निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरीत ५७७ वर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इंडेक्स क्रमांक असलेल्या जुन्या मालमत्तांची संख्या ५,२७,४८१ इतकी आहे. त्यापैकी ३,३९,२४९ मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे. इंडेक्स क्रमांक नसलेल्या १,१७,०७९ मालमत्तांचे मिळून एकूण ४,५६,३३८ मालमत्तांचे सर्वेक्षण आटोपले असून त्यापैकी ४,०४,४०७ मालमत्तांचा डाटा प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
मालमत्ता कर अदा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे लवकरच एक ‘ॲप’ लॉन्च करण्यात येणार आहे. या ॲपचे सादरीकरण यावेळी समितीपुढे करण्यात आले.  बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त, कर निर्धारक उपस्थित होते.

 

 

मनपा पदाधिकारी, प्रशासनाचे युद्धपातळीवर मदतकार्य

पाणी शिरलेल्या वस्त्यांत जाऊन घेतल्या नागरिकांच्या भेटी : अतिवृष्टीच्या इशाऱ्याने सतर्क राहण्याचे महापौरांचे आवाहन
 
नागपूर,ता.६ : नागपूर शहरात गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्त आणि संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्याला भिडले आहे. आवश्यक तेथे आपतकालिन यंत्रणा सहकार्यासाठी पोहचत असून संपूर्ण यंत्रणा दिवसरात्र कामाला लागली आहे.
 
आज (ता. ६) सकाळी महापौर नंदा जिचकार यांनी तातडीची बैठक घेऊन संपूर्ण यंत्रणा पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कामाला लावण्याचे निर्देश दिले. बैठकीनंतर महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी मनपा मुख्यालयातील ‘सिटी ऑपरेशन सेंटर’मध्ये बसून संपूर्ण नागपूर शहराची माहिती घेतली. आवश्यक तेथे तातडीने मदतकार्य पोहचविण्याचे निर्देश त्यांनी दिले. याचवेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी नागपूरच्या जनतेसाठी सतर्क राहण्याचा संदेशही दिला.
 
यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी हॉटेल प्राईडसमोरील परिस्थितीची पाहणी केली. तेथे सुरू असलेल्या मदतकार्याचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने उपस्थित होत्या. यानंतर त्यांनी पोहरा नदी, प्रभाग ३७ मधील शास्त्री नगर ले-आऊट, दीनदयाल नगर, उरवेला कॉलनी आदी भागातील परिस्थितीची पाहणी केली. घरात पाणी शिरलेल्या कुटुंबीयांनी आपल्या समस्या महापौर नंदा जिचकार यांच्याजवळ सांगितल्या. याचवेळी जेथे आवश्यक तेथे संपूर्ण मदत पोहचविण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
 
स्थायी समिती सभापतींनी केली गोरेवाडा तलावाची पाहणी
 
स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी ही शहरातील विविध भागातील परिस्थितीची पाहणी केली. गोरेवाडा तलाव धोक्याच्या रेषेच्या केवळ एक फूट खाली आहे. रात्री तलाव पूर्णपणे भरणार असून त्यामुळे निर्माण होणारा धोका ओळखून तेथेही त्यांनी भेट दिली. उद्‌भवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत जलप्रदाय समितीच्या उपसभापती श्रद्धा पाठक, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, ओसीडब्ल्यूचे प्लान्ट मॅनेजर डॉ. ठाकरे उपस्थित होते.
 
यानंतर त्यांनी उत्तर नागपुरातील बेझनबाग, जरिपटका भागातील पाणी शिरलेल्या वस्त्यांना भेटी दिल्या. तेथे आवश्यक ते मदतकार्य पोहचविण्याचे आवाहन केले. यशवंत स्टेडियमजवळील काही दुकानांत पाणी शिरल्याचे माहिती होताच त्यांनी अग्निशमन यंत्रणेला पाचारण करून मदत पोहचविली. नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा सतत मदतकार्य करीत आहेच. परंतु ज्या चेंबरमध्ये प्लास्टिक, पॉलिथिन अटकले आहे आणि तेथील पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणच्या प्लास्टिक पिशव्या नागरिकांनी कर्तव्य म्हणून स्वत: हटविण्याचे आवाहन त्यांनी केले.  
 
आपत्ती निवारण यंत्रणा जुटली मदतकार्यात
 
नागपूर महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मदतकार्यात लागली आहे. गंभीर परिस्थितीची माहिती प्राप्त होताच तेथे तातडीने यंत्रणा मदत कार्यासाठी पोहचत आहे. अग्निशमन यंत्रणाही पूर्णपणे सज्ज आहे. आपातकालिन परिस्थितीतमध्ये आपातकालिन नियंत्रण कक्षाला संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संपर्क क्रमांक १०१, ०७१२-२५६७७७७, २५६७०२९,२०३११०१, २५५१८६६ असे आहेत. आपातकालिन मोबाईल क्रमांक ७०३०९७२२०० असा आहे.

 

 

‘सिटी ऑपरेशन सेंटर’ मधून मुख्यमंत्र्यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

मनपाला आकस्मिक भेट : नागरिकांना सर्व मदत करण्याचे प्रशासनाला निर्देश
 
नागपूर,ता.६ : नागपूर शहरात गुरुवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने संपूर्ण शहरात पाणी साचले आहे. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरातील या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमातीत असलेल्या ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ला भेट देऊन परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली. जेथे आवश्यक आहे, त्या सर्व ठिकाणी तातडीने मदत पोहोचवावी, आपत्ती व्यवस्थापानाचे कार्य चोखपणे बजावण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.
 
यावेळी त्यांचेसोबत महापौर नंदा जिचकार, मनपाचे स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेसी, प्रधान सचिव (माहिती व तंत्रज्ञान) एस.पी.आर. श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, अतिरिक्त पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते.
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पावसामुळे झालेल्या नागपूर शहराच्या परिस्थितीची माहिती घेतली. नागपूर शहरात लागलेल्या तीन हजारांवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील परिस्थितीची माहिती सिटी ऑपरेशन सेंटरला मिळत असते. विमानतळ, हॉटेल प्राईडसमोरील परिसर, पोहरा नदीमुळे सोनेगाव पोलिस ठाणा परिसरात आणि वर्धा रोडवरील घरांत शिरलेले पाणी, पडोळे चौक, पारडी चौक, ऑटोमोटिव्ह चौक आदी ठिकाणची त्यांनी माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे शहरातील परिस्थिती गंभीर असून संपूर्ण यंत्रणा २४ तास कर्तव्यावर ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. नदीकाठावर असलेल्या नागरिकांना धोक्याची सूचना देऊन तातडीने हलविण्याचे निर्देश त्यांनी दिली. शाळा, समाजभवन तयार ठेवा. सर्व ती मदत आणि सहकार्य करा, असेही निर्देश त्यांनी दिले.
 
आपतकालिन यंत्रणा संपूर्ण शहरात मदत कार्य करीत असून जेथून नागरिकांची मागणी आली तेथे तातडीने मदत पाठविली जात असल्याची माहिती मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.
 
स्मार्ट सिटीची घेतली माहिती
 
यानंतर प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. सदर बैठकीत स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी स्मार्ट सिटीच्या एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत होत असलेल्या पारडी, भरतवाडा, पूनापूर परिसरासाठी तयार करण्यात आलेल्या शहर नियोजन आराखड्याची माहिती दिली. हा आराखडा नागरिकांसाठी प्रसिद्ध केल्यानंतर यावर १९८ हरकती व सूचना आल्या. त्यातील १९३ हरकतींचा निपटारा केल्याची माहिती डॉ. रामनाथ सोनवणे यांनी दिली.

 

 

उत्तर नागपुरातील जरीपटका, बेझनबाग, इंदोरा भागातील पाणी प्रश्न सुटणार

सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या प्रयत्नांना यश : ट्रंक लाईनच्या कामासाठी रेल्वेची मंजुरी
 
नागपूर,ता.५ : मागील पाच-सहा वर्षांपासून रेल्वेच्या अडथळ्यामुळे प्रलंबित असलेला ट्रंक लाईनचा प्रश्न आता सुटला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या कामासाठी मंजुरी दिली असून आता लवकरच जरिपटक्यासह अर्ध्या उत्तर नागपूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
 
नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. उत्तर नागपुरातील राजनगरकडून येणारी ट्रंक लाईन बेझनबाग पाण्याच्या टाकीला जोडण्यासाठी रेल्वे लाईनखाली काम करायचे होते. गेल्या पाच वर्षांपासून यासाठी रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा होते. यासाठी अनेक पत्रव्यवहार झाले. मात्र, रेल्वेने या कामासाठी मंजुरी प्रदान केलेली नव्हती.
 
अखेर नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कामाची निकड विषद केली. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांची विनंती मान्य करीत या कामाला मंजुरी प्रदान केली. यामुळे आता या कामातील अडथळा दूर झाला आहे.
 
या कार्याला आता सुरुवात झाली असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी आज (ता.५) प्रगतीपथावर असलेल्या कार्याची पाहणी केली. त्यांच्यासोबत दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रमिला मंथरानी, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्यासह ओसीडब्ल्यूचे सर्व वरिष्ठ अधिकारी, जयप्रकाश सहजरामानी, जगदीश वंजानी, राजेश बजाज, राजेश बटवानी आदी गणमान्य नागरिक उपस्थित होते. या कामामुळे आता जरिपटक्यासह अर्ध्या उत्तर नागपूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर नागपुरातील जरिपटका, ठवरे कॉलनी, बेझनबाग, इंदोरा, लुंबिनी नगर, माया नगर, बाराखोली, चॉक्स कॉलनी, मेकोसाबाग यासह अनेक परिसराला याचा लाभ होणार असल्याचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले.

 

अतिक्रमण, असामाजिक तत्त्वावर करा कारवाई

स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे निर्देश : उपद्रव शोध पथकासोबत बैठक
 
नागपूर,ता.५ : उपद्रव शोध पथकामुळे आता शहराला शिस्त लागत आहे. नागरिकांनी उपद्रव शोध पथकातील सदस्यांना सहकार्य करावे. पथकानेही शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण, असामाजिक तत्त्वावर अधिकाऱ्यांना सूचित करून योग्य कारवाई करावी, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
 
उपद्रव शोध पथकातील सदस्यांसोबत स्थायी समिती सभापतींच्या कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीला सत्ता पक्ष उपनेते बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर उपस्थित होते. बैठकीत उपद्रव शोध पथकाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. पथकातील सदस्यांना काही अडचणी असतील तर त्या मनपा पदाधिकाऱ्यांना कळवाव्या. चांगले कार्य करीत असताना काही लोकांकडून त्रास होण्याचा धोका असतो. हा धोका ओळखून प्रत्येकांसोबत सामंजस्याने वागावे. कुणी ऐकत नसेल तर मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती द्यावी. पदाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात अवगत करावे, अशा सूचनाही सभापती कुकरेजा यांनी दिल्या.  
 

 

दुर्लक्षित असलेल्या खेळांच्या स्पर्धेचे आयोजन महापालिका करणार!

क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांची घोषणा
 
नागपूर,ता.५ : सध्याच्या काळात दुर्लक्षित असलेल्या खेळांच्या महापौर चषक स्पर्धेचे आयोजन नागपूर महानगरपालिका करणार असल्याची घोषणा क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी केली.
 
गुरूवारी (ता.५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित क्रीडा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
 
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, समिती उपसभापती प्रमोद तभाने, समिती सदस्या सरला नायक, विरंका भिवगडे, दर्शनी धवड, साक्षी राऊत, उपायुक्त रवींद्र देवतळे, क्रीडा अधिकारी हर्षल पिवरखेडकर, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, जितेंद्र गायकवाड, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना नागेश सहारे म्हणाले, सध्या लोप पावत असलेल्या खेळांना महत्त्व देण्यासाठी मनपाचा क्रीडा विभाग पुढाकार घेत आहे. यामध्ये आटापाट्या, धनुर्विद्या, महिला फुटबॉल, रायफल शुटींग, कॅरम, बुद्धीबळ खेळांचा समावेश आहे. ‘महापौर चषक’अंतर्गत या स्पर्धांचे आयोजन  नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी केली. यापूर्वी कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती, सायकल पोलो यासारख्या खेळांचे आयोजन महापौर चषक अंतर्गत करण्यात आलेले होते. या स्पर्धांचाही समावेश यात राहणार असल्याची माहिती सभापती नागेश सहारे यांनी दिली.
 
मनपा क्षेत्रात असलेल्या सर्व शाळांच्या आंतर शालेय स्पर्धांचे आयोजन मनपाच्यावतीने कऱण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा अधिकारी हर्षल पिवरखेडकर यांनी दिली. नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत मागील वर्षी या आयोजनात जे अधिकारी होते, त्यांची पुढील महिन्यात बैठक बोलविण्याचे आदेश क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी दिले.
 
शहरातील कलावंतांना वाव मिळावा याकरिता मनपाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये एकांकिका स्पर्धा, महानाट्य स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन मनपाच्या वतीने करण्यात येणार आहे. मनपाच्या शाळांकरिता क्रीडा धोरण ठरविण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली.   
 

 

मनपाच्या वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

महापौरांनी दिली वृक्ष जगविण्याची शपथ : पहिल्या दिवशी १४६३ झाडे लावली
 
नागपूर,ता.१ : नागपूर महानगरपालिकेच्या वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभांरंभ महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी प्रत्येकी झाड लावून केला. राज्य शासनाने सुरू केलेल्या महावृक्षारोपण मोहिमेला आजपासून सुरूवात झाली. त्याअंतर्गत महानगरपालिकेद्वारे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन सिव्हिल लाईन्स स्थित ऑल सेंट कैथड्रल चर्च परिसरात करण्यात आले होते. शहरातील प्रत्येक प्रभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी एकूण १४६३ झाडे लावली.
 
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, नगरसेवक निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त अजीज शेख, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी, नेचर कन्झरव्हेशनचे श्रीकांत देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी वृक्षारोपण करण्याचे महत्व विषद करीत, प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते  जगवावे असा संदेश देत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची शपथ दिली. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करणे व वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शहरातील पर्यावरण प्रेमी संघटना, समाजसेवी संस्थानी वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे आज शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. डॉ.हेडगेवार लाईब्ररी व उद्यानात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी बारसेनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी दर्शन कॉलनी उद्यानात वृक्षारोपण केले. लक्ष्मीनारायण मंदिर उद्यानात जैवविविधता समितीच्या सभापती दिव्या धुरडे, नगरसेवक हरिश दिकोंडवार यांनी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती यांनी रवीनगर उद्यानात, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे यांनी लता मंगेशकर उद्यानात , आशीनगर झोन सभापती वंदना चांदेकर यांनी वैशालीनगरातील तथागत बौद्ध विहार परिसरात, मनपाच्या उपनेत्या वर्षा ठाकरे यांच्या हस्ते अंबाझरी उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. सी.पी.क्लब येथे ग्रीन व्हिजील संस्था आणि रोटरी कल्ब यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय शहरातील ३८ प्रभागांमध्ये वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली.
 
महर्षी दयानंद पार्क येथे साकारणार तुळशी उद्यान : वीरेंद्र कुकरेजा 
 
उत्तर नागपूरच्या हॄदयस्थळी सहा एकरात असलेल्या जरीपटका स्थित दयानंद पार्क येथे  स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उद्यान परिसरात अशोका, निलगिरी, निम, आपरा, तुळशी, कडुलिंब या जातीचे १५० झाडे लावण्यात आले. दयानंद पार्क जवळील बॅडमिंटन हॉलच्या बाजुला तुळशी उद्यान तयार करण्यात आले असून या संपूर्ण उद्यानात तुळशीचे विविध प्रकारचे १०० रोपटे लावण्यात आले आहेत. या ठिकाणी बफे योगा क्लब, डी.पी.योगा कल्ब तर्फे नियमित योग प्रशिक्षण दिले जाते. या तुळशी उद्यानातून प्राणवायू मिळणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचे पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांनी कौतुक केले आहे.
 
यावेळी दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रमिला मंथरानी, नगरसेविका सुषमा चौधरी, योग शिक्षक राजू सचदेव, लालचंद केवलरामानी, प्रीतम मंथरानी, महेश मेघाणी, अर्जून गंगवानी, विलास गजभिये, मुरवी कुंभवानी, अनिल पमनानी, संजय अंबादे, प्रीतम भोजवाणी, राकेश वाघवाणी, हरिश हेमराजानी, मंजू गंगवाणी, राजकुमारी अजवाणी, घनश्याम गोहाणी, सुधीर मेश्राम, सत्यवान साखरे, संजय चौधरी, जीवन मेश्राम, उद्यान निरिक्षक अनंत नागमोते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

 

 

जिव्हाळा फाऊंडेशनच्या आरोग्य शिबिराचा घेतला शेकडो रुग्णांनी लाभ आ. आंबटकर, आ. कोहळे यांचा सत्कार

नागपूर,ता. १ :  जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने सेव्हन स्टार हॉस्पीटलच्या सहकार्याने गणेश नगर नंदनवन परिसरातील महावीर उद्यान येथे आयोजित आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.
 
शिबिराचे उद्‌घाटक आमदार गिरीश व्यास होते तर  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर शेखर सावरबांधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र भाजपचे महामंत्री आमदार रामदास आंबटकर, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, कोलकाता भाजपचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीनारायण ओझा, नगरसेविका नेहा वाघमारे, डॉ. सदाशिव भोले, जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष मनीष मेश्राम, सचिव तुषार महाजन उपस्थित होते.
 
उपस्थित मान्यवरांनी भारत मातेच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी बोलताना आ. गिरीश व्यास म्हणाले, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची काळजी घेण्याचा हा प्रयत्न आहे. या शिबिरातून हृदयरोग अथवा अन्य दुर्धर रोगाचे रुग्ण आढळल्यास त्यांना शासनाच्या माध्यमातून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमदार रामदास आंबटकर म्हणाले, रुग्णसेवा म्हणजे ईशसेवा असते. नागपूर शहरातील विविध परिसरात जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे असे आरोग्य शिबिर राबवून त्यांना उत्कृष्ट आरोग्यसेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. जिव्हाळा फाऊंडेशनच्या या कार्यात आपण नेहमी सोबत असू, असा विश्वास त्यांनी दिला. आमदार सुधाकर कोहळे म्हणाले, नागपूर शहरातील तळागळातील माणसांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आमचे सतत प्रयत्न आहेत. ‘जिव्हाळा’सारख्या संस्थांची यात मोठी मदत होती. वृक्षारोपणाच्या कार्यातही जिव्हाळा फाऊंडेशनचा वाटा मोठा आहे. त्यांच्या कार्यास आपल्या शुभेच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने आमदार गिरीश व्यास यांच्या हस्ते आमदार रामदास आंबटकर हे विधानपरिषदेवर निवडून आल्याबद्दल आणि आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह त्यांच्याही वाढदिवसानिमित्त दोघांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. सदाशिव भोले यांचाही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. १ जुलै हा ‘डॉक्टर डे’ असल्यामुळे आरोग्य शिबिराच्या निमित्ताने उपस्थित सर्व डॉक्टरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जिव्हाळा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष चंदू धांडे यांनी केले. यानंतर आयोजित आरोग्य शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी आपल्या विविध तपासण्या करवून घेतल्या. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी राजू तितरे, अजय पाठक, डॉ. सुमित पैडलवार, अक्षय ठाकरे, लता होलघरे, विनोद कोटांगळे, मिथून हटवार, निखिल कावळे, अभिजित सरोदे, जय नांदुरकर, अंगद जळूरकर, योगिता धानोरकर, अश्विन बांगडे, सिद्धेश झलके, ऋषिकेश हिंगे, अनुज शहारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

खोदकाम करणाऱ्या कंपन्यांनी मनपाच्या निर्देशाची अंमलबजावणी करावी : संजय बंगाले

नागपूर,ता. ३० : शहरात विविध ठिकाणी विविध कंपन्यांकडून खोदकाम सुरू असते. दूरसंचार कंपनी असो वा विद्युत कंपनी. त्यातच महापालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर सीमेंटचे रस्ते बांधकाम सुरू आहे. बांधकाम करत असताना खोदकामादरम्यान पाईपलाईन किंवा केबल लाईन तुटल्याची घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे खोदकाम करणाऱ्या कंपनींनी अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत काम करावे, मनपाच्या निर्देशाची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले.
 
शहरात खोदकाम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कंपन्याच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, उपनेते बाल्या बोरकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डी.डी.जांभुळकर, गिरिश वासनिक, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना संजय बंगाले म्हणाले, शहरात ज्या ठिकाणी खोदकामे सुरू करत आहेत, त्या ठिकाणच्या झोनल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या झोनचा कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांच्याशी संपर्क साधावा, असे निर्देश त्यांनी दिले. खोदकाम करणाऱ्या सर्व कंपनींच्या प्रतिनिधींचा आणि मनपाच्या अधिकाऱ्यांचा वॉटस्अप ग्रुप तयार करून एकमेकांत समन्वय साधण्यासाठी परिपत्रक आयुक्तांमार्फत काढण्यात यावे, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले. समन्वयचा अभाव असल्याने अशाप्रकारच्या घटना घडत असतात, त्या यानंतर घडणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना सभापती संजय बंगाले यांनी केली. बैठकीला महामेट्रो, एसएनडीएल, एलअण्डटी, जीओ, बीएसएनएल, एनएचएआय, बांधकाम विभाग,एमएसईबी या विभागांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.  

 

 

मनपातील ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

नागपूर,ता. ३० : नागपूर महानगरपालिकेच्या सेवेतून आज शनिवारी (३० जून) निवृत्त झालेल्या विविध विभागातील ४० कर्मचाऱ्यांचा सत्कार मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात करण्यात आला.
 
सत्कार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निगम अधीक्षक राजन काळे, सहायक अधीक्षक (भविष्य निर्वाह निधी) दत्तात्रय डहाके, सहायक अधीक्षक (सामान्य प्रशासन विभाग) मनोज कर्णिक, सहायक अधीक्षक सुषमा ढोरे, डोमाजी भडंग, अजय माटे, प्रकाश सहारे, किशोर तिडके, दिलीप देवगडे प्रामुख्याने उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मान्यवरांनी शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे आणि भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देऊन सत्कार केला. सत्कारमूर्तींमध्ये राजस्व निरीक्षक एस. ए. जाधव, उच्च श्रेणी लिपिक एम. एस. टाकतोडे, श्रीमती के. एम. चराटे, कनिष्ठ लिपिक एच. एच. बेले, बशीर खान लाल खान पठाण, आर.जी. इंगोले, एम.एस.डब्ल्यू. अल्ताफ खान वजीर खान, हवालदार मीर अबीद अली उस्मान अली, मालवाहक जमादार एस. एल. होले, ए.एन.एम. श्रीमती जी. एस. डगवार, चालक बी.डी. रामटेके, एम.एस. डब्ल्यू. आर. दुबे, मुख्याध्यापक श्रीमती सुनिता पहापळकर, श्रीमती प्रेरणा मुलकुलवार, श्रीमती खिलहत जहाँ अहमद खान, सहायक शिक्षिका श्रीमती रेखा शेंडे, सहायक शिक्षिका श्रीमती नंदा वालदे, श्रीमती खुर्शीद बेगम अन्सारी उर्फ आसीफ अख्तर, श्रीमती अशरफी रहमतुलिसा, चपराशी अशोक सरोदे, श्रीमती उषा गोखे, एस.पी. आसरे, मजदूर श्रीमती तारा धुपे, गजानन गभने, जगदीश उईके, हॅन्ड्रंट कुली केवल खोटे, क्षेत्र कर्मचारी अब्दुल सलीम शेख इसराल, प्रेमदास बावणे, रेजा श्रीमती सुशीला दरवाडे, मजदूर मदन शाहू, चपराशी मनोहर मेंढे, अब्दुल रफिक रहीम बक्स, रमन निमगडे, श्रीमती आशा रामटेके, अटेंडंट उमेश पत्रे, सफाई कामगार श्रीमती लक्ष्मी तांबे, सुरेश बक्सरे, जगन शेंडे, श्रीमती शकून गैतेल यांचा समावेश होता.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आणि आभार प्रदर्शन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले.    

 

 

सीमेंट रस्त्यांना जोडणारे सर्व चौक तातडीने समतल करा!

सभापती संजय बंगाले यांचे निर्देश : स्थापत्य व प्रकल्प समितीचा घेतला आढावा
 
नागपूर,ता. ३० : दोन रस्त्यांना जोडणारा चौकातील भाग समतल करण्याचे काम तातडीने करण्यात यावे, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले. शनिवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात स्थापत्य व प्रकल्प समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, समिती उपसभापती किशोर वानखेडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, समिती सदस्य भगवान मेंढे, राजुकमार साहू, जितेंद्र घोडेस्वार, सदस्या पल्लवी श्यामकुळे, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, तांत्रिक सल्लागार विजय बनगीनवार, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, गिरीश वासनिक, सी.जी.धकाते, उपअभियंता शकील नियाजी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना सभापती बंगाले म्हणाले, सीमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरीही जंक्शनला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा आढळतो. त्या खड्ड्यामुळे गाडी अडखळते. याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे जंक्शनला जोडणाऱा रस्त्यावरचा भाग तातडीने जोडण्यात यावा, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले. ज्या भागात कामे सुरू आहे, त्या भागातील नगरसेवकांना कामाबद्दल माहिती द्या, अशा सूचनाही सभापती संजय बंगाले यांनी केल्या. जंक्शन तयार करताना एक ‘डेमो जंक्शन’ तयार करून त्याआधारावर शहरातील सर्व जंक्शन तयार करण्याच्या सूचना आपल्या कंत्राटदारांना देण्याचे निर्देश सभापती बंगाले यांनी दिले. सीमेंट रस्ता बांधताना पाण्याचा निचरा होईल, ते रस्त्यावर तुंबणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
यावेळी शहरात सुरू असलेल्या सीमेंटच्या रस्त्यांच्या तिन्ही टप्प्यांचा आढावा सभापतींनी घेतला. पूर्ण झालेल्या सीमेंट रस्त्याचा थर्ड पार्टी ऑडिट अहवाल समितीपुढे सादर करण्यात यावा, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले. मनपाच्या कंत्राटदारांची मर्यादा तीन वर्षांची वरून दहा वर्षांची करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले. सीताबर्डी मोरभवन मागील डीपी रस्त्याच्या सद्यस्थितीचा आढावा सभापतींनी अधिकाऱ्यांमार्फत घेतला. ४ जुलैपासून अधिवेशन सुरू होत आहे. तो रस्ता जर पूर्ण झाला असेल तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात यावे, अशी सूचना सभापती संजय बंगाले यांनी दिली.        
 

 

 

शिवाजी महाराजांच्या अनुकरणासाठी सेवेचे व्रत स्वीकारा : ना. नितीन गडकरी
 
यशोधरा नगरातील शिवाजी चौकात छत्रपतींच्या   पूर्णाकृती म्यूरलचे लोकार्पण
 
नागपूर,ता. ३० : छत्रपती शिवाजी महाराजांना यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवान जाणता राजा असे संबोधले जाते. पिता कसा असावा, राजा कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज होय. या देशाचे पहिले धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा राजाचे अनुकरण करायचे असेल तर आयुष्यात सेवेचे व्रत स्वीकारा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने यशोधरा नगर पोलिस ठाण्याजवळ योगी अरविंदनगर परिसरातील शिवाजी चौकात तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती म्यूरल प्रतिमेचे लोकार्पण आज शनिवारी (ता. ३०) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मनपातील बसपाचे पक्षनेते मो. जमाल, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, संदीप जाधव, आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, नगरसेविका भाग्यश्री कानतोडे, सुषमा चौधरी, निरंजना पाटील, नसीम बानो इब्राहिम खान, प्रमिला मंथरानी, नगरसेवक शेषराव गोतमारे, संजय चावरे, परसराम मानवटकर, डॉ. विंकी रुग्वानी, भाजपचे महामंत्री गणेश कानतोडे, माजी नगरसेवक बंडू तळवेकर, दिलीप गौर, माजी नगरसेवक प्रभाकर येवले, मो. इब्राहिम, रमेश वानखेडे,बंडू पारवे, संजय चौधरी, आसीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड आदी उपस्थित होते.
 
पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, सर्व धर्माचा सन्मान करणे, जात, धर्म, पंथ याही उपर जाऊन विचार करणे, ही आमची संस्कृती आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही केंद्रात आणि राज्यात काम करीत आहोत. शोषित, वंचितांसाठी समाजातील दुर्बल घटकासाठी काम करीत आहोत म्हणूनच लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला. नागपूरकर जनतेने निवडून दिल्यामुळे आज देशभरात रस्त्याचे जाळे तयार करीत आहोत. नागपूरच्या भविष्यासाठी मेट्रोचे काम करीत आहोत. नागपूर शहराचा वेगाने कायापालट होत आहे. हे करीत असताना या भागातील जनतेला आरोग्य सेवेचा लाभ देताना समाधान वाटते. मी सेवा कार्यालाच राजकारण मानतो. सहा हजारांपेक्षा अधिक लोकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया, सुमारे एक लाख महिलांची स्तन कर्करोग तपासणी, त्यातील कर्करोग आढळून आलेल्या दोन हजार महिलांवर उपचार, देशभरातील १० करोड महिलांना गॅस कनेक्शन, नागपुरातील एक लाख २० हजार महिलांना त्याचा लाभ, हे सर्व करताना आनंद वाटतो. यातून वेगळे समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
वर्धा, भंडारापर्यंत ब्रॉडगेज मेट्रो
 
नागपूरचा झपाट्याने विकास होत असताना नागपूरजवळील शहरे मेट्रोने जोडण्याचा मानस असल्याचे ना. नितीन गडकरी यांनी म्हटले. लवकरच नागपूर-वर्धा, नागपूर-भंडारा, रामटेक-काटोल ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. वर्धा-नागपूर एसी मेट्रोमध्ये केवळ अर्धा तासात कापणे भविष्यात शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
गरीबांना फर्निचरयुक्त घरे
 
नागपूर जिल्ह्यातील गरिबांना पंतप्रधान आवास योजनेतून ५० हजार घरे देण्याचा संकल्प आहे. त्यापैकी आठ हजार घरांचे काम सुरू आहे. या घरांमध्ये डबल बेड, सोफासेट राहणार असून सोलर हिटर आणि मोफत वीज देण्याचेही प्रस्तावित आहे. केवळ साडे तीन ते चार लाख रुपयांत ही घरे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ५२ एकर जागेवर १० हजार घरांची निर्मिती सुरू होणार असल्याचा उल्लेखही ना. नितीन गडकरी यांनी केला.
 
प्रदुषणमुक्त, प्लास्टिकमुक्त नागपूर
 
नागपूर हे आपले घर आहे अशी मानसिकता जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत नागपूर स्वच्छ होणार नाही. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या नागपुरातील प्रत्येक व्यक्ती स्मार्ट व्हायला हवा. अर्थातच प्लास्टिकबंदी, शून्य प्रदूषण करायचे असेल तर आता प्रत्येक व्यक्तीने या मोहिमेत योगदान द्यायला हवे. कचरा कचरापेटीतच टाका. कचऱ्याचे विलगीकरण करा, प्लास्टिक वापरू नका, असा संदेश ना. गडकरी यांनी दिला.
 
जरीपटका पुलासाठी ६५ कोटी
 
देशात रस्ते बांधत असताना नागपूर महानगरपालिकेलाही आपण पैसा देत असल्याचे त्यांनी सांगितले. कालच नागपूरसाठी पुन्हा ७०० कोटी आणल्याचा उल्लेख करीत जरिपटका पुलासाठी ६५ कोटी मंजूर केल्याचे ना. नितीन गडकरी यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
 
देखण्या पूर्णाकृती म्यूरलचे लोकार्पण
 
प्रारंभी ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते देखण्या, अप्रतिम राजे शिवछत्रपती यांच्या पूर्णाकृती म्यूरल प्रतिमेचे लोकार्पण करण्यात आले. तुतारी, ढोल, ताशे आदींच्या गजरात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी महाराजांना अभिवादन केले. नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शिवस्मारक उत्सव समितीने सहकार्य केले. लोकार्पणानंतर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भाजपचे महामंत्री गणेश कानतोडे यांनी केले. संचालन महेश संगेवार यांनी केले. आभार नंदू कावळे यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

 

 

प्रवीण दटके यांनी घेतला बीओटी आणि पीपीपी प्रकल्पांचा आढावा

नागपूर,ता.२९ : नागपूर महानगरपालिकेचे राज्य सरकार व केंद्र सरकारकडे प्रस्तावित असलेल्या बीओटी आणि पीपीपी प्रकल्पांचा आढावा माजी महापौर प्रवीण दटके यांनी शुक्रवारी (ता.२९) मनपा मुख्यालायातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.
 
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, स्थापत्य व समिती सभापती संजय बंगाले, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, सहायक आयुक्त सर्वश्री सुभाष जयदेव, राजेश कराडे, राजू भिवगडे, अशोक पाटील, तांत्रिक सल्लागार विजय बनगीनवार प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी महानगरपालिकेच्या प्रस्तावित ऑरेंज सिटी प्रकल्प, बुधवार बाजार महाल आणि सक्करदरा, महाल आणि डिग दवाखाना, डिपी रस्ता, दहनघाट, देवडिया दवाखाना, साई प्रकल्प, स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक, चिटणवीसपुरा इत्यादी प्रकल्पांचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला.  

 

 

जैव विविधतेसंदर्भातील माहितीचे पुस्तक काढण्याचा मानस : महापौर नंदा जिचकार

शहरातील सर्व जैविक विविधतेची यादी तयार करण्याचे समितीला निर्देश
 
नागपूर,ता.२९ : जैविक विविधतेचे जतन करणे अत्यावश्यक असून काळाची गरज आहे. शहरातील सर्व जैव विविधतेची यादी जैव विविधता समितीने तयार करावी, असे निर्देश देत जैव विविधतेवर आधारीत माहितीचे एक पुस्तक तयार करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.
 
शुक्रवारी (ता.२९) मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयात जैव विविधता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद आणि जैव विविधता समिती सभापती दिव्या धुरडे,  समिती सदस्य निशांत गांधी, सोनाली कडू, सुषमा चौधरी, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार,   नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक श्री.महाजन,   जैव विविधता विभागाच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती तलमले, पर्यावरण महामंडळाचे मानस बडगे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी महापौरांनी शासनाच्या जैव विविधतेच्या कार्याची माहिती विभागीय वन अधिकारी श्रीमती तलमले यांच्याकडून जाणून घेतली. नागपूर शहरात जैवविविधता कुठे कुठे आढळून आली आहे, याची यादी तयार करण्याचे निर्देश महापौरांनी जैव विविधता समितीला दिले. शासनाच्या जैव विविधतेचे मुख्यालय हे नागपुरातच असल्याने त्याचा फायदा आपल्याला करता यायला हवा, असेही त्या म्हणाल्या.
 
जैवविविधेतेच्या कामकाजाचा आढावा यावेळी महापौरांनी घेतला. समितीद्वारे तयार करण्यात आलेल्या नोंदवही आणि राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली. यापुढे जैव विविधता समितीने महाराष्ट्र शासनाच्या जैविक विविधता विभागाचे सहकार्य घ्यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
समितीअतंर्गत किंवा शासनाच्या जैव विविधता विभागाद्वारे शहरातील अंबाझरी, बॉटनिकल, जपानी गार्डन यासारख्या उद्यानांमध्ये उपक्रम राबवायला हवे. यामाध्यमातून जैविक विविधतेबाबतची जनजागृती मोठ्या प्रमाणावर होईल, अशी सूचना महापौर नंदा जिचकार यांनी केली. 

 

 

वृक्ष लागवड अभियानात जनतेचा सहभाग वाढवा : महापौर नंदा जिचकार

वृक्षारोपण अभियानाची तयारी अंतिम टप्प्यात : महापौरांनी घेतला आढावा
 
नागपूर,ता. २९ : राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकाही ५० हजारांवर वृक्ष लागवड करणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या जागांवर जेथे लावलेल्या झाडांची काळजी नियमितपणे घेतल्या जाईल अशा ठिकाणी ५० हजारांवर वृक्ष आपण लावणारच आहोत. याव्यतिरिक्त या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग वाढविण्यासाठी वॉर्डावॉर्डात नगरसेवकांच्या माध्यमातून बैठका घ्या आणि एक लाखांवर वृक्षारोपण करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
१ जुलैपासून प्रारंभ होणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेच्या तयारीच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. २९) आढावा बैठकीचे आयोजन महापौर कक्षात करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. बैठकीला मनपातील सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेविका सोनाली कडू, आयशा नेहरू उईके, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, वृक्षारोपण करून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यायला हवा. मनपाने यासाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील लोकांना यासाठी उद्युक्त करावे. १ जुलैला मोहिमेचा शुभारंभ होत आहे. त्यानंतर लगेच स्वयंसेवी संस्थांची बैठक घेऊन त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
तत्पूर्वी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी वृक्षलागवड मोहिमेच्या तयारीची माहिती दिली. नागपूर शहरातील उद्याने, कॉलनी, शाळा, दवाखान्याच्या परिसर आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या जागांवर ट्री गार्डची आवश्यकता नाही, अशाच आहेत. याव्यतिरिक्त शहरातील नागरिकांकडून रोपट्यांची मागणी आल्यास मनपातर्फे उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती श्री. चौरपगार यांनी दिली. संपूर्ण मोहिमेचे प्रभागनिहाय नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
 
१ जुलैला मोहिमेचा शुभारंभ
 
नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ १ जुलै रोजी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते होणार आहे. १ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता प्रतापनगरातील डॉ. हेडगेवार उद्यान येथे पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्य कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता सदर येथील व्ही.सी.ए. मैदानासमोरील चर्च परिसरात आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी सर्व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहतील.

 

 

विकासकामाकरिता केलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे : महापौर

मेट्रो रेल्वे, नासुप्र, मनपाच्या समन्वयाने कामे करण्याचे निर्देश
 
नागपूर,ता. २८ : शहरात विविध संस्थांतर्गत विकास कामे सद्यपरिस्थितीत सुरू आहे. पावसाळा सुरू झाला आहे. चार जुलैपासून पावसाळी अधिवेशनही सुरू होत आहे. त्यापूर्वी शहरातील विकासकामाकरिता केलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
शहरातील विविध विकासकामाचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी गुरूवारी (ता.२८) ला मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात मेट्रो रेल्वे, नासुप्र, मनपा यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली.  
 
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, मनपाचे उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, डी.डी.जांभूळकर, सी.जी. धकाते, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौगंजकर, एल ॲण्ड टी चे धनंजय कोंडावार, नागपूर मेट्रो रेल्वेचे अरूण सक्सेना, स्वामीनाथन एस., के. सुशील कुमार, एन.व्ही.पी.विद्यासागर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
शहरामध्ये सुरू असलेल्या सीमेंटच्या रस्त्यांचा आणि हॉटमिक्सच्या कामाचा झोननिहाय आढावा महापौर नंदा जिचकार यांनी कार्यकारी अभिंयत्यांमार्फत घेतला. नागपूर मेट्रो रेल्वेच्या प्रगतीपथावर असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामाची स्थितीबाबत आढावा महापौरांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून घेतला. मेट्रो रेल्वेने शहरात काम सुरू असताना मनपाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्यांच्याशी समन्वय न साधल्याने मोठ्या समस्या निर्माण होत आहे. यासाठी सातत्याने सर्व विभागांत समन्वय असणे आवश्यक आहे. यानंतर मेट्रो रेल्वे मनपाच्या जलप्रदाय, आरोग्य, बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधत काम करेल, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
ज्या भागात काम सुरू आहे, त्या भागातील नगरसेवक व झोन सहायक आयुक्तांना बांधकामाबाबत सूचित करावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. ४ जुलै पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविण्यात यावे, याशिवाय पावसाळा सुरू झाला आहे. नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहे, त्यामुळे खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
मेट्रो रेल्वेने बांधकाम करताना कुठे पाईपलाईन आहे, कुठे सीवर लाईन, गडर लाईन आहे या माहितीसाठी मनपाच्या जलप्रदाय, ओसीडब्ल्यू, आरोग्य या विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्तिक दौरा करावा, अशा सूचना महापौर नंदा जिचकार यांनी केल्या. जियोद्वारे करण्यात आलेल्या कामाचा आढावा यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी घेतला.  

 

 

मोक्षधाम पुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटेल : महापौर

पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुलाचे लोकार्पण
 
नागपूर,ता.२ : मोक्षधाम ते सरदार पटेल चौक ग्रेट नाग रोड दरम्यान असलेल्या नाग नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण गुरुवारी (ता. २८) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले.
 
उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, स्थायी समितीचे माजी सभापती संदीप जाधव, नगरसेवक विजय चुटेले, किशोर जिचकार, प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षला साबळे, लता काडगाये, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, सहायक आयुक्त राजू भिवगडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, कंत्राटदार मेडपल्लीवार, मनोज साबळे उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते प्रारंभी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यानंतर नवनिर्मित पुलाचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व सर्व मान्यवरांनी पुलावरून पायी चालत पुलाचे निरीक्षण केले. याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मोक्षधाम ते ग्रेट नाग रोड दरम्यान असलेल्या नागनदीवरील पुलाचे काम रखडल्याने नागरिकांना बराच त्रास झाला. विशेष प्रकल्प समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केलेत. आता हा पूल जनतेसाठी खुला झाल्याने या परिसरातील वाहतुकीतीची कोंडी सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
भर पावसात झालेल्या लोकार्पण सोहळ्याला नागरिकांची उपस्थिती होती.

 

 

बाजारातून मनपाचे उत्पन्न वाढविणारा अंमलबजावणीयोग्य आराखडा तयार करा !

स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे निर्देश
 
नागपूर,ता.२८ : नागपूर शहरातील मनपाने लीजवर दिलेल्या बाजारातील दुकानांची आणि परिसरातील स्थिती वाईट आहे. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. यासंपूर्ण बाजारांचा पुन्हा एकदा सर्वे करून आवश्यक बाबींचा तपशील मांडण्यात यावा. याच बाजारांतून मनपाचे उत्पन्न वाढेल, असा अंमलबजावणीयोग्य प्रशासकीय आराखडा तयार करा, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
 
नागपूर शहरातील बाजारांची सुस्थिती व दुरुस्ती, अधिकृत व अनाधिकृत बाजार, दुकाने तसेच बाजार व दुकानांद्वारे मिळणारे भाडे वसुली याबाबत माहिती घेण्याच्या दृष्टीने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मनपाती सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त विजय हुमणे उपस्थित होते.
 
यावेळी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी गोकुळपेठ, महात्मा फुले मार्केट, सुभाष रोड मार्केट, न्यू एस.टी. स्टॅण्ड मार्केट, कमाल चौक मार्केट, मंगळवारी मार्केट यासह अन्य बाजारांमध्ये असलेली एकूण दुकाने किती, त्यातील किती दुकाने रिक्त आहेत, त्यावर कोणाचे अतिक्रमण आहे का, रिक्त दुकानांसाठी जाहिरात काढली आहे का, या सर्व बाबींचा त्यांनी आढावा घेतला. सहायक आयुक्त (बाजार) विजय हुमणे यांनी याबाबतची माहिती सभापती व पदाधिकाऱ्यांपुढे मांडली. यातील जे दुकानदार किराया देत नाही त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, बाजारात ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यात यावे. ज्यांच्या नावे दुकान देण्यात आले आहे, त्याच दुकानदाराने तेथे दुकान थाटले आहे काय, याबाबतची सविस्तर माहिती गोळा करण्यात यावी, असे निर्देशही सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
 
जेथे बाजार आहे तेथे महानगरपालिकेतर्फे सर्व सुविधा पुरविण्यात याव्या, सर्व बाजारांची देखरेख योग्य प्रकारे करण्यात यावी, साफसफाई नियमित करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले. बाजारांतील गाळेधारकांकरून वसूल करण्यात येणाऱ्या किरायासंदर्भात ‘पॉलिसी’ बनविण्याचे निर्देशही सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

 

 

स्वच्छतेत नागपूरला करणार ‘टॉप’

स्वच्छता ॲम्बेसेडर्सचा निर्धार : स्वच्छता अभियानाची परिणामकारकता वाढविणाचा निर्णय
 
नागपूर, ता. २६ : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सन २०१७-१८ च्या स्वच्छ सर्वेक्षणानंतर नागपूर शहराने मुसंडी मारत ४८५ शहरांमधून देशात ५५ क्रमांक पटकाविला. राज्यात १० व्या क्रमांकाने येण्याचा मान पटकाविला. नागपूरने मागील वर्षीच्या तुलनेत ८२ क्रमांकाची सुधारणा झाली. हे यश पदाधिकारी, प्रशासन, स्वच्छता ॲम्बेसेडर, स्वच्छता कर्मचारी आणि संपूर्ण नागपूरकरांचे आहे. यात प्रत्येकाचा वाटा आहे. पुढील वर्षी नागपूर स्वच्छता अभियानात देशात ‘टॉप टेन’च्या यादीत राहील, असा निर्धार आज (ता. २६) स्वच्छता ॲम्बेसेडर्ससह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केला.
 
स्वच्छता अभियानातील शहरांच्या क्रमांकाची यादी जाहीर झाल्यानंतर त्याची माहिती देण्याच्या दृष्टीने आणि चालू वर्षातील स्वच्छता अभियानात करावयाच्या तयारीच्या अनुषंगाने मंगळवारी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या विशेषत्त्वाने नागपूर महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या ‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ची उपस्थिती होती. बैठकीला आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर, अनिरुद्ध चौगंजकर, स्वच्छता ॲम्बेसेडर डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. उदय बोधनकर, कौस्तभ चॅटर्जी, आर.जे. निकेता साने यांची उपस्थिती होती.
 
यावेळी अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छता क्रमवारीसंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. यावर्षी होणाऱ्या सर्वेक्षणात नागपूर शहराला कुठे अधिक काम करावे लागेल, कुठल्या क्षेत्रावर अधिक भर द्यावा लागेल, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी बोलताना आयुक्त वीरेंद्र सिंह म्हणाले, मागील वर्षी ज्या क्षेत्रात चांगले गुण मिळाले त्या क्षेत्रात काम करूच. मात्र, जेथे कमी गुण मिळाले, तेथे काय करता येईल, याचा विचार स्वच्छता ॲम्बेसेडर आणि संबंधित अधिकाऱ्यांनी करायला हवा. नागपूर शहरातील प्रत्येक व्यक्तीने ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड करायला हवे, यादृष्टीने प्रयत्न यावर्षी व्हायलाच हवे. स्वच्छतेच्या बाबतीत लोकांची मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. यासाठी पोस्टर्स, बॅनर्स, जाहिराती, होर्डींग, शहर बसवरील जाहिरता यासोबतच वस्त्यांमध्ये पथनाट्य यावर्षी करण्यात यावे. रेडिओ, टिव्हीवरील जाहिरातीसोबतच कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवर मनोरंजक मात्र संदेश देणारी गाणी वाजविण्यात यावी, जेणेकरून त्यातून जनजागृती होईल. यावर्षीची स्पर्धा अधिक कठीण आहे. कारण नागपूरच्या समोर असलेली ५४ शहरे आता अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, त्याहीवर आपल्याला खूप चांगले करायचे आहे. पुढील वर्षीचा स्वच्छता पुरस्काराचे यजमानपद नागपूरकडे यायला हवे, पर्यायाने त्यासाठी नागपूर स्वच्छता अभियानात टॉपवर राहायला हवा, त्यासाठी आता आपले प्रयत्न राहायला हवे. या अपेक्षेसह आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी स्वच्छता अभियानाच्या तयारीला लागा, असे आवाहन केले. यापुढे दर १५ दिवसांनी कार्यालयीन आढावा बैठक आणि प्रत्येक महिन्याला स्वच्छता ॲम्बेसेडर्ससोबत बैठक आयोजित करण्यात यावी, असेही निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. बैठकीला सहायक आयुक्त विजय हुमणे, राजेश कराडे, प्रकाश वऱ्हाडे, गणेश राठोड, महेश मोरोणे, राजू भिवगडे, सुभाष जयदेव, स्वयंसेवी संस्थेच्या लिना बुधे आणि झोनल अधिकारी उपस्थित होते.
 
चर्चा आणि सूचना
 
सदर बैठकीत सहभागी झालेल्या स्वच्छता ॲम्बेसेडर्सनी यावर्षी स्वच्छता अभियान राबविताना काय करायला हवे, याबाबत उपयुक्त सूचना केल्या. डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी शहरातील सुरेश भट सभागृह आणि अन्य सभागृहात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमादरम्यान स्वच्छता अभियानाविषयी माहिती देण्याची सूचना केली. आर.जे. निकेता साने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचता येते. त्यामुळे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याची सूचना केली. कौस्तभ चॅटजी यांनी स्वच्छता ॲप डाऊनलोडवर भर देतानाच त्यावर येणाऱ्या तक्रारींची तातडीने सोडवणूक करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सोबतच जेथे आता मेहनत घेण्याची आवश्यकता आहे, अशा क्षेत्रावर मेहनत घेण्याची सूचना केली. डॉ. उदय बोधनकर यांनी स्वच्छता ॲम्बेसेडरचा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कसा उपयोग करून घेता येईल, याबाबत प्रशासनाने मार्गदशन करावे, आम्ही हवा तेवढा वेळ या कार्यासाठी देण्यास कटिबद्ध आहो, असे सांगितले.
 
महत्त्वाच्या मुद्यांवर देणार भर
 
स्वच्छता सर्वेक्षणाच्या दृष्टीने जे विषय महत्त्वाचे आहे, त्यावर अधिक भर देण्यासंदर्भात सदर बैठकीत चर्चा झाली. बाजार आणि महत्त्वाच्या भागात रात्रीही कचऱ्याची उचल होणार, कचरा संकलन केंद्राचे सौंदर्यीकरण, मास्क, गम शूज आदी वस्तू सफाई कर्मचाऱ्यांनी घालायलाच हव्या, शहरात लावण्यात आलेल्या कचरापेट्यांना सेंसर बसविणे, ओला आणि सुखा कचऱ्याचे निर्मितीस्थळावरच विलगीकरण करणे, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांची संख्या निश्चित करून त्यांच्याकडून शुल्क आकारणे आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावर्षी भर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

 

 

मनपाद्वारे हिवताप प्रतिरोध बाईक रॅलीचे आयोजन

नागपूर, ता. २६ : नागपूर महानगरपालिकेद्वारे जून २०१८ हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून शासन निर्णायानुसार साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत लक्ष्मीनगर झोनमध्ये बाईक रॅलीचे आयोजन मंगळवारी (ता.२६) ला करण्यात आले. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.
 
यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, अग्निशमन समिती सभापती लहूकुमार बेहेते, मीनाक्षी तेलगोटे, पल्लवी श्यामकुळे, झोनल अधिकारी, रामभाऊ तिडके, उपअभियंता रवींद्र मुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी हिवताप व हत्तीरोग या रोगाविषयी जनजागृती करण्यात आली. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी सर्व उपपथकांच्या ३०० कर्मचा-यांना किटकजन्य आजाराबाबत प्रतिज्ञा दिली. त्यानंर बाईक रॅलीचा शुभारंभ झाला.
 
ही रॅली लक्ष्मीनगर झोन कार्यालय, माटे चौक पेट्रोल पंप, अत्रे ले आऊट, तात्या टोपे नगर, सुरेंद्रनगर, देवनगर, अजनी, गजानन नगर, डॉक्टर कॉलनी, छत्रपतीनगर, ऑरेंज सिटी चौक, प्रतापनगर चौक, खामला चौक, सोमलवाडा, राजीव नगर, जयप्रकाश नगर, सहकार नगर, पन्नासे ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर, गजानन मंदिर त्रीमूर्तीनगर, एम.आय.जी.कॉलनी, सुर्वेनगर, नेलको सोसायटी, सुभाषनगर या मार्गाने मार्गस्थ झाली.
 
यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये या रोगाविषयी जनजागृती करण्यात आली. जनजागृतीचे पोस्टर, स्टीकर, हस्तीपत्राचे वाटप करण्यात आले. या बाईक रॅलीचे आयोजन व नियोजन हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख जयश्री थोटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

 

 

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

नागपूर,ता.२६ : सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी शिक्षणाचा लाभ तळागाळातील सर्व  लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न केले. अस्पृश्यता व जातिभेद निर्मुलन स्त्री षिक्षण इ.विविध उपक्रम राबवून सामाजिक सुधारणा घडवून आणल्या, असे थोर व समाजसुधारक व आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या केन्द्रीय कार्यालयातील दालनात मा.विरोधी पक्षनेते श्री. तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती श्री. बंन्टी कुकडे, रा.कॉ. गटनेते श्री. दुनेश्वर पेठे यांनी राजर्षी शाहु महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.
 
यावेळी माजी ‍ शिक्षण समिती सभापती श्री. गोपाल बोहरे, जय जवान जय किसानचे अध्यक्ष श्री. प्रशांत पवार, दृष्टी तज्ञ श्री. संजय लहाने, श्री.शिवाजी कामळे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिवाजी जगताप, जनसंपर्क अधिकारी श्री. अशोक कोल्हटकर, श्री. राजेश वासनिक,श्री.दिलीप तांदळे आदी उपस्थित होते.

 

 

मंगलतोरण, औक्षण आणि गुलाबपुष्पाने झाले विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळा प्रवेशोत्सव दिमाखात साजरा : पहिल्याच दिवशी मिळाले गणवेश आणि पुस्तके
 
नागपूर,ता.२६ : मंगलतोरण आणि रांगोळ्यांनी सजलेली शाळा, शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी केलेले औक्षण आणि गुलाबपुष्प देऊन केलेले स्वागत अशा मंगल वातावरणात महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी शाळेत पहिले पाऊल ठेवले. पहिल्याच दिवशी मिळालेले गणवेश आणि पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत उपस्थित पाहुण्यांचे आणि सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
 
निमित्त होते शाळेतील पहिल्या दिवसाचे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळा मंगळवारपासून (ता. २६) सुरू झाल्या. यानिमित्ताने प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत करून ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. प्रवेशोत्सवाचा मुख्य कार्यक्रम विवेकानंद उच्च प्राथमिक हिंदी शाळेत झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार नागो गाणार, नागपूर महानगरपालिकेचे शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, मुख्याध्यापिका संध्या इंगळे, रजनी वाघाडे, शिक्षण विभागाचे संजय नंदनकर, नाना सातपुते, शिक्षक पालक समितीचे शामकुमार शिव, डी.के. साहू, ओलावा संस्थेच्या मीरा कडबे उपस्थित होत्या.
 
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, गणवेश आणि पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना आमदार नागो गाणार म्हणाले, मनपाच्या शाळेचा दर्जा आणि शिक्षण अतिशय चांगले आहे. आपण स्वत: मनपाच्या शाळेतून शिक्षण घेतले. याच शाळेने आपल्याला अन्यायाविरुद्ध आणि सत्यासाठी लढण्याची शिकवण दिली. शिक्षणाने आपण चांगले व्यक्ती बनतो. शिक्षण आपल्या चालण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून दिसायला हवा. शिक्षण घेऊनही जो व्यक्ती भ्रष्टाचार करतो, त्याच्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही. अशा व्यक्तींवर संस्कार झालेले नसतात. मनपाच्या शाळेत शिक्षणासोबतच संस्कार होतात, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले आणि सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा दिल्या.
 
शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. यावर्षी मनपाच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थ्यांना जसे पहिल्याच दिवशी गणवेश आणि पुस्तके मिळाली तसेच पुढील काही काळात हिवाळा येण्यापूर्वी स्वेटर उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने आणि शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनीही आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका संध्या इंगळे यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश आणि पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षण समितीचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे आभार मानले. संचालन अंजली कावळे यांनी केले. आभार श्री. बरडे यांनी मानले.
 
विद्यार्थ्यांचा सत्कार
 
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावीत ८८ टक्के गुण मिळविणारी कु. बिस्वनी धुर्वे, ८४ टक्के गुण मिळविणारा कमलेश वर्मा आणि ८१ टक्के गुण प्राप्त करणारा संदीप साहू यांचा सत्कार करण्यात आला. प्रो-कबड्डीमध्ये नागपूरचे नेतृत्त्व करणारा हेमलाल साहू आणि कराटे स्पर्धेत राज्य स्तरावर खेळणारा दिलीप कावरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
 
वेदशाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेश
 
नरेंद्र नगर येथील वैदिक अनुसंधान संस्थेत वेद शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना यावेळी प्रथमच पाचवी ते नवव्या वर्गात प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या वेळी या विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चार केला. या सर्व विद्यार्थ्यांचेही यावेळी मान्यवरांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
 
विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‌घाटन
 
विवेकानंद नगर शाळेत यावेळी मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले. विद्या प्राधिकरण योजनेअंतर्गत ही प्रयोगशाळा मंजूर असून हसत खेळत विज्ञानाचे शिक्षण या प्रयोगशाळेतून मिळणार आहे.
 
आमदार सोले, स्थायी समिती सभापती कुकरेजांनी केले स्वागत
 
नागपूर महानगरपालिकेच्या विविध शाळांत लोकप्रतिनिधी आणि नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. लालबहादूर शास्त्री माध्यमिक शाळेत आमदार प्रा. अनिल सोले यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून गणवेश आणि पुस्तक वाटप केले. एम. ए. के. आझाद उर्दू माध्यमिक शाळेत स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा नेताजी मार्केट माध्यमिक शाळेत स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळेत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करीत गणवेश आणि पुस्तक वाटप केले तसेच पुढील शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा दिल्या.
 
राम मनोहर लोहिया शाळेत कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत
 
महानगरपालिकेच्या टेलिफोन एक्सचेंज जवळील डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय रामपेठ येथे शाळा प्रवेशोत्सवाच्या शुभारंभला प्रमुख पाहुणे कार्यकारी महापौर तथा उपमहापौर दीपराज पार्डीकर होते.यावेळी गांधी महाल झोन सभापती वंदना यंगटवार, शाळेचे मुख्याध्यापक संतोष विश्वकर्मा, पर्यवेक्षक मंगला भुरे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, विद्यार्थी-पालक मोहन मिश्रा, शिक्षक रवी खंडाईत, वंदना कोल्हे, डॉ. राजहंस वंजारी उपस्थित होते.
 
यावेळी प्रत्येकी ५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय गणवेश, पुस्तके, परीक्षेचा खरडा व सायकल वाटप करण्यात आले. तसेच शाळेतून दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक ७७ टक्के गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी मोनिका भगत हिचा उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी सत्कार केला. यावेळी मार्गदर्शन करतांना उपमहापौरांनी म.न.पा. शाळेचा विद्यार्थी गुणवत्तेत कुठेही कमी नाही. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाऊन मोठे यश संपादन करावे, असे आवाहन केले. यावेळी झोन सभापती वंदना यंगटवार व मुख्याध्यापक संतोष विश्वकर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा अचकरपोहरे तर आभार गीता दांडेकर यांनी मानले.
 
संजयनगर शाळेत प्रवेशोत्सव साजरा
 
नागपूर महानगरपालिकेच्या डिप्टी सिग्नल येथील संजयनगर शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक अनिल गेंडरे, नगरसेविका सरिता कावरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले 

 

 

रमाई आवास योजनेच्या कामाला गती द्या : अभय गोटेकर

गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीची बैठक
 
नागपूर,ता. २५ : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती अभय गोटेकर यांनी दिले. सोमवारी (ता.२५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी समिती सदस्य परसराम मानवटकर, सदस्या लता काटगाये, निरंजना पाटील, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभुळकर, कार्यकारी अभियंता राजेश राहाटे, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना अभय गोटेकर म्हणाले, रमाई आवास योजनेचे काम मागील काही दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. त्याला गती देण्यात यावी. पुढील १५ दिवसानंतर रमाई आवास योजनेचे आवेदन पत्र वितरित करण्याचे निर्देश सभापती अभय गोटेकर यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेचे आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने भरताना नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेत मनपाची प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश सभापती अभय गोटेकर यांनी दिले.
 
महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत निवास देता येऊ शकते काय, याबाबतचा आढावा सभापती अभय गोटेकर यांनी घेतला. त्यासंबंधी स्थावर विभाग, नासुप्र, एसआरएस या विभागांना जागेसाठी पत्र पाठविले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. दक्षिण नागपूर मधील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीधारकांना घर व पट्टे वाटप करण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली.  

 

 

मोक्षधाम पुलाचे लोकार्पण लवकरच !

दीपराज पार्डीकर : मनपा पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
 
नागपूर,ता.२५ : मोक्षधाम ते ग्रेट नाग रोड वरील नाग नदीवर असलेल्या पुलाचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे. या पुलाचे लोकार्पण लवकरच होणार असल्याचे कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी सांगितले. पुलाच्या अंतिम टप्प्यातील बांधकामाचा आढावा घेण्यासाठी मनपा पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २५) भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
 
सदर पाहणी दौऱ्यात स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, मनपातील सत्तापक्षाचे उपनेते बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेवक भगवान मेंढे, विजय चुटेले, हर्षला साबळे, प्रमोद चिखले, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगीनवार, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, जयंत ठाकरे, प्रशांत ढाकणे, मनोज साबळे, शेरसिंग यादव, कंत्राटदार मेडपल्लीवार उपस्थित होते.
 
यावेळी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ यांनी पदाधिकाऱ्यांना संपूर्ण कामाची माहिती दिली. पुलाच्या कामासोबतच पुलाचे सौंदर्यीकरणही करण्यात आले आहे. सौंदर्यीकरणावर आणि रंगरंगोटीवर अंतिम हात फिरविणे चालू असून लोकार्पणासाठी पूल सज्ज झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी अंतिम टप्प्यातील काही काम शिल्लक असेल तर ते तातडीने पूर्ण करा. याच महिन्यात पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. पुलाच्या समोर ग्रेट नाग रोडवर सुरू असलेल्या सीमेंट रस्त्याच्या कामाची माहिती ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी घेतली. पूल सुरू झाल्यानंतर पुन्हा नागरिकांना सीमेंट रस्ता बांधकामाचा वाहतुकीत अडथळा होऊ नये, यासाठी सीमेंट रस्त्याचे कामही वेगाने पूर्ण करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

 

 

५३८ किलो प्लास्टिक जप्त, दीड लाखांवर दंडवसुली

प्लास्टिक विरोधात मनपाची मोहीम :प्रत्येक झोन मध्ये दहा सदस्यीय पथक
 
नागपूर, ता. २३ :नागपूर महानगरपालिकेने प्लास्टिकविरोधात शनिवारपासून (ता. २३) धडक मोहीम उघडली असून पहिल्याच दिवशी दहाही झोनमध्ये करण्यात आलेल्या कारवाईतून ५३८.९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. एकूण दीड लाख रुपयांच्या वर दंड वसूल करण्यात आला.या मोहिमेमुळे आता प्लास्टिक विक्रेत्यांचे आणि वापरणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.
 
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकबंदीची अधिसूचना काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याकरिता मुदत शुक्रवारी (ता. २२) संपली.त्यामुळे शनिवार पासून कारवाईची धडक मोहीम सुरु करण्यात आली. त्याच्या नियोजनासाठी शुक्रवारीच अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी आढावा बैठक घेतली होती. सदर बैठकीत कारवाई संदर्भात निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी दहा सदस्यीय चमूने कारवाईला सुरुवात केली.
 
आजपासून कारवाई सुरू होणार म्हणून बहुतांश प्लास्टिक विक्रेत्यांनी दुकाने उघडली नाहीत, अशी माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. प्रत्येक झोनमधील पथकाने शासन आणि प्रशासनाच्या दिशानिर्देशानुसार अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे ज्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक वस्तूंवर बंदी आहे अशा प्लास्टिक विकणाऱ्या आणि वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली.
 
३४ जणांना नोटीस, एक एफआयआर
 
या कारवाईअंतर्गत आज पहिल्या दिवशी दहाही झोन मिळून एकूण ३४ जणांना नोटीस देण्यात आली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत एका कारवाईदरम्यान दुकानदाराने पथकाशी हुज्जत घातली. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला. सर्वाधिक १५० किलो प्लास्टिकची जप्ती धरमपेठ झोन क्र. २ मध्ये करण्यात आली तर सर्वाधिक ३२ हजारांचा दंड मंगळवारी झोन क्र. १० मधून वसूल करण्यात आला.लक्ष्मीनगर झोन क्र. एक मध्ये एक नोटीस देण्यात आला नाही किंवा दंड वसुली झाली नाही. धरमपेठ झोन क्र. २ मध्ये १५० किलो प्लास्टिक जप्ती, सहा नोटीस आणि १० हजार दंड वसुली, हनुमाननगर झोन क्र. ३ मध्ये ३२ किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि २३ हजार ५०० रुपयांची दंड वसुली, धंतोली  झोन क्र. ४ मध्ये ५० किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि  २५ हजारांची दंडवसुली, नेहरूनगर झोन क्र. ५ मध्ये ४३ किलो प्लास्टिक जप्ती आणि २५ हजारांची दंड वसुली करण्यात आली. या झोन मध्ये एकही नोटीस देण्यातआली नाही.गांधीबाग झोन क्र. ६ मध्ये १३६ किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि दहा हजारांची दंड वसुली, सतरंजीपुरा झोन क्र. ७ मध्ये ६.२०० किलो प्लास्टिक जप्ती, एक नोटीस आणि पाच हजार रुपयांची दंड वसुली, लकडगंज झोन क्र. ८ मध्ये २१.७०० किलो प्लास्टिक जप्ती, दोन नोटीस आणि १० हजार रुपयांचा दंड, आसीनगर झोन क्र. ९ मध्ये १८ किलो प्लास्टिक जप्ती, तीन नोटीस आणि १५  हजारांचा दंड तर मंगळवारी झोन क्र. १० मध्ये ८२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला. सात नोटीस बजावण्यात आल्या आणि ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दहाही झोन मिळून एकूण ५३८.९०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ३४ नोटीस बजावण्यात आल्या आणि एकूण एक लाख ५५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.
 
कारवाई कुठे आणि कुणावर होणार?
 
प्लास्टिकबंदी अंतर्गत सर्व दुकाने व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, रेल्वेस्थानके, वने व संरक्षितवने, इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र आदी ठिकाणी कारवाई होईल. दुकानदार, मॉल्स, कॅटरर्स, घाऊक व किरकोळ विक्रेता, वितरक, वाहतूकदार, मंडई, स्टॉल्स आदी ठिकाणीही कारवाई होईल.
 
प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार घ्या :आयुक्तांचे आवाहन
 
नागपूर शहरात आज, शनिवारपासून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.प्लास्टिक बाळगल्यास पाच पासून २५ हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर बंद करा.याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त  वीरेंद्र सिंह यांनी केले आहे.
 
बंदी असलेल्या वस्तू
 
प्लास्टिक पासून बनविलेल्या पिशव्या, प्लास्टिक व थर्माकोलपासून बनविण्यात आलेले व एकदाच वापरल्या जाणारे ताट, ग्लास, वाट्या, चमचे, कप, स्ट्रॉ, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी प्लास्टिकची भांडी, वाट्या, पॉलिप्रॉपीलेन बॅग, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पाऊच, कप आदीवर बंदी आहे.  प्लास्टिक व थर्माकोलचा वापर सजावटीमध्ये करण्यास मनाई आहे.
 
यावर बंदी नाही
 
अर्धा लिटरच्या पाण्याच्या बाटल्स, औषधांचे वेष्टण, कृषी क्षेत्रातील सामान साठविण्यासाठीचे प्लास्टिक, नर्सरीमध्ये वापरात असलेले प्लास्टिक, अन्नधान्यासाठी ५० मायक्रॉनवरील पिशव्या, ५० मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या, रेनकोट, कच्चा माल साठविण्यासाठी वापरात असलेले प्लास्टिक, टीव्ही, फ्रीजसारख्या उत्पादनांसाठी वापरले जाणारे थर्माकोल, बिस्कीट, चिप्स, वेफर, पुड्यांची वेष्टणे आदींवर बंदी नाही.
 
काय करावे?
 
कापडी, ज्यूट पिशव्यांचा वापर करावा.घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी घेऊन निघावे.पाण्याची स्टील किंवा काचेची बाटली सोबत ठेवावी.दूध, दही, मासे, मटण आणण्यासाठी स्टीलच्या भांड्याचा वापर करावा.

 

 

विद्यार्थ्यांची काळजी आणि सरंक्षण ही जबाबदारी शिक्षकांचीच - डॉ.वासंती देशपांडे

महापालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे कार्यशाळेचे आयोजन
 
नागपूर,ता.२२ : शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेणे आणि त्यांचे संरक्षण करणे ही जबाबदारी जेवढी पालकांची आहे, तेवढीच शिक्षकांची आहे. शालेय वेळेत पालक आपल्या पाल्याला आपल्या जबाबदारीवर सोडत असतो. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे आपले कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य डॉ. वासंती देशपांडे यांनी केले.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे शुक्रवारी (ता.२२) महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे ‘विद्यार्थी सुरक्षा कायदा’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नागपूर चाईल्ड लाईन या संस्थेच्या पूजा कांबळे, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चापलेकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
 
पुढे बोलताना डॉ. वासंती देशपांडे म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थी संरक्षण कायदा सर्वत्र लागू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात विशेष लक्ष देण्यासाठी त्यानुसार २०१७ साली परिपत्रक काढले आहे. विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही शालेय वेळेत आपलीच असते, अशी माहिती त्यांनी मुख्याधापक आणि मनपाच्या शिक्षकांना दिली.
 
शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करावयाच्या याची माहिती डॉ.वासंती देशपांडे यांनी पीपीटीद्वारे दिली. शाळेच्या सर्व माध्यमांमध्ये व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यामिक, उच्च माध्यामिक शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्यात यावी, शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या सर्व प्रवेशद्वारांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, याशिवाय प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा, अशीही सूचना त्यांनी केली. विद्यार्थी कोणत्याही दबावाला बळी पडू नये याकरिता त्याच्याशी सतत संवाद सुरू ठेवावा, अशा विद्यार्थ्यांचे तज्ज्ञांद्वारे समुपदेशन करावे. विद्यार्थ्याला शारीरिक अथवा मानसिक ईजा होईल, अशी शिक्षा शिक्षकांनी करू नये. यासारख्या उपाययोजना शाळेमध्ये राबविण्यात याव्यात, असेही डॉ.वासंती देशपांडे यांनी प्रतिपादित केले. कार्यशाळेसाठी शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे संचालन मधू पराड यांनी केले. आभार संध्या पवार यांनी मानले. यावेळी मनपाच्या शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

 

रस्ता रूंदीकरणासंदर्भातील प्रशासकीय कामे सात दिवसांत पूर्ण करा

माजी महापौर प्रवीण दटके यांनी घेतला आढावा
 
नागपूर,ता.२२.  जुना भंडारा रोड आणि केळीबाग रस्ता रुंदीकरणाचे काम प्रस्तावित आहे. या प्रस्तावित कामाला गती देण्यासाठी पुढील सात दिवसात रस्ता रूंदीकरणासंदर्भातील सर्व प्रशासकीय कामे पूर्ण करण्याचे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.
 
शुक्रवारी (ता.२२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात दटके समितीची बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त वीरेंद्र सिंह, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, कर व कर आकारणी समिती उपसभापती सुनील अग्रवाल, उपायुक्त नितीन कापडणीस, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी भंडारा रोड रूंदीकरण, जुना भंडारा रोड रूंदीकरण, सिवर रोड (मॉडेल मिल चौक ते रामजी पहेलवान चौक) रस्ता रूंदीकरणाबाबत बैठकीत चर्चा झाली. अधिकाऱ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी आपल्याजवळ अथवा आयुक्तांजवळ समस्या मांडाव्या, अशी सूचना माजी महापौर प्रवीण दटके यांनी केली. ज्या सीमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्य़ा रस्त्याच्या जंक्शनजवळ असलेला रस्ता जोडण्यात आलेला नाही, तो ताबडतोब जोडण्यात यावा, असे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले. 

 

 

शनिवारपासून शहरात प्लास्टिक बंदी

मनपा करणार कडक कारवाई
 
नागपूर,ता.२२ : शहरात शनिवार २३ जूनपासून प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका प्लास्टिक विक्रेते आणि प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली.
 
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर ती अमंलबजावणी करण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली होती. सदर मुदत शुक्रवारी २२ जूनला संपली असल्याने शनिवार २३ जूनपासून संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिले.
 
दंड वसूल करताना सर्वप्रथम प्लास्टिक विक्रेत्यांवर दंड आकारण्यात यावा. लहान संस्थावर दंड आकारण्यात येऊ नये, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली.
 
प्रत्येक झोनमध्ये १२ कर्मचारी व अधिकारी यांची चमू तयार करण्यात आली आहे. यामध्ये एक झोन सहायक आयुक्त, एक झोनल अधिकारी, दोन स्वास्थ अधिकारी, चार जमादार आणि दोन उपद्रव शोध पथकातील सदस्य यांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली.
 
बैठकीला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार यांच्या सह सर्व झोनल अधिकारी, उपद्रव शोध पथकाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.  

 

 

महाराजबागजवळील नवीन डी.पी. रस्त्यावरून सुटणार ‘आपली बस’

परिवहन सभापतींनी बंटी कुकडे यांच्या हस्ते शुभारंभ : दोन फलाटावरून २३५ फेऱ्यांची सुरुवात
 
नागपूर,ता.२२ : महाराजबाग रोड आणि धीरन कन्या शाळा येथून सुटणाऱ्या शहर बसमुळे होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता मातृसेवा संघ ते महाराजबागच्या मागून अमरावती मार्गाला जोडणाऱ्या डी.पी. मार्गावरून उद्या २३ जून पासून विविध मार्गाच्या बसेस सुटतील. त्याचा शुभारंभ परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २२) करण्यात आला.
 
यावेळी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, लेबर अधिकारी अरुण पिपुरडे, पर्यवेक्षक रामराव मातकर, डीम्सचे टीम लीडर विनोद रत्नपारखी, डीम्सचे वाहतूक अधिकारी सुनील पशिने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.
 
नागपूर शहर बसचे संचलन सध्या बर्डी येथील महाराजबाग रोड, मोरभवन आणि धीरन कन्या शाळेजवळून होते. मात्र, शहर बसच्या थांब्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आता महाराजबाग मार्गावरून सुटणाऱ्या बस फेऱ्या नवीन डी.पी. मार्गावरून सुटतील. या मार्गावर विविध फलाट तयार करण्यात आले आहे. त्यापैकी फलाट क्र. ६ वरून विविध मार्गावरील सुमारे ११७ बसफेऱ्या आणि फलाट क्र, ७ वरून ११८ बस फेऱ्या सुटतील. परिवहन सभापतींनी बर्डी-शेषनगर आणि बर्डी-बहादुरा फाटा या बसेसना हिरवी झेंडी दाखवून या मार्गाचा शुभारंभ केला. यावेळी बोलतान सभापती बंटी कुकडे म्हणाले, नवीन डी.पी. मार्गावरून आता बस फेऱ्या जाणार असल्यामुळे महाराज बाग मार्गावरील वाहतुकीची कोंडी संपेल. आजपर्यंत नागरिकांनी जे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे आभार. लवकरच या मार्गाला लागून नव्या शहर बस स्टॅण्डचा विकास होणार आहे. मोरभवन बस स्टॅण्डला ते जोडणार असून शहर बस सेवा अधिकाधिक लोकाभिमुख आणि प्रवाशांच्या सोयीचा करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
 
डी.पी. मार्गावरून सुटणाऱ्या फेऱ्या
 
नवीन डी.पी. मार्गावरील फलाट क्र. ६ वरून बर्डी-बहादुरा फाटा (७२ फेऱ्या), बर्डी-सुदामनगरी (आठ फेऱ्या), बर्डी-नरसाळा (११ फेऱ्या), बर्डी-न्यू नरसाळा (१३ फेऱ्या), बर्डी-रमना मार्गे मेडिकल (१३ फेऱ्या) तर फलाट क्र. ७ वरून बर्डी-पिपळा गाव मार्गे बेसा फाटा (आठ फेऱ्या), बर्डी-शेषनगर (१४ फेऱ्या), बर्डी-चक्रपाणीनगर (१५ फेऱ्या), बर्डी-वेळाहरी मार्गे बेसा फाटा (१५ फेऱ्या), बर्डी-खरसोली (चार फेऱ्या), बर्डी-अयोध्यानगर (साईमंदिर) (आठ फेऱ्या), बेसा-गोरेवाडा (४७ फेऱ्या), बर्डी-बहादुरा गाव मार्गे खरबी (सात फेऱ्या) अशा एकूण २३५ फेऱ्या सुटतील.

 

 

सिंधी विस्थापितांना मालकी हक्क तातडीने देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट : उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
 
नागपूर,ता. २२ : सिंधी विस्थापितांना जमिनीचे मालकी हक्क देण्याचा निर्णय स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर महाराष्ट्र शासनाने घेतला. यावर तातडीने अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने नागपुरातील सिंधी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पुढील १५ दिवसात १०० लोकांची जमीन वर्ग दोन मधून वर्ग एकमध्ये करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
 
मनपाच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या नेतृत्त्वात सिंधी समाजातील सर्व सहयोगी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने १६ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. ७० वर्षानंतर झालेल्या ह्या निर्णयाने सिंधी समाजात उत्साहाचे वातावरण आहे. फाळणीनंतर भारतात विस्थापित झालेल्या सिंध प्रांतातील नागरिकांना तेव्हापासून मालकीच्या जमिनी मिळाल्या नव्हत्या. सात दशकानंतर हा निर्णय झाला असल्याने आतातरी जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यास उशीर लागायला नको, या उद्देशाने १४ जूनला शासकीय आदेश निघताच १६ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने या निर्णयावर कार्यवाही करण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
त्याच अनुषंगाने सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज (ता. २२ जून) उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाय यांना यासंदर्भातील निवेदन सादर करण्यात. या निवेदनावर उचित कार्यवाही करीत जिल्हाधिकारी कार्यालयातून सिंधी बांधवांच्या वर्ग दोन मधील जमिनी वर्ग एक मध्ये करण्याच्या कार्यवाहीला वेग आला आहे. पुढील १५ दिवसांत किमान १०० सिंधी बांधवांना याचा लाभ मिळेल. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये ॲड. दिलीप दानी, प्रकाश तोतवानी, राजेश बटवानी, शंकर भोजवानी, घनश्याम गोदानी, संजय वासवानी, ॲड. कमल आहुजा यांच्यासह अन्य सिंधी बांधवांचा समावेश होता.
 
कागदपत्र एकत्रित करण्यासाठी शिबिर सुरू
 
शासकीय आदेशाचा लाभ प्रत्येक सिंधी बांधवांना व्हावा या हेतून सिंधी समाजातील विविध सहकारी संस्थांच्या सहकार्याने जरीपटका येथील बाबा हरदासराम धर्मशाला येथे सकाळी ८.३० ते १०.३० या काळात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून होत असलेल्या कार्यवाहीच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रे सदर शिबिरात जमा करण्यात येत आहे. शिवाय संबंधित विषयाची माहितीसुद्धा देण्यात येत आहे. सदर शिबीर २६ जूनपर्यंत राहणार असून सिंधी समाजबांधवांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन सिंधी समाजाच्या वतीने स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले आहे.

 

 

वृक्ष लागवड मोहिमेचे झोननिहाय नियोजन करा : वीरेंद्र कुकरेजा

५० हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य : २९ ला बैठक
 
नागपूर,ता. २२ : महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याच्या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ५० हजार वृक्षलागवड करायची आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यात नागरिकांचा सहभाग वाढवा. मोहिमेचे नियोजन झोननिहाय करा, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
 
१ जुलै ते ३१ जुलै दरम्यान राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (ता. २२) स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष दिव्या धुरडे, समितीचे सदस्य निशांत गांधी, आशा नेहरू उईके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सहायक आयुक्त सर्वश्री विजय हुमणे, प्रकाश वऱ्हाडे, गणेश राठोड, राजेश कराडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.
 
पुढे बोलताना सभापती वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या शाळा, दहनघाट, उद्याने, धार्मिक स्थळांचा परिसर आदी ठिकाणी वृक्ष लागवडीवर भर देण्यात यावा. एकंदरच झाडे लावल्यानंतर ती जगविण्याची जबाबदारी संबंधित नागरिकांनी घ्यायला हवी. यासाठी या पर्यावरण चळवळीत नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रशासकीय पातळीवर काम करीत असताना नागरिकांनाही अधिकाधिक संख्येने सहभागी करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
 
यावेळी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी वृक्ष लागवडीसंदर्भात सुरू असलेल्या तयारीची माहिती सभापती वीरेंद्र कुकरेजा आणि जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिव्या धुरडे व सदस्यांना दिली. यात काही सूचना उपस्थित सदस्यांनी केल्या.
 
१ जुलैला नागपूर महानगरपालिकेच्या वतीने एक मुख्य कार्यक्रम घेण्यात येईल. त्या कार्यक्रमाची तयारी करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. संपूर्ण मोहिमेच्या तयारीसंदर्भातील अखेरचा आढावा घेण्यासाठी महापौरांच्या उपस्थितीत २९ जून रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. सदर बैठकीत संबंधित विभागांच्या प्रमुखांना आणि लोकसहभागासाठी पर्यावरणप्रेमींना निमंत्रित करण्याची सूचनाही सभापती कुकरेजा यांनी केली.

 

 

योग घराघरांत पोहचविण्याचा मनपाचा मानस : ना. चंद्रशेखर बावनकुळे

- विश्व योगदिनानिमित्त हजारो नागपूरकरांची सामूहिक योगसाधना
 
-तीन वर्षांची बालिका आणि ९३ वर्षीय आजोबांचा सहभाग
 
नागपूर,ता. २१ :  विश्व योग दिनाचे औचित्य साधून नागपुरात यशवंत स्टेडियमवर मनपातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी उत्साही असतात. योग दिनाची चळवळ वृद्धिंगत करीत नागपुरातील घराघरांत योग पोहचविण्याचा मनपाचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 
विश्व योग दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध योगाभ्यासी मंडळ आणि संस्थांच्या सहकार्याने स्थानिक यशवंत स्टेडियम येथे आयोजित योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रजनी दीदी, मनीषा दीदी, एनसीसीचे ग्रुप कमांडर योगेंद्र पै, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, नगरसेविका दिव्या धुरडे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा व आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटनेच्या डॉ. कीर्तिदा अजमेरा, डॉ. सुवर्णा मानेकर, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, प्रदीप पोहाणे, जयप्रकाश गुप्ता, भोजराज डुंबे उपस्थित होते.
 
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केल्यापासून नागपुरात महापालिकेच्या पुढाकाराने दरवर्षी योग दिनाचे मोठे आयोजन होत असते. यानिमित्ताने ‘सुदृढ आरोग्यासाठी योग’ हा संदेश परिणामकारकरीत्या जनतेपर्यंत पोहोचत आहे. नागपुरातील सर्व योग्याभ्यासी मंडळ, ध्यान केंद्र, योग साधना केंद्र यांच्या मदतीने घराघरात आणि मनामनापर्यंत योग पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
 
कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेतर्फे योग दिनाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होत असते. यामुळे नागपूर शहरात योगविषयी चांगले वातावरण तयार झाले आहे. या आयोजनात सहभागी सर्व संस्थांचे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वागत त्यांनी आयोजनात सहभागाबद्दल सर्व नागपूरकरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले. आभार शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी मानले. कार्यक्रमाला उपायुक्त रवींद्र देतवळे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते, संजीवनी प्राणायामचे डॉ. केशव क्षिरसागर, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त महेश धामेचा, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार आदी उपस्थित होते.
 
विविध संस्थांचा सहभाग
 
नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध संस्थांचा सहभाग होता. यामध्ये जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हींग, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्था, श्रीरामचंद्र मिशन, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, एन.सी.सी., ईशा फाऊंडेशन, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, नॅचरोपॅथी योग असोशिएशन, सहजयोग ध्यान केंद्र, योगसूत्र, श्रीयोग केंद्र, विवेक बहुजन हिताय संस्था आदींचा समावेश होता. या संस्थांच्या साधकांनी योग प्रात्यक्षिके आणि ध्यान योग केलेत.
 
तीन वर्षाची बालिका आणि ९३ वर्षांचे आजोबा
 
योग दिनाच्या निमित्ताने विविध संस्थांच्या साधकांनी योग प्रात्यक्षिके सादर केले. यावेळी श्रद्धानंदपेठ अनाथालयातील श्री योग साधना केंद्राच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकामध्ये तीन वर्षाची बालिका कु. पूजा चोपडे ही सर्वात लहान साधक तर ९३ वर्षांचे आजोबा अबनाशचंद्र खुराणा हे सर्वात वयोवृद्ध साधक होते. या साधकांनी योग प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा संदेश दिला.
 
‘करु या नियमित योगासनं’
 
योग दिनाच्या निमित्ताने ठरविण्यात आलेल्या योगासनाच्या नेतृत्वाची धुरा जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाने सांभाळली होती. मंडळाच्या साधकांनी योग दिनाच्या निमित्ताने करावयाची आसने मंचावर करून दाखविली. त्यांच्यासोबत स्टेडियममध्ये उपस्थित हजारो साधकांनी ही सारी आसने केलीत. यावेळी प्रत्येक आसन संपल्यानंतर ‘करु या नियमित योगासनं’ या योग गीताच्या शब्दांनी यशवंत स्टेडियम दुमदुमले होते. प्रसन्न आणि निरामय वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला.
 
योगमय वातावरण
 
योग दिनाच्या निमित्ताने सकाळी ६ वाजतापासून यशवंत स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५.३० पासून यशवंत स्टेडियमकडे येणाऱ्या साधकांच्या गर्दीने धंतोली परिसरातील रस्ते फुलून गेले होते. यशवंत स्टेडियममध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक साधकाला मनपा आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे दुपट्टा देण्यात येत होता. शुभ्र धवल वस्त्र, भगवा दुपट्टा परिधान केलेल्या आणि एका रांगेत शिस्तबद्ध रीतेने योगा करणाऱ्या साधकांच्या गर्दीने स्टेडियममधील वातावरण योगमय बनले होते.

 

 

व्यापारी-अधिकाऱ्यांच्या समन्वयातून एलबीटी वसुलीवर तोडगा : वीरेंद्र कुकरेजा

-    थकीत एलबीटीसाठी मनपाच्या विशेष शिबिराचे उद्‌घाटन
-    नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचा पुढाकार
-    २० ते २७ जून दरम्यान प्रकरणे निकाली काढण्याचा निर्धार
 
नागपूर,ता.२० :  स्थानिक संस्था करांतर्गत असलेली थकीत प्रकरणे निकाली काढणे क्लिष्ट काम आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन या प्रकरणांना सरळ मार्गाने संपुष्टात आणण्यासाठी व्यापाऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. व्यापारी आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयातून एलबीटीची संपूर्ण प्रकरणे निकालात काढू, असा विश्वास स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी व्यक्त केला.
 
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने एलबीटीची थकीत प्रकरणे निकालात काढण्यासाठी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने सिव्हील लाईन स्थित त्यांच्या कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, नगरसेवक निशांत गांधी, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी, माजी अध्यक्ष प्रकाश मेहाडिया उपस्थित होते.
 
याप्रसंगी पुढे बोलताना सभापती वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, मनपाच्या अर्थसंकल्पापूर्वी विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर त्यांच्याच पुढाकाराने सदर शिबिर लावण्यात आले. एलबीटी जेव्हा अस्तित्त्वात आला तेव्हा तो समजण्यात व्यापाऱ्यांनाही अडचणी गेल्या. त्यामुळेच प्रलंबित प्रकरणांची स्थिती उद्‌भवली. व्यापारी चुकीच्या भावनेने व्यवसाय करीत नाही, हे अधिकाऱ्यांनी ध्यानात ठेवून या शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी समजावून घ्याव्यात. त्यांची प्रलंबित प्रकरणे या शिबिरातच मिटवावी, असे निर्देश त्यांनी दिले. अद्यापही ४० हजार व्यापारांचा डेटा मनपाकडे आला नाही. सुमारे ७०० कोटींची वसुली बाकी आहे. एलबीटीचे लेखाशीर्ष बंद करणे आवश्यक आहे. या शिबिराच्या माध्यमातून वसुली होईल, त्यासाठी व्यापारी आणि अधिकारी सहकार्य करतील, असा विश्वास सभापती कुकरेजा यांनी व्यक्त केला. मनपा अर्थसंकल्पापूर्वी व्यापाऱ्यांनी मनपाकडून ज्या अपेक्षा व्यक्त केला त्याचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. बाजार परिसरातील कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोल पंप वरील स्वच्छतागृहे नियमित खुली राहावी यासाठी आपण स्वत: पेट्रोलपंप मालकांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम म्हणाले, स्थानिक संस्था कर भरणे ही व्यापाऱ्यांसाठी आवश्यक बाब आहे. सर्व प्रलंबित प्रकरणांवर कायद्याच्या चौकटीत राहून तोडगा काढण्याचा मनपाचा प्रयत्न राहील. मनपाचे अधिकारी, कर्मचारी नियमांच्या अधीन राहून व्यापाऱ्यांचे समाधान करण्यासाठीच येथे आले आहे. या शिबिराचा लाभ अधिकाधिक व्यापाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
 
प्रास्ताविकातून नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी यांनी भूमिका मांडली. व्यापाऱ्यांनी नेहमीच शासकीय नियमांचे पालन केले आहे. नागपूर महानगरपालिका ही आपली संस्था आहे. त्यामुळे मनपाला सहकार्य करणे हे व्यापाऱ्यांचे कर्तव्यच आहे. या शिबिराच्या माध्यमातून सारीच प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
कार्यक्रमाचे संचालन नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव संजय अग्रवाल यांनी केले. आभार फारुखभाई अकबानी यांनी मानले. कार्यक्रमाला नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष अर्जूनदास आहुजा, राजू व्यास, अश्विन मेहाडिया, सहसचिव रामअवतार तोतला, उमेश पटेल, गिरीश मुंधडा, जनसंपर्क अधिकारी जब्बार झाकीर, बडी मारवाड माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष पुरुषोत्तम मालू, स्टील ॲण्ड हार्डवेअर असोशिएशनचे अध्यक्ष राजेश लखोटिया उपस्थित होते.
 
शिबिराचा अवधी २७ जूनपर्यंत
 
नागपूर महानगरपालिकेतर्फे नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने व्यापाऱ्यांसाठी लावण्यात आलेले हे पहिले शिबिर आहे. शिबिराचा कालावधी २० जून ते २७ जून असा असून शनिवार आणि रविवार या सुट्यांच्या दिवशीही व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी शिबिर सुरू राहील. या शिबिरात झोननिहाय काऊंटर लावण्यात आले असून व्यापाऱ्यांना सोयीचे व्हावे, या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिरात एलबीटीची अपीलमध्ये असलेली प्रकरणे, असेसमेंट ऑर्डर प्राप्त झाला नसेल अशी प्रकरणे, असेसमेंट संदर्भातील प्रलंबित प्रकरणे आदी निकालात काढण्यात येतील, अशी माहिती सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली. या शिबिराचा सर्वच व्यापाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

गोरेवाडा तलावावर ’तरंगता सोलर’ प्रकल्प

पावरग्रीडचे कार्यकारी महापौरांसमोर सादरीकरण : तीन मेगावॅट क्षमता
 
नागपूर,ता.१९ :  पेंच प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण गोरेवाडा येथे होऊन तेथून शहराला पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाला लागणारा विद्युत खर्चात बचत व्हावी या हेतूने हा प्रकल्पासाठी लागणारी वीज सोलरमधून मिळावी, असा प्रस्ताव आहे. जागेच्या अभावामुळे हा सोलर प्रकल्प तलावातच उभारण्याचा विचार असून देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प म्हणून तो ओळखला जाईल.
 
यासंदर्भात पावरग्रीडच्या संचालक आणि अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी (ता. १९) मनपा मुख्यालयातील सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, उपअभियंता दीपक चिटणीस, पावरग्रीडचे कार्यकारी संचालक संजय गर्ग, व्यवस्थापक अनुराग श्रीवास्तव, उपव्यवस्थापक डॉ. विनय सेनरे उपस्थित होते.
 
गोरेवाडा तलावावर ३ मेगावॅट ‘फ्लोटिंग सोलर’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पावरग्रीडने नागपूर महानगरपालिकेसमोर ठेवला आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण यावेळी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत, मनपा किती रक्कम या प्रकल्पात गुंतवेल, फायनान्स किती उपलब्ध करण्यात येईल, प्रकल्पाचा खर्च किती वर्षात निघेल आणि किती वर्ष मोफत वीज सोलरच्या माध्यमातून मिळेल, याबाबत संपूर्ण माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून पावरग्रीडच्या अधिकाऱ्यांनी दिली. याबाबतच्या सर्व शक्यता तपासून प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांना दिले.

 

 

२१ जूनला नागपूरकर करणार सामूहिक योग

नागपूर महानगर पालिकेचे आयोजन : विविध संस्थांचा सहभाग
 
नागपूर, ता. १९ :  .विश्व योग दिनाच्या निमित्ताने हजारो नागपूरकर २१ जून रोजी सकाळी ५.४५ वाजतापासून यशवंत स्टेडियम येथे सामूहिक योगासन करणार आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध योगाभ्यासी मंडळांचा सहभाग राहणार असल्याची माहिती कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी यशवंत स्टेडियम येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
योग दिनाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. यावेळी खासदार विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रा. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, मनपाचे स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल, राकाँचे गटनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेविका रूपा रॉय उपस्थित राहतील. योग दिनाच्या या मुख्य कार्यक्रमात नागपूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपमहापौर तथा कार्यक्रम संयोजक दीपराज पार्डीकर, सहसंयोजक तथा शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.
 
पत्रपरिषदेला विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका दिव्या धुरडे, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, उपायुक्त रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त महेश मोरोणे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, विलास फडणवीस उपस्थित होते.
 
विविध मंडळांचा सहभाग
 
नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित योग दिन कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हींग, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्था, श्रीरामचंद्र मिशन, प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, एन.सी.सी. ईशा फाऊंडेशन, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, नॅचरोपॅथी योग असोशिएनश, सहज योगध्यान केंद्र, योग सूत्र, श्रीयोग केंद्र, विवेक बहुजन हिताय संस्था आदींचा सहभाग राहील.
 
प्रवेशासाठी १० गेटची व्यवस्था
 
यशवंत स्टेडियम येथे योगप्रेमींना प्रवेशासाठी १० गेटची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन मुख्य द्वार असतील. हे दोन्ही द्वारे व्हीआयपींच्या प्रवेशासाठी असतील. गेट क्र. १ देवी मंदिराजवळ असेल. तेथून पुढे आठ गेट असतील. प्रमुख पाहुणे गेट क्र. १२ मधून व्यासपीठाकडे येतील. सहभागी होणाऱ्यांनी पांढरा पोषाख घालून येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
 
बसेसची व्यवस्था
 
योगप्रेमींना यशवंत स्टेडियम मध्ये पोहचण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहर बसची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणांहून या बसेस यशवंत स्टेडियमकडे येतील. पहाटे ५.३० वाजतापासून या बसेस प्रवाशांच्या सेवेत असतील. एसबीआय जयप्रकाश नगर, मालवीय नगर खामला, सोनेगाव (शंकरनगर मार्गे), अत्रे ले-आऊट लक्ष्मीनगर चौक, सूर्या नगर उद्यान (सेंट्रल एव्हेन्यू मार्गे), अयाचित मंदिर, श्री श्रद्धानंद अनाथालय, वीरचक्र कॉलनी साई मंदिर काटोल रोड, सखारामपंत उद्यान मंगळवारी बाजार, त्रिमूर्ती नगर, जुना दिघोरी बस स्टॉप या ठिकाणाहून ५.३० वाजता शहर बस सुटेल.

 

 

फुटपाथ पादचाऱ्यांसाठीच, अतिक्रमण तातडीने काढा : आयुक्त वीरेंद्र सिंह

आठ रस्ता चौक ते ऑरेंज सिटी चौक मार्गाचा केला दौरा
 
नागपूर,ता.१९ :  शहरातील फुटपाथ पादचाऱ्यांसाठीच आहे. त्यावर एकही अतिक्रमण नको. फुटपाथवरील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, असे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. मंगळवारी (ता.१९) आयुक्तांनी लक्ष्मीनगर येथील आठ रस्ता चौक ते ऑरेंज सिटी चौक या मार्गाची पाहणी केली.
 
यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, लक्ष्मीनगर झोनचे उपअभियंता रवींद्र मुळे, श्री. कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते. लक्ष्मीनगर येथील आठ रस्ता चौक ते ऑरेंज सिटी चौक या मार्गावरील फुटपाथवर इमारतीच्या पायऱ्या आहेत किंवा अन्य बांधकाम केलेले आहे. ते बांधकाम तातडीने काढून टाकण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. फुटपाथवर खाद्यपदार्थांचे ठेले, फळविक्रेते, भाजीविक्रेते बसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना त्रास होतो. हे सर्व ठेले तातडीने हटविण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. आरपीटीएस रोड वर असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रालगत अनेक दुकानांचे अतिक्रमण आहे. त्यांना तातडीने अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. जेरील लॉन चौकातील कचरा कुंड भरलेले आहे. त्यातून कचरा बाहेर पडत असल्याचे दृश्य आयुक्तांनी बघितले. यानंतर अशी परिस्थिती दिसता कामा नये. झोनच्या सहायक आयुक्तांनी दररोज पाहणी दौरा करावा, अशी सूचनाही त्यांना केली. यानंतर आपण शहरातील सर्व   फुटपाथचे निरिक्षण करणार आहोत. यानंतर फुटपाथवर अतिक्रमण आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी आयुक्तांनी दिला. वर्धा रोडवरील उरुवेला कॉलनी येथे नाल्याच्या काठावर अतिक्रमण आहे. ते अतिक्रमणही तातडीने हटविण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.  

 

 

अंबाझरी उद्यानात ‘ऑक्सिजन सेंटर’ तयार व्हावे : अविनाश पांडे

खासदार निधीतून करण्यात आलेल्या सौंदर्यीकरणाचे लोकार्पण
 
नागपूर,ता.१८ : अंबाझरी उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी खासदार निधीतून सौंदर्यीकरण करण्यात आले. भविष्यात अंबाझरी उद्यानातील तलावाच्या काठावर मोकळ्या जागेत अधिकाधिक वृक्ष लावण्यात यावे. शुद्ध प्राणवायू घ्यायचा असेल तर लोकांनी अंबाझरी उद्यानात यावे, अशी आपली संकल्पना आहे. भविष्यात नागपूर महानगरपालिकेने नगरसेवकांच्या निधीच्या सहाय्याने येथे अशा प्रकारचे ‘ऑक्सिजन सेंटर’ तयार करावे, असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी सदस्य अविनाश पांडे यांनी केले.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे अंबाझरी उद्यानात सुमारे एक कोटी रुपयांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या सौंदर्यीकरण कार्याच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मनपातील विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जैवविविधता समितीच्या सभापती दिव्या धुरडे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोनचे सभापती प्रमोद कौरती, मनपातील भाजपच्या उपनेत्या वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नगरसेवक अमर बागडे, किशोर जिचकार, सुनील हिरणवार, नगरसेविका परिणिता फुके, रुतिका मसराम, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सेवानिवृत्त उद्यान अधीक्षक संजय माटे उपस्थित होते.
 
पुढे बोलताना माजी खासदार अविनाश पांडे म्हणाले, शहरात अतिशय सुंदर उद्यान आणि तलाव आहे. याठिकाणी अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण केल्यास हरित शहर बनण्यास मदत होईल. या कार्यात कुठल्याही प्रकारचे राजकारण यायला नको. आपल्या खासदारकीच्या काळात एकट्या महानगरपालिकेला विविध विकास कार्यासाठी ११ कोटी निधी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यातील एक कोटीचा निधी हा अंबाझरी उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले. ग्रीन जीम, स्थापत्यविषयक कामे, लहान मुलांसाठी खेळणी, फूल उद्यान, हायमास्ट लाईट आदी कामासाठी हा निधी खर्च करण्यात आला. आता यापुढे प्रत्येक नगरसेवकांच्या निधीतील काही रक्कम अंबाझरीच्या सौंदर्यीकरणासाठी आणि अधिकाधिक वृक्ष लावण्यासाठी देण्यात यावी जेणेकरून मनपा या उद्यानाला अधिक चांगले बनवू शकेल असे त्यांनी सांगितले. अंबाझरी तलाव आणि उद्यानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. नागपूर शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी अंबाझरी उद्यान आकर्षणाचे केंद्र आहे. नागपूर महानगरपालिका आपले काम करीतच आहे. मात्र, जनतेनेही आपली जबाबदारी ओळखून आपल्या शहरातील अशा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तलाव आणि उद्यानांचे जतन करायला हवे, असेही ते म्हणाले.
 
विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी अंबाझरी उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी माजी खासदार अविनाश पांडे यांनी दिलेल्या निधीबद्दल आभार मानले. एका चांगल्या हेतूसाठी निधी खर्च झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जैवविविधता समितीच्या सभापती दिव्या धुरडे आणि नगरसेविका परिणिता फुके यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. अंबाझरी तलावासारखे शहरातील ऐतिहासिक वारसे जपण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. नागपूर महानगरपालिका गेल्या काही वर्षांपासून नदी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबवित असल्याने नागरिकांमध्ये कमालीची जनजागृती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
प्रास्ताविकातून कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी अंबाझरी उद्यानात करण्यात आलेल्या सौंदर्यीकरण कामाची माहिती दिली. स्थापत्य कामे आणि विद्युतविषयक कामे असे दोन टप्प्यात कामे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ३४ लाख ८० हजार ९५० रुपयांची स्थापत्य कामे, २४ लाख ८० हजार ९५० रुपयांची हिरवळीची कामे, चार लाख ९७ हजार ५०० रुपयांची खेळणी आणि चार लाख ७७ हजार १५० रुपयांचा निधी ग्रीन जीमवर खर्च करण्यात आला. याव्यतिरिक्त २४ लाख ९९ हजार ५५ रुपयांचा निधी हायमास्ट लाईटवर खर्च करण्यात आल्याची माहिती श्री. बोरकर यांनी दिली.
 
यावेळी माजी खासदार अविनाश पांडे यांनी रिमोटची कळ दाबून सौंदर्यीकरणाची माहिती देणाऱ्या फलकाचे अनावरण केले. यानंतर त्यांनी स्वत: उपस्थित मान्यवरांसोबत सौंदर्यीकरण कामाची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्वश्री जयंत ठाकरे, अभिजित सपकाळ, संजय देशपांडे, रवींद्र दरेकर, अतुल लोंढे, मुजीब पठाण, कमलेश समर्थ, प्रकाश इटनकर, बाबा वकील, माजी नगरसेवक अनिल मछले, ईश्वर चौधरी आदी उपस्थित होते.

 

 

शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय पुस्तके

शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांची माहिती
 
मनपाच्या सर्व शिक्षकांचे डिजीटल प्रशिक्षण पूर्ण
 
नागपूर,ता.१८ : नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळा २६ जून पासून सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २६ जूनला विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शालेय पाठ्यपुस्तक देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली आहे.
 
सोमवार (ता.१८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात शिक्षण समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला समिती उपसभापती भारती बुंडे, सदस्या रिता मुळे, स्वाती आखतकर, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, मो.इब्राहिम तौफिक अहमद, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चापलेकर, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना विद्यार्थ्यांच्या गणवेशाची व शालेय पुस्तकाची प्रक्रिया कुठवर आली, याचा आढावा सभापती दिलीप दिवे यांनी घेतला. इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येईल, यासंबंधीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. २६ जूनपासून शाळा सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात यावा, स्थानिक आमदारांना, महापौर, उपमहापौर, पदाधिकारी, झोन सभापती, विषय समिती सभापती यांच्याद्वारे विविध शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात यावा, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी सांगितले.
 
विद्यार्थ्यांना सायकल बँक योजनेअंतर्गत दहा लक्ष रूपयांच्या सायकली वितरित करण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या स्थितीत २६० विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले आहे. दर वर्षीच्या अर्थसंकल्पात दहा लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शाळेपासून दूर राहणाऱ्या आणि घराजवळ बसेसची सोय नसलेल्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा सभापती दिलीप दिवे यांनी केली. नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत बायोमॅट्रिक सिस्टीम लागू करण्याच्या तयारीचा आढावा सभापतींनी यावेळी घेतला. महापालिकेच्या ३७ शाळेत बायोमॅट्रिक सिस्टीम लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या महिन्याअखेर बायोमॅट्रिक प्रणाली लागू करण्यात येणार आहे. मनपाच्या सर्व १५२ शिक्षकांनी डिजीटल प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यावर्षीपासून मनपाच्या विद्यार्थ्यांना डिजीटल प्रशिक्षण पद्धतीने शिकविण्यात येणार आहे.
 
नागपूर महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी बैठकीत मांडण्यात आला. यावर बोलताना सभापती दिलीप दिवे म्हणाले, स्थायी समितीने या विषयाला मंजुरी दिली तर शिक्षण समिती या प्रस्तावाला मंजुरी देईल, अशी अट सभापतींनी घातली. मनपाच्या २८ शाळांपैकी ११ शाळा ह्या विनाअनुदानीत आहेत. त्या अनुदानीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली. सदर विषयासाठी शिक्षण समिती  मंजुरी प्रदान करीत असल्याची घोषणा सभापती दिलीप दिवे यांनी केली.
 
शाळेतील मैदाने हे विकसित करण्याचे आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्याधापकांमार्फत संबंधित झोन सहायक आयुक्तांकडे पाठविण्यात यावे. यामध्ये शाळा निरिक्षकांनी विशेष लक्ष देण्यात यावे, असे निर्देश सभापतींनी दिले. यावेळी अक्षय पात्र योजनेचा आढावा सभापतींनी घेतला.

 

 

महापौर नंदा जिचकार आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी  संयुक्त केली स्मार्ट सिटीच्या नगररचना परियोजनाची  पाहणी

नागपूर,ता.१५.नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत पुनापूर, भरतवाडा, पारडी येथे तयार करण्यात आलेल्या नगररचना परियोजनेची पाहणी महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी (ता.१५) सकाळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आयुक्त वीरेंद्र सिंह, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, उपअभियंता राजेश दुफारे प्रामुख्याने उपस्थित होते. 
 
यावेळी मान्यवरांनी पारडी येथील शीतला माता मंदिराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीपासून पाहणी दौ-याला सुरवात केली. त्यानंतर भरतवाडा रोड, पुनापूर, भवानी माता मंदिर परिसरासमोरिल रस्ते, भंडारा रोडवरील रस्ते याची पाहणी मान्यवरांनी केली. सदर प्रकल्पाचा मंजूर नकाशा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांनी महापौर आणि आयुक्त यांच्या समक्ष सादर केला. कामाला लवकरात लवकर चालना मिळावी यासाठी प्रयत्नरत राहवे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
यावेळी महापौरांनी आणि आयुक्तांनी स्मार्ट सिटीच्या नगररचना परियोजना समजून घेतली. स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नगररचना परियोजना (टीपीएस)विषयी असलेल्या नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

 

 

आयुक्तांसह सर्व अधिकारी, मनपा विभाग प्रमुखांचे होणार 'ट्रेकिंग'!

नागपूर,ता.१५ :  शासकीय कार्यालयात अनेक कर्मचारी वेळेवर हजर होत नाहीत. काहीजण कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालयातून गायब होतात. निर्धारित वेळेपूर्वीच निघून जातात, अशा स्वरूपाच्या तक्रारी होत असतात. यावर नागपूर महानगरपालिकेने कर्मचा-यांचे जीपीएस प्रणाली आधारित 'ट्रेकिंग' करण्यासाठी 'स्मार्ट वॉच'ची निर्माण केली आहे. 
 
ज्या कर्मचाऱ्यांनी विशिष्ट क्षेत्रात काम करणे अपेक्षित आहे त्या क्षेत्राचे 'जियो फेन्सींग' केले जाते. संबंधित कर्मचारी स्मार्ट घड्याळ घालून आपल्या कार्यक्षेत्रात प्रवेश करतात तेव्हा त्याची रिअल टाईम नोंद होते. म्हणजेच कर्मचारी किती वेळ क्षेत्रात कामावर होता, किती वेळ नव्हता याची अद्ययावत माहिती आयुक्तांना डॅशबोर्डवर दिसू शकते.
 
ही घड्याळे मूळतः सफाई कामगारांना देण्यासाठीचा प्रस्ताव होता. मात्र नवनियुक्त आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी स्वतःसह सर्व विभाग प्रमुखांनी घड्याळ वापरावे, असे ठरविले आणि शुक्रवारी (१५ जून) स्वतः घड्याळ घालून याची सुरुवात केली. याप्रसंगी आयुक्तांसह एकूण ३२ अधिकाऱ्यांना घड्याळे देऊन त्यांना स्मार्ट यंत्रणेत 'रजिस्टर' करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याप्रसंगी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांनी निर्देशाच्या चौकटीत राहून कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांचे 'ट्रेकिंग' करायचे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही झाले पाहिजे, या विचाराचा मी पुरस्कर्ता आहे.  घड्याळ वापरणे म्हणजे संबंधित व्यक्तीच्या कोणत्याही वैधानिक स्वातंत्र्यावर बाधा नाही. लागू असणाऱ्या रजा व अन्य सवलती कायमच राहणार आहेत. केवळ १० ते ६ ह्या कार्यालयीन वेळेतच 'ट्रेकिंग' होईल आणि सायंकाळी ६ वाजता आपोआपच ट्रेकिंग बंद होईल, अशी यंत्रणा ही आहे. अर्थात ६ नंतर कर्माचारी वेळ पाळण्यासाठी म्हणून घड्याळ विनासायास वापरू शकतात. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची वाहने शासकीय कामासाठीच वापरली जात आहेत की नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनांची जीपीएस ट्रेकिंग सिस्टिम लवकरच सुरू करण्यात येईल, असेही आयुक्त यांनी यावेळी बोलताना सांगितले.  अधिकाऱ्यांचे मर्यादित भौगोलिक क्षेत्र (कामगारांप्रमाणे) नसते. त्यामुळे कार्यालयीन वेळेत कर्मचारी दिवसभर कुठे कुठे होता याची माहिती आयुक्तांना मिळत राहील. सदर 'स्मार्ट वॉच' वेळ दाखवते, यात मोबाईल प्रमाणे कॅमेरा व लाईट्सची सोय करण्यात आली आहे. घेतलेली फोटो सर्वरमध्ये ठेवली जातात.
 
सदर घडळ्याची निर्मिती आयटीआय ह्या भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या कंपनीने केली आहे, अशी माहिती अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नवनियुक्त उपायुक्त नितीन कापडनीस, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, जयंत दांडेगावकर,  आयटीआय लिमिटेडचे अभय खरे, यांच्यासह सर्व मनपा विभागप्रमुख उपस्थित होते. 

 

 

उपमहापौरांनी घेतला योग दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा

विविध योग संस्थेचा सहभाग राहणार
 
नागपूर,ता.७. दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ जुन रोजी जागतिक योग दिन नागपूर महानगरपालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या तयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी गुरूवारी (ता.१५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात घेतला.
 
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेविका रूपा राय, उपायुक्त रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त विजय हूमने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी होणा-या संस्थेची काय तयारी आहे, याचा आढावा उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी घेतला. कार्यक्रमात किती साधक उपस्थित राहील त्यांची काय व्यवस्था करण्यात आली आहे. याचाही आढावा उपमहापौरांनी यावेळी घेतला. साधकांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी व नेण्यासाठी मनपाच्या बसेसची सोय करण्यात आली आहे. कोणत्याही संस्थेचे किती साधक येणार आहे, त्यांना बसेस लागतील की नाही, यासंबंधीचा आढावा ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी घेतला. ज्यांना बेसेसची गरज आहे त्यांनी मनपाच्या परिवहन विभागाशी संपर्क साधावा. किंवा धरमपेठ झोन सहायक आयुक्तांना याबाबत पत्रद्वारे कळविण्यात यावे, असेही दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
 
दरवर्षी नागपूर महानगरपालिका जागतिक योग दिवसाचा कार्यक्रम हा जनार्दन योगाभ्यासी मंडळ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यासह इतर योग संस्थेच्या सहकार्याने होत असतो. यावर्षीही सर्व योग संस्थेच्या सहकार्याने जागतिक योग दिनाचा कार्यक्रम घेण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली.
 
बैठकीला यावेळी जनार्दन योगाभ्यासी मंडळ, आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, ओशोधारा संघ नागपूर, आर्ट ऑफ लिव्हिंग नागपूर, नागपूर जिल्हा हौशी योग संघटना असोसिएशन नागपूर यांच्यासह विविध योग संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

यंदाचा महिला उद्योजिका मेळावा दिवाळीपूर्वीच होणार

महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांची माहिती : महिला व बालकल्याण विभागाची आढावा बैठक
 
नागपूर,ता.१५. नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागाद्वारे दरवर्षी घेण्यात येणारा महिला उद्योजिका मेळावा हा दिवाळी पूर्वी घेण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी दिली आहे. शुक्रवार (ता.१५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित महिला व बालकल्याण समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी याबाबत माहिती दिली.
 
यावेळी समिती उपसभापती विशाखा मोहोड, मनपाच्या प्रतोद आणि समिती सदस्य दिव्या धुरडे, सदस्या सरिता कावरे, रश्मी धुर्वे, वैशाली नारनवरे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, दरवर्षी हा महिला उद्योजिका मेळावा दिवाळीनंतर आयोजित केला जातो. यावर्षी दिवाळीमध्ये लागणा-या वस्तुंची निर्मिती नागपूर महानगरपालिकेच्या नोंदणीकृत महिला बचत गटाकडून तयार करून घेण्यात येणार असून त्याची विक्री महिला उद्योजिका मेळाव्यात करण्यात येणार असल्याची माहिती प्रगती पाटील यांनी दिली.
 
महिला व बालकल्याण समितीद्वारे वृध्दाश्रम तथा विरंगुळा केंद्र तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. याबबात स्थावर विभागाने आश्रमासाठी जागा उपलब्ध तयार करून दिली आहे. त्या जागेची सर्व समिती सदस्यांनी पाहणी करावी, अशी सूचना सभापती प्रगती पाटील यांनी केली. जागेसाठीची प्रक्रीया आणि त्यांनतरच्या कार्यवाहीची तयारी करण्यात यावी, अस निर्देश प्रशासनाला सभापतींनी दिले. वृद्धाश्रम कम अनाथाश्रम तयार करून त्यासाठी शासनाचे अनुदान तयार करण्यासाठी काय प्रक्रिया आहे, याची माहिती उपसभापती विशाखा मोहोड यांनी दिली. यासंबंधीच्या अटीमध्ये वयोमर्यादेची अट महत्वाची आहे. वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमासाठी शासनाचे जे नियम आहे, त्यानुसारच याची कार्यवाही करावी, असे निर्देश सभापती प्रगती पाटील यांनी दिली.
 
नागपूर महानगपालिकेच्या शाळेत महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून सॅनेटरी नॅपकीन व्हेडींग मशीन्स लावण्यात येत आहे. महापालिकेच्या दोन शाळेत ज्या शाळेत विद्यार्थीनींची संख्या जास्त आहे. अशा शाळेत ही कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश सभापती प्रगती पाटील यांनी केली.
 
शहरातील महिलांना स्वयंरोजगार आणि स्वालंबित करण्यासाठी वैयक्तीगत व्यवसायाकरीता चाय बाईक ही संकल्पना महिला व बालकल्याण समितीने मांडली आहे. महिलाला बाईक स्वरूपात द्यावी, यावर ती चहाचा व्यवसाय करेल, अशी प्रायोगिक तत्तावर बाईक खरेदी करण्यात येत आहे. त्यांनतर दहा झोन मध्ये प्रत्येकी एक बाईक घेण्यात येईल. सध्याच्या स्थितीत एक बाईक घेण्याचा प्रस्ताव समितीचा आहे. ईश्वर चिठ्ठीने लाभार्थ्यांचे नाव घोषित केले जाईल, अशी माहिती सभापती प्रगती पाटील यांनी दिली.
 
पथविक्रेता धोरणाबाबत बाजार विभागाने केलेल्या २०१७-१८ कार्यवाहीचा आढावा सभापती पाटील यांनी बाजार अधीक्षक मदन सुभेदार आणि सहायक आयुक्त विजय हुमने यांच्यामार्फत घेतला. सर्वपक्षीय नगरसेविकांचा प्रशिक्षण दौरा आयोजित करण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली. सर्वांनी स्थान सूचित करावे, असे सभापती श्रीमती पाटील यांनी निर्देशित केले. महिला बचत गटांद्वारे मनपा मुख्यालयात फुड स्टॉल, झेरॉक्स मशीन्स लावण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबत आढावा सभापतींनी घेतला. शहराच्या केंद्रस्थानी बचत गटाद्वारे उपहारगृह तयार करण्यात येणार आहे. ज्या रेल्वेंमध्ये पँट्री कार नसते त्यामध्ये महिला व बचतगटांच्या महिला जेवण्याचा डब्बा देणार आहे, या बाबत रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सभापती प्रगती पाटील यांनी दिली.

 

 

रस्ता खोदकामासाठी आता मनपाची परवानगी आणि ‘डिपॉझिट’ आवश्यक

आयुक्त वीरेंद्र सिंह यांचे निर्देश : प्रत्येक महिन्याला होणार समन्वय बैठक
 
नागपूर,ता.१२ : मोबाईल कंपन्यांच्या केबलसाठी करण्यात येणारे खोदकाम असो, अथवा पाण्याची लाईन टाकण्यासाठी ओसीडब्ल्यू करीत असलेले खोदकाम असो, नाहीतर वीज कंपनीने वीज जोडणी केबल टाकण्यासाठी केलेले खोदकाम असो, यापुढे या खोदकामासाठी मनपाची परवानगी तर आवश्यक असेलच शिवाय संबंधित कंपनीला नियमानुसार ‘डिपॉझिट’ मनपाकडे जमा करावे लागेल. जोपर्यंत कंपनी किंवा एजंसी खोदकाम केलेल्या जागेचे पुनर्भरण करीत नाही आणि त्याला मनपाच्या अधिकाऱ्यांकडून ‘नाहरकत’ मिळत नाही, तोपर्यंत कंपनीला ‘डिपॉझिट’ परत मिळणार नाही, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या लोककर्म विभागातर्फे सुरू असलेल्या सीमेंट रस्ते आणि अन्य प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी मनपा मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. यासांदर्भातील परिपत्रक तातडीने संबंधित विभाग, कंपनी आणि एजंसीसना पाठविण्यात येणार आहे. सदर आढावा बैठकीत रस्ता खोदकाम झाल्यानंतर त्याचे पुनर्भरण करण्यात येत नाही. केले तर ते थातूरमातूर असते, यासंदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. नियमात असताना आपण संबंधित विभाग, एजंसीकडून डिपॉझिट का घेत नाही, असा सवाल त्यांनी केला. यावर नियमांची चाचपणी केल्यानंतर तातडीने हा निर्णय अंमलात आणण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
नागपूर शहरात प्रगतीपथावर असलेल्या सीमेंट रस्ता बांधकाम कामाचाही त्यांनी आढावा घेतला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सीमेंट रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मनपाच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिका अधिनियम २३५ आणि २३७ अन्वये कार्यवाही करीत ज्या रस्त्याचे बांधकाम सुरू करीत आहे त्या रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र हलविण्यासंदर्भात कार्यकारी आदेश काढावे आणि त्यासंदर्भातील माहिती वाहतूक पोलिसांना द्यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
जी सीमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा नीट निचरा होईल, अशी व्यवस्था करा आणि तातडीने कामे पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले. सीमेंट रस्त्यांसोबतच शहरातील डी.पी. रोड, मोक्षधामनजिकचा पूल, हुडकेश्वर-नरसाळा पाणी टाकी, नवी शुक्रवारी क्रीडा संकुल, फिश मार्केट, नरसाळा दहन घाट, त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्र, लक्ष्मीनगर झोन नागरी सुविधा केंद्र, शहरी बेघर निवारा आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावाही आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी घेतला.
 
सदर बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, राजेश भूतकर, अनिरुद्ध चौगंजकर, मोती कुकरेजा, गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, उपअभियंता राजेश दुफारे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.
 
नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘माहिती फलक’
 
सीमेंट रस्ता अथवा शहरात कुठलाही प्रकल्प सुरू असेल तर त्याची संपूर्ण माहिती नागरिकांना होणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक सीमेंट रस्ता बांधकाम ठिकाणी कंत्राटदाराचे नाव, प्रकल्पाची किंमत, कार्य सुरू होण्याची तारीख, पूर्ण होण्याचा अवधी ही संपूर्ण माहिती तातडीने लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. इतकेच नव्हे तर वळण रस्ता, रिफ्लेक्टर आदी लावण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
 
दुभाजकांवर लागणार रिफ्लेक्टर
 
शहरातील प्रत्येक रस्ता दुभाजकांवर रिफ्लेक्टर आणि वाहतूक नियमांचे फलक लावण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. हे रिफ्लेक्टर एका विशिष्ट अंतरावर लावण्यात यावे. संपूर्ण शहरात लावण्यात येणारी फलके ही एकाच उंचीची, एकाच डिझाईनची असावीत, अशाही सूचना त्यांनी केल्या.
 
महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी होणार समन्वय बैठक
 
जुलै महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी नागपूर महानगरपालिका हद्दीत काम करणाऱ्या विविध विभागांची, एजंसीची समन्वय बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिली. या बैठकीत मेट्रो, ओसीडब्ल्यू, वीज कंपनी, बीएसएनएल, पोलिस विभाग अशा सर्वच विभागांच्या विभागप्रमुखांना आमंत्रित करण्यात येणार आहे. शहर हद्दीत काम करताना प्रत्येक विभागाचा समन्वय असावा, हा या बैठकीमागील हेतू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याअंतर्गत पहिली बैठक १० जुलैला आयोजित करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

 

 

नाग नदी विकास आराखड्यावर एएफडी प्रतिनिधींसोबत बैठक

नागपूर,ता. १२ : नाग रिव्हर फ्रंड डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या नाग नदी विकास आराखड्यासंदर्भात मंगळवारी (ता. १२) फ्रान्स येथील एजन्सी ऑफ फ्रेन्च डेव्हलपमेंट (एएफडी)च्या प्रतिनिधींसोबत नागपूर महानगरपालिका, एनएसईएल आणि नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. सदर बैठकीत नाग नदी विकासाच्या प्रस्ताविक विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
 
नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पार पडलेल्या बैठकीला आयुक्त वीरेंद्र सिंह, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, एनईएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिजवान सिद्दिकी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक वनसंरक्षक व्ही.एस. उमाळे, एएफडीचे नगर विकास प्रकल्प अधिकारी एंटोनी बेज, क्लेमन्स (Antoine Buge), विडाल डी ले ब्लिलकॅच (Clemence Vidal de le blechec), गौतियन कोहलर (Gautier Kohler), पॅरिस येथील सिग्नेस कंपनीच्या वास्तुविशारद सिबिला जॅक्सिक (Sibila Jaksic), पी.के. दास ॲण्ड असोशिएटस्‌ मुंबई येथील वास्तुविशारद समर्थ दास, एनएसएससीडीसीएलचे महाव्यवस्थापक (इन्फ्रास्ट्रक्चर)उदय घिये, महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, मुख्य अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते. 
 
यावेळी सिग्नेस कंपनीच्या आर्किटेक्ट सिबिला जॅक्सिक आणि पी.के. दास ॲण्ड असोशिएटस्‌चे समर्थ दास यांनी नाग नदीच्या विकास आराखड्यासंदर्भात सादरीकरण केले. नाग नदीच्या तीरावरील सौंदर्यीकरण, त्यासाठी असलेली जमिनीची आवश्यकता, पाण्याची शुद्धीकरण आदीबाबत त्यांनी प्रस्तावात नमूद केले आहे. नाग नदीचे उगमस्थान अंबाझरी ओव्हलफ्लो पासून प्रजापती नगर पारडीपर्यंतच्या नाग नदीच्या तीरावर काय-काय केले जाऊ शकते, याबाबत माहिती दिली. यासंदर्भातील डीपीआरचा पहिला आराखडा ३० सप्टेंबरपर्यंत सोपवावा, अशी सूचना आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केली. 
 
एएफडीने यावेळी नाग नदी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत पुढील वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपअभियंता (नद्या व सरोवरे) मो. इसराईल, उपअभियंता राजेश दुफारे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर उपस्थित होते. 

 

 

जुन्या कंत्राटदाराची खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने त्वरित हटवा!

आयुक्त वीरेंद्र सिंह यांचे निर्देश : चिल्ड्रेन ट्राफिक पार्कचा केला दौरा
 
नागपूर,ता.१२ :  नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाअंतर्गत येणाऱ्या धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्राफिक पार्कची पाहणी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी (ता.१२) सकाळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रभारी मुख्य अभिंयता मनोज तालेवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अभियंता प्रशांत सोनकुसरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
लहान मुलांना वाहतुकीचे नियम समजावे, त्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता चिल्ड्रेन ट्राफिक पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. त्यादृष्टीने त्याची रचना तयार करण्यात आली आहे. चिल्ड्रेन ट्राफिक पार्क हे ट्राफिक पार्कच असावे, त्याठिकाणचा अम्युझमेंट पार्क पुढील पाच दिवसात बंद करण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
त्याजागी असलेला भूत बंगला, मिरर शो, अन्य मनोरंजक साधने, जुन्या कंत्राटदार विभूती इंटरप्राईजेच्या मालकीचे असलेले खेळणे पुढील पाच दिवसात काढून टाकण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. नागपूर महानगरपालिकेच्या मालकीची असलेली लहान मुलांची खेळणीच या पार्क मध्ये राहील, अशी सूचना आयुक्तांनी केली. पार्कमध्ये असलेले खासगी खाद्य पदार्थांची दुकाने काढून टाकण्यात आली असल्याची माहिती उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली. पार्कमध्ये मनपाच्या मालकीची खाद्य पदार्थांची दुकाने सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध आहेत. त्या दुकांनाना ज्या खाद्य पदार्थांची परवानगी आहे, तीच खाद्यपदार्थ तेथे उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करण्यात यावी, असे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सूचित केले.
 
पार्कलगत असलेल्या जागेत मनपा आरोग्य विभागाची इमारत आहे. ती बंद अवस्थेत आहे. त्याला सुरू करून ती जागा स्वच्छ करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. पार्कबाहेर असलेले हातठेले व दुकाने तातडीने बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. पार्कचे पार्किंग हे मनपाच्या अखत्यारित घेण्यात यावे, जेणेकरून त्यातून मनपाला उत्पन्न प्राप्त होईल, असेही आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच पार्किंग स्थळावर सूचनाफलक लावण्याची सूचनाही केली.
 
पार्कमधील स्थापत्य कामाची दुरूस्ती तात्काळ करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी उद्यान अधीक्षक यांना दिले. फ्लोरिंग, रस्त्याची डागडूजी, मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

 

 

मोक्षधामनजिकचा नाग नदीवरील पूल लवकरात लवकर खुला करावा!

आयुक्त वीरेंद्र सिंह यांचे निर्देश  
 
नागपूर,ता.१२ : नागपूर महानगरपालिकेद्वारे मोक्षधाम घाट येथील पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. हा पूल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. मंगळवारी (ता.१२) ला सकाळी आयुक्तांनी मोक्षधाम येथील निर्माणाधीन पुलाची पाहणी केली.
 
यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर प्रामुख्याने उपस्थित होते. मोक्षधाम पुलाच्या सीमेंटीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी दिली. पुलाच्या कामाला बराच उशीर झाला आहे, आता उशीर नको व्हायला, अशी सूचना करत या महिन्याच्या अखेरीस पुलाचे काम पूर्ण व्हायला हवे. हा पूल या महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, असेही आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सांगितले. यानंतर मान्यवरांनी इमामवाडा परिसराची पाहणी केली. मोक्षधाम पुलाकडून मेडिकल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाईपलाईन फुटल्याने पाणी वाहत चालले आहे. परिसरात चिखलही झाला आहे. ती पाईपलाईन तातडीने संबंधित अधिकाऱ्याकडून दुरूस्त करून घ्यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. स्थानिक व्यावसायिक संस्थानांनी आपल्या दुकांनासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना देखील आयुक्तांनी यावेळी केल्या.
 
सहकार नगर येथील नाल्याच्या पुलाची पाहणी.
 
सहकारनगर घाटनजिक असलेल्या नाल्यावरील असलेल्या पुलाची पाहणी यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह आणि अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी केली. शनिवारी व रविवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे पुलालगत असलेली पाईपलाईन विस्कळीत झाली होती. ती पाईपलाईन दुरूस्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील पाच दिवसात काम पूर्ण करण्याचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी आदेश दिले. यापुढे असे प्रकार घडणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शोधून काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

 

 

पावसाचे पाणी साचण्याचे कारण शोधून ती दूर करण्याचा प्रयत्न करा - महापौर नंदा जिचकार

पुर आपत्ती नियंत्रण यंत्रणा सज्ज ठेवा
 
नागपूर,ता.११. गेल्या दोन दिवसापासून सातत्याने येणा-या पावसामुळे शहरातील जनजवीन प्रभावित झाले आहे. पुष्कळ ठिकाणी बराच काळ पाणी साचून राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पावसाचे पाणी साचण्याचे कारण शोधून ती दूर करण्याचा प्रयत्न करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. सोमवारी (ता.११) राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन, महाल येथे पुर आपत्ती नियंत्रण यंत्रेणेचा आढावा महापौरांनी घेतला.
 
यावेळी उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त वीरेंद्र सिंह, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, कर व कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, नगरसेवक प्रवीण भिसीकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके प्रामुख्याने उपस्थित होते.
 
प्रारंभी महापौरांनी शहरातील कुठल्या भागात पावसाचे पाणी साचून राहिले याचा आढावा झोन सहायक आयुक्तांमार्फत घेतला. पावसाचे पाणी साचण्याचे कारणही शोधून त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शहरात दोन ते तीन तासापेक्षा जास्त काळ पावसाचे पाणी साचून राहते, असे ठिकाणांची यादी तयार करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी झोन सहायक आयुक्तांना दिले.
 
शहरातील खोलगट भागातील अतिक्रमण त्वरित काढण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. तसेच खोलगट भागातील ड्रेनेज लाईनही तातडीने स्वच्छ करण्यात यावी, अशा सूचनाही महापौरांनी यावेळी केल्या.
 
यावेळी झोन सहायक आयुक्त सर्वश्री विजय हुमने, प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरिश राऊत, गणेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.   

 

 

मनपाद्वारे फुटाळा तलाव स्वच्छतेचा जागर

परिसरातील अतिक्रमण हटवले
 
नागपूर,ता.9. नागपूर महानगररपालिद्वारे फुटाळा तलाव येथे शनिवारी (ता.9) श्रमदान करण्यात आले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फुटाळा तलाव स्वच्छेता मोहिमेचा आढावाही घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलाव संपूर्णपणे स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. शनिवारी फुटाळा तलाव येथे नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी श्रमदान केले. तलावातील जलपर्णी काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलेला आहे. या गाळ योग्य त्या जागी साठविण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. तलावाच्यालगत असलेल्या जागेत फक्त दिवसातून तीन तास पार्किंग करण्यात येईल, अशी सोय करण्यात यावी, दिवसभरासाठी वाहनांना पार्किंगसाठी बंदी घालण्यात यावी, असे निर्देश आय़ुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
तलावाच्यालगत असलेले अतिक्रमण आयुक्तांनी त्वारित हटविण्याचे आदेश देताच, परिसरातील  अतिक्रमणावर बुलडोजर चालविण्यात आले. तलावापरिसरातील दुकांनानी आपली हद्द सोडून अवैधरित्या शेड टाकले आहे. त्यावर आयुक्तांनी सर्व दुकानांना नोटिस देऊन ते शेड काढून टाकण्यात यावे, असे निर्देश दिले. मजुर नकाशानुसार जर बांधकाम नसेल तर ते ही काढून टाकण्याचे आदेश यावेळी आय़ुक्तांनी संबंधित अधिका-यांना दिले.
 
फुटाळा तलावाच्या परिसरात प्रत्येक 100 मीटर अंतरावर कचरा पेटी ठेवण्यात यावी, जेणे करून नागरिक कचरा त्या कचरा पेटीतच टाकतील. तलावात घाण केल्या जाणार नाही, अशा सूचना देखील आयुक्त वीरेंद्र सिह यांनी केल्या. परिसरात प्राळीव प्राणी आणण्यासाठी मज्जाव करण्यात यावा, परिसरात येणा-या गायी- म्हशीचा बंदोबस्त करण्यात यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. परिसरात सूचना फलक ही लावण्यात यावे, असे निर्देश आय़ुक्तांनी दिले.
 
परिसरात मंदिराचा काही भाग वाढविण्यात आलेला आहे. या बाबत नासुप्र ला पत्र पाठविण्यात यावे, मंदिराचे बांधकाम मंजुर नकाशाप्रमाणे आहे की नाही, याची खातरजमा करावी, त्याचा अहवाल मला सादर करावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, पशुचिकिस्तक डॉ.गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त विजय हुमने, अशोक पाटील, राजेश कराडे, हरिश राऊत, प्रकाश वराडे, स्वास्थ निरिक्षक रोहिदास राठोड यांच्यासह सर्व झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

 

 

महानगरपालिकेच्या शाळेचा निकाल ७४ टक्के

गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार
 
नागपूर,ता. ८ : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने आज जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांचा निकाल ७४ टक्के इतका लागला आहे. महापौर नंदा जिचकार यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी (ता.८) मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयात केला.
 
यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, उपनेत्या वर्षा ठाकरे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, शिक्षण समिती सदस्य स्नेहल बिहारे, राजेंद्र सोनकुसरे, भारती बुंडे, नगरसेविका वंदना भगत, मनीषा कोठे, नगरसेवक किशोर जिचकार, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी महापौर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना तुळशीचे रोपटे भेट म्हणून दिले. विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. मागील वर्षीच्या प्रमाणात मनपाच्या शाळेचा निकाल यावर्षी वाढला असल्याने त्यांनी शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार आणि त्यांच्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
 
गुणवंत विद्यार्थ्यांमंध्ये मराठी माध्यमातून कु.कोमल गणेश अलोणे, दुर्गानगर माध्यामिक शाळा (९०.६०%), दिव्या मिलिंद नरांजे, दुर्गानगर माध्यामिक शाळा (९०%), भूषण नरेश हर्षे, जयताळा माध्यामिक शाळा (८८.४०%), हिंदी माध्यामातून मनोज राधेश्याम यादव, कपीलनगर माध्यामिक शाळा (९१.२०%), कीर्ति बिरपाल वर्मा, संजयनगर शाळा (९०.६०%), बिसमणी महेश धुर्वे, विवेकानंदनगर शाळा (८८.२०%), उर्दू माध्यामिक शाळेतून समरीन बानो, गरीब नवाज उर्दु (८६%), इकरा शहरीश आबीदखान, एम.के.आझाद (८६%), अलकीया अंजूम अ.रशीद, एम.के.आझाद (८५%), उन्मुलकुश मो.अंसारी, एम.के.आझाद (८५%), मागासवर्गीयातून दुर्गानगर माध्यामिक शाळेचा दिव्या मिलिंद नरांजे या विद्यार्थ्याला ९० टक्के प्राप्त झाले. दिव्यांगामधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेचा प्रमोद चौधरी या विद्यार्थ्याला ७४.८० टक्के प्राप्त झाले आहे. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर यांनी केले. आभार संध्या इंगळे यांनी मानले.

 

 

अन्न नाल्यांमध्ये टाकणाऱ्या हॉटेलचे सर्वेक्षण करा : मनोज चापले

आरोग्य समितीच्या बैठकीत निर्देश : मान्सूनपूर्व तयारीचा घेतला आढावा
 
नागपूर,ता.८ : नागपूर शहरातील अनेक हॉटेलमधून अन्न नाल्यांमध्ये फेकले जाते. हॉटेलमधून निघणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी आणि ते ड्रेनेजला जोडण्यासाठी मनपाकडून परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी लोककर्म विभागाकडून दिल्या जाते. लोककर्म विभागाकडे परवानगीसाठी अर्ज आल्यास त्यांनी आरोग्य विभागाला त्याची माहिती द्यायला हवी. मात्र, तसे होत नाही. यापुढे आरोग्य विभागाला त्याची माहिती देण्यात यावी आणि कुजलेले शिळे अन्न नाल्यांमध्ये टाकणाऱ्या हॉटेलवर कार्यवाही करण्यासाठी तातडीने एक सर्वेक्षण करा, असे निर्देश आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित आरोग्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपसभापती विजय चुटेले, सदस्य प्रमोद कौरती, लखन येरवार, विशाखा बांते, गार्गी चोपरा, दिनेश यादव, वंदना चांदेकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (मे.) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, पशुचिकित्सक डॉ. गजेंद्र महल्ले, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, परिवहन नियंत्रक योगेश लुंगे उपस्थित होते.
 
सदर बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा सभापती मनोज चापले यांनी केले. हॉटेलचे अन्न नाल्यांत टाकल्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. साथीचे रोग वाढू शकतात. यासाठी आता त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. यासाठी तातडीने सर्वेक्षण करा आणि अशा हॉटेलमालकांना नोटीस देण्याची कार्यवाही करा, असे निर्देश त्यांनी दिले. यानंतर सभापती चापले यांनी नाले सफाईचा झोननिहाय आढावा घेतला. चेंबर सफाईचे काम तातडीने पूर्ण करा. झोनमध्ये ज्या चेंबरवर झाकणाची आवश्यकता आहे त्याची तातडीने यादी बनवून शनिवारी सायंकाळपर्यंत मुख्यालयाला पाठवा आणि दोन दिवसांत त्यावर झाकणे लावा, असे निर्देशही त्यांनी दिले. पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढू शकते. त्यादृष्टीने सुरू असलेल्या उपक्रम आणि उपाययोजनांबाबत हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी माहिती दिली. बैठकीला सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

 

 

शासनाच्या योजना घराघरांपर्यंत पोहचविण्यासाठी कटिबद्ध : ना. सदाभाऊ खोत

मनपाला सदिच्छा भेट : पदाधिकारी, नगरसेवकांसोबत साधला संवाद
 
नागपूर, ता. ८ :  केंद्र शासन आणि राज्य शासनाने गेल्या चार वर्षात जनसामान्यांसाठी अनेक उपयोगी योजना राबविल्या. आम्ही कार्यकर्ता म्हणून त्या योजना लोकांपर्यंत पोहचविला. त्याचा लाभ लोकांना दिला. ह्या योजना आणि शासनाचे कार्य राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यादृष्टीने आमचे ‘समर्थनासाठी संपर्क’ अभियान सुरू असल्याचे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
 
खरीप हंगाम आढावा बैठकीच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या ना. सदाभाऊ खोत यांनी नागपूर महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली आणि पदाधिकारी तसेच भाजप नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, आमदार गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे, विदर्भ प्रांतचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, नागपूर महानगर संघटन मंत्री भोजराज डुंबे, नागपूर जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जि.प. चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, संदीप जाधव उपस्थित होते.
 
पुढे बोलताना ना. सदाभाऊ खोत म्हणाले, सरकारमध्ये काम करीत असताना मागील चार वर्षात जी-जी कामे केली ती घराघरांपर्यंत पोचविणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या एकूण २७ विकासात्मक योजनांचा आपण चार्ट तयार केला. ह्या योजना गावागावांत राबविण्याचा संकल्प केला. कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून एकाच तालुक्यातून १६ हजार अर्ज आले. त्यांना या योजनांचा लाभ देऊ शकलो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ओरडणाऱ्यांना आपण जाब दिला. त्यांना शांत बसावे लागले. ज्यांचा शेतमाल मंडीमध्ये येतो त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो अधिकार आता त्यांना मिळाला आहे. अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले. मुख्यमंत्री आरोग्य निधीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोठा लाभ झाला. आपण स्वत: आजपर्यंत सुमारे सात कोटींची मदत मुख्यमंत्री आरोग्य निधीच्या माध्यमातून रुग्णांना मिळवून दिली. माझ्या बंगल्यातील ५० टक्के जागा रुग्णसेवेसाठी राखीव असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्ररोग निदान शिबिराच्या माध्यमातून १६ हजार रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले. साडे चार हजार लोकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. भाजपकडून समाजापर्यंत कसे पोहोचायचे याचे ज्ञान मिळाल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
 
महापौरांनी केला सत्कार
 
यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा शाल, श्रीफळ आणि तुळशीचे रोपटे देऊन महापौर नंदा जिचकार यांनी सत्कार केला. आमदार सुधाकर कोहळे यांनीही त्यांचे स्वागत केले. आम्ही सुद्धा संपर्क अभियानाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. आपणही संपर्क अभियानाच्या निमित्ताने फिरत आहात. त्यामुळे संपर्काचा एक चांगला योग जुळून आल्याचे महापौर नंदा जिचकार आणि आमदार सुधाकर देशमुख यांनी म्हटले.

 

 

सात दिवसांत नदी स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा : मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह

पावसाळापूर्व तयारीचा आढावा : झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्याचे निर्देश
 
नागपूर,ता. ७ : शहरातील नदी स्वच्छतेचे शिल्लक काम पुढील सात दिवसांत तर नाले सफाईचे कार्य तीन दिवसांत पूर्ण करा. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत हे कार्य असल्यामुळे कुठलीही प्रशासकीय दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. जिथे अडचण येईल तिथे सरळ माझ्याशी संपर्क साधा, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.
 
सर्वप्रथम आयुक्तांनी स्ट्रेचनिहाय नदी स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. नदी स्वच्छता अभियानाअंतर्गत काही स्ट्रेचचे काम तांत्रिक अडचणीमुळे लांबले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. यावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. नदी स्वच्छता अभियान लोकसहभागातून असले तरी जेथे लोकसहभागातून आवश्यक मशिनरी मिळत नसेल तेथे मशिनरी किरायाने उपलब्ध करून घ्या. पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वच कामे बाधीत होतील. त्यामुळे या कामात मुळीच दिरंगाई नको. नदी स्वच्छतेचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले.
 
यानंतर आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी नाले आणि पावसाळी नाल्यासफाईंचा झोननिहाय आढावा घेतला. लक्ष्मीनगर झोनमध्ये २२ नाले असून त्यापैकी २१  स्वच्छ करण्यात आले आहेत. धरमपेठ झोनमध्ये ३५ पैकी ३१, हनुमाननगर झोनमध्ये १४ पैकी १२, धंतोली झोनमध्ये १८ पैकी १७, नेहरूनगर झोनमध्ळे १५ पैकी १३, गांधीबाग झोनमध्ये ५१ पैकी ५१, सतरंजीपुरा झोनमध्ये २२ पैकी २१, लकडगंज झोनमधील १२ पैकी ८, आसीनगर झोनमधील १८ पैकी १८ तर मंगळवारी झोनमधील २९ पैकी २७ नाले आतापर्यंत पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली असल्याची माहिती झोन सहायक आयुक्तांनी दिली. बैठकीला सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, डी.डी. जांभुळकर, सतीश नेरळ, अनिरुद्ध चौगंजकर, गिरीश वासनिक, राजेश भूतकर, नगर रचना सहायक संचालक प्रमोद गावंडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त अशोक पाटील, विजय हुमणे, राजू भिवगडे, प्रकाश वऱ्हाडे, हरिश राऊत, गणेश राठोड, राजेश कराडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.
 
झाडांच्या धोकादायक फांद्या त्वरित कापा!
 
नागपूर शहरात वादळी पाऊस आल्याने अनेक ठिकाणच्या झाडांच्या फांद्या तुटून खाली पडतात. यामुळे वाहनांचे नुकसान होते. मनुष्याच्या जीवालाही धोका होऊ शकतो. अशा धोकादायक फांद्या तातडीने कापा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. उद्यान विभागाने अशा धोकादायक झाडांचे सर्वेक्षण केले असून सुमारे ७० धोकादायक झाडे आढळली. फांद्या कापण्याआधी आणि फांद्या कापल्यानंतरचे छायाचित्र घ्या आणि त्याचा ठिकाणांसह संपूर्ण रेकॉर्ड ठेवा, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
 
२४ तास ३६५ दिवस सज्ज राहा!
 
आपत्ती व्यवस्थापन ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला आपली जबाबदारी निभावण्याचे अगदी मनापासून वाटले पाहिजे. अधिकाऱ्यांना ‘रिॲक्टिव्ह’ न होता ‘प्रो-ॲक्टिव्ह’ व्हावे, असा सल्ला आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिला. आपण अधिकारी आहोत. या शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी आहोत. त्यामुळे आपण २४ तास आणि ३६५ दिवस आपले कर्तव्य निभावले पाहिजे, असेही ते म्हणाले.
 
नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन
 
आपत्ती व्यवस्थापनात नागपूर महानगरपालिकेसोबतच नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची असते. कुण्या व्यक्तीला कुठेही धोकादायक झाडे आढळून आल्यास त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला याबाबत तातडीने माहिती देण्याचे आवाहन आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केले.
 
मनपाचा आपातकालीन नियंत्रण कक्ष
 
आपातकालिन स्थितीची माहिती देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा आपातकालिन नियंत्रणकक्ष कार्यान्वित आहे. यासाठी १०१ हा टोल फ्री क्रमांक आहे. याशिवाय ७०३०९७२२०० हा मोबाईल क्रमांक आहे. ह्या दोन मुख्य क्रमांकासोबतच ०७१२-२५६७७७७, ०७१२-२५६७०२९, ०७१२-२०३११०१, ०७१२-२५५१८६६ ह्या क्रमांकावरही नागरिकांना संपर्क साधता येईल. याव्यतिरिक्त झोननिहाय क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. लक्ष्मीनगर झोन-०७१२-०२२४५८३३, धरमपेठ झोन-०७१२-२५६५५८९, हनुमाननगर झोन-०७१२-२७५५५८९, धंतोली झोन-०७१२-२४६५५९९,२४३२३४४, नेहरूनगर झोन - ०७१२-२७०५५८९, गांधीबाग झोन-०७१२-२७३५५९९, सतरंजीपुरा झोन-०७१२-२७६७३३९, ७०३०५७७६५०, लकडगंज झोन-०७१२-२७३७५९९, आशीनगर झोन-०७१२-२६५५६०३, २६५५६०५, मंगळवारी झोन-०७१२-२५९५५९९.

 

 

महापौरांनी घेतला योग दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा

विविध योग संस्थेचा सहभाग राहणार
 
नागपूर,ता.७. दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ जुन रोजी जागतिक योग दिन नागपूर महानगरपालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या तयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी गुरूवारी (ता.७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात घेतला.
 
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त वीरेंद्र सिंह, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, उपनेते वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त विजय हूमने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी होणा-या संस्थेची काय तयारी आहे, याचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी घेतला. कार्यक्रमात किती साधक उपस्थित राहील त्यांची काय व्यवस्था करण्यात आली आहे. याचाही आढावा महापौरांनी यावेळी घेतला. पावसाळा सुरू आहे. कार्यक्रमादिवशी जर पाऊस आला तर कार्यक्रमाची पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
दरवर्षी नागपूर महानगरपालिका जागतिक योग दिवसाचा कार्यक्रम हा जनार्दन योगाभ्यासी मंडळ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यासह इतर योग संस्थेच्या सहकार्याने होत असतो. यावर्षीही सर्व योग संस्थेच्या सहकार्याने जागतिक योग दिनाचा कार्यक्रम घेण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली.
 
बैठकीला यावेळी जनार्दन योगाभ्यासी मंडळ, आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, ओशोधारा संघ नागपूर, आर्ट ऑफ लिव्हिंग नागपूर, नागपूर जिल्हा हौशी योग संघटना असोसिएशन नागपूर यांच्यासह विविध योग संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

पुढील आठ दिवसात नाले सफाईची सर्व कामे मार्गी लावा

महापौर नंदा जिचकार यांनी घेतला आढावा
 
नागपूर,ता.६. दोन दिवसांवर पावसाळा येत आहे. नाले सफाई संदर्भातील सर्व कामे पुढील आठ दिवसात मार्गी लावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. मंगळवारी (ता.६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात नाले सफाई आणि नदी स्वच्छता अभियानासंदर्भात आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.
 
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभुळकर, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, झोन सहायक आयुक्त सर्वश्री राजेश कराडे, प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरिश राऊत, राजू भिवगडे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी शहरातील नाले सफाईचा आढावा आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार यांच्या मार्फत मागवला. शहरात एकूण २३६ मोठे नाले आहेत. त्यापैकी १७२ नाले मनुष्यबळाच्या साहायाने तर ६४ नाले मशीन्सच्या साह्याने स्वच्छ करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील आठ दिवसात संपूर्ण नाले संपूर्ण स्वच्छ होतील, अशी माहिती डॉ.दासरवार यांनी दिली. यानंतर महापौरांनी झोननिहाय नाले सफाई व नदी स्वच्छतेचा आढावा झोनल अधिकारी यांच्या मार्फत घेतला.
 
यासोबतच आयआरडीपीचे नाले, चेंबर तसेच चेंबर स्वच्छ करण्याची माहिती झोनल अधिका-यामार्फत जाणून घेतली. ८० टक्के चेंबर स्वच्छ करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती डॉ.दासरवार यांनी दिली. यासोबतच नदी स्वच्छता अभियानाचा झोन निहाय आढावा घेण्यात आला.
 
याबाबत बोलताना दोन दिवसावर पाऊस येऊन ठेपला असल्याने काम अद्याप पूर्ण न झाल्याने  महापौर नंदा जिचकार यांनी संताप व्यक्त केला. पुढील आठ दिवसात कामे पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश दिले. ज्या ठिकाणी मनुष्यबळाने शक्य होत नसेल त्याठिकाणी मशीन्सचा वापर करावा, अशा सूचना केल्या. ज्या ठिकाणी रेल्वेच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला आयुक्तांमार्फत पत्र पाठवून ते काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौर नंदा जिचकार यांनी केल्या. पावसाळ्यात पाणी साचू नये याकरिता प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाचा आढावा महापौरांनी यावेळी घेतला.

 

 

मनपाद्वारे शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त अभिवादन

नागपूर,ता.६. महाराष्ट्राचे आराध्यदैत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे अभिवादन करण्यात आले. शिवाजीनगर येथील उद्यानातील शिवाजी महाराजांच्या सिंहसनारूढ पुतळ्याला महापौर नंदा जिचकार आणि राजे मुधोजी भोसले यांनी पुष्पहार चढवून त्यांना अभिवादन केले.
 
यावेळी स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, नगरसेविका रूपा राय, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, रमेश मंत्री, श्रीकांत देशपांडे, अनिल हस्तक, मधुकर भालेराव,  पांडुरंग क्षीरसागर, वनिता हस्तक, उत्तरा देशपांडे, गणेश गुल्लाड प्रामुख्याने उपस्थित होते.   

 

 

नागपुरी पर्यटनासाठी महापौरांची आंतरराष्ट्रीय स्तरावर साद

चीनमधील महापौर परिषदेत सहभाग : ‘शाश्वत शहरी विकासात पर्यटनाची भूमिका’ विषयावर मंथन
 
नागपूर, ता. ६ :  देश आणि महाराष्ट्राच्या पर्यटनाची महती सांगतानाच नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी नागपुरी पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना साद घातली. ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेल्या नागपूरच्या संस्कृती, परंपरा आणि पर्यटनाची ओळख त्यांनी जगाला करून दिली.
 
चीनमधील झेंग शू शहरात पर्यटन या विषयावर आधारीत आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर नंदा जिचकार भारताच्या प्रतिनिधी म्हणून परिषदेत सहभागी झाल्या होत्या.  २९ ते ३१ मे दरम्यान आयोजित ही परिषद ‘सिटी टुरिझम इनोव्हेशन इन द शेअरिंग इकॉनॉमी’ या संकल्पनेवर आधारीत होती. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या जगभरातील शहरांतील महापौर आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सुमारे ५०० तज्ज्ञ यात सहभागी झाले होते.  नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांच्यासह चाटोरक्सचे (फ्रान्स) उपमहापौर हुगन जीन, आऊटबॅक पायोनिअरचे संस्थापक रिचर्ड जॉन किनन, चायना टॉप व्ह्यू टुरिझम इन्व्हेस्टमेंट डेव्हलपमेंट ग्रुप लि.चे उपमहाव्यवस्थापक झांग शुमीन, चायनिज अकादमी ऑफ सोशल सायन्सेसच्या सहयोगी शास्त्रज्ञ मा कॉगलिंग यांचा प्रामुख्याने सहभाग होता. परिषदेत  महापौर नंदा जिचकार यांनी ‘नागपूरच्या शाश्वत विकासात पर्यटन कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकेल’, याबाबत सादरीकरण केले. . या परिषदेत ‘बेल्ट ॲण्ड रोड’ टुरिजम सिटीज समीट, परिसंवाद, आंतरराष्ट्रीय पर्यटन शहर प्रदर्शन राहील. शाश्वत शहरी विकासात पर्यटन महत्त्वाची भूमिका बजावू शकेल काय, याबाबत विचारमंथन करण्यात आले.
 
शहरी विविधता आणि पर्यटन स्थिरतेवर चर्चा
 
सदर परिषदेत जगभरातील तज्ज्ञांनी शहरी विविधता आणि पर्यटनाच्या बदलत्या मापदंडावर गटचर्चा करण्यात आली. जगभरातील सार्वजनिक धोरण निर्मात्यांसाठी शहरी विविधता आणि पर्यटन स्थिरता मुख्य प्राथमिकता बनल्या आहेत. आज, नेहमीपेक्षा अधिक शाश्वत पर्यटन विकासाचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे.  पर्यावरणविषयक समस्यांमुळे आणि त्यांचे जागतिक परिमाण लक्षात न घेता ते प्राप्त करणे शक्य नाही. विविध समस्या आणि समाजाच्या आवश्यकता आणि शहरी क्षेत्रांच्या विकासासाठी शहरांना आकर्षक पर्यटन स्थळांमध्ये रुपांतरीत करणे शक्य आहे.
 
पर्यटन हा व्यवसाय परंपरागत वस्तुमान पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, स्पा पर्यटन, व्यापार पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, ग्रामीण पर्यटन, शहरी पर्यटन आदींचा समावेश असलेला व्यवसाय आहे. यासाठी परिसरातील पर्यटन विकासावर नियंत्रण, पर्यटनातून रोजगार, जीवनाच्या गुणवत्तेत सुधार, टूर ऑपरेटरसाठी मार्गदर्शक तत्त्वे, विविध क्षेत्रांसाठी स्वीकार्यता मर्यादा सेट करण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील मान्य आंतरराष्ट्रीय मानकांचा वापर, नैसर्गिक व सांस्कृतिक संसाधनाचे संरक्षण करण्याच्या क्षेत्रात व्यवस्थापन सुधारण्यासाठी शैक्षणिक आणि प्रशिक्षण कार्यक्रम अंमलात आणणे ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत, असा सूर गटचर्चेतून निघाला.

 

 

वृक्ष संवर्धनांसाठी नागरिकांचा पुढाकार आवश्यक

पर्यवारणदिनी महापौर नंदा जिचकार यांनी केले आवाहन
 
नागपूर,ता.५ : झाडांचे संवर्धन ही काळाजी गरज आहे. वृक्षारोपण करून आपले काम संपत नाही, तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्ष संवर्धन करण्याकरिता नागरिकांचा पुढाकार आवश्यक आहे. तरच हे कार्य यशस्वीपणे राबविण्यात यश येईल, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनपा मुख्यालयात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त शान्तनु गोयल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, निगम अधीक्षक राजन काळे, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता आर.एस.भूतकर, विद्युत विभागाचे श्री.अनिल मानकर, उपअभियंता राजेश दुफारे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
मनपा मुख्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महापौर यांनी प्रत्येकाने एक झाड दत्तक घ्यावे आणि त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन केले. प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रात आणि परिसरात झाडे लावावी, विद्यार्थीवर्गाने आपला विद्यापीठ परिसर, शाळा, महाविद्यालयाची मैदाने यावर झाडे लावावी व ती जगवावी, अशा सूचना महापौरांनी यावेळी केल्या. यानंतर मान्यवरांनी सहकार नगर घाटाजवळ पोहरा नदीच्या काठावर वृक्षारोपण केले. यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, अग्निशमन समिती सभापती लहुकुमार बेहेते, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, सोनाली कडू, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बुरघाटे, डॉ,सुषमा पनकुले प्रामुख्याने उपस्थित होते. याठिकाणी भारतीय वायूसेना आणि OISCA या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
 
यानंतर मान्यवरांनी फुटाळा तलाव येथे वृक्षारोपण केले. त्याठिकाणी सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपेंट या संस्थेच्या वतीने ‘प्लास्टिकमुक्त शहर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी संस्थेच्या प्रमुख लिना बुधे यांनी महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांना कापडी आणि कागदी पिशव्या भेट स्वरूपात दिल्या. सदर कार्यक्रमप्रसंगी मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेविका रुतिका मसराम, नगरसेवक अमर बागडे, याप्रसंगी महापालिकेद्वारे नव्याने तयार करण्यात आलेल्या बोटीची मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा करून त्याचे जलावतरण करण्यात आले.. याप्रसंगी सहायक आयुक्त विजय हुमणे, जयंत पाठक, शुभांगी पडोळे यांच्यासह तलाव बचाव समिती, कन्झुमर जस्टिस कौन्सिल, एअर मेंटेनंन्स कमांड, नीरी, ४ महाराष्ट्रीयन बटालियन एनसीसी (नेव्ही), डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस ऑथॅरिटी, स्वच्छ असोशिएशन, पर्यावरण प्रेरणा विदर्भ, इको फ्रेण्डली लिव्हिंग फाऊंडेशन, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, इक्वि सिटी, नागपूर गार्डन क्लब, आदी संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
या प्रमुख कार्यक्रमांव्यतिरिक्त नागपूर महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी महानगरपालिकेच्या विविध विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेच्या शाळा, दवाखाने, उद्याने, खुली जागा, नदीच्या काठावर आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. भांडेवाडी डॉग शेल्टर येथे आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह चमूच्या हस्ते, नेहरूनगर झोनअंतर्गत नरसाळा घाट येथे झोन सभापती रिता मुळे आणि सहायक आयुक्त राजेश कराडे यांच्या हस्ते सूर्या फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. कल्पना नगर मैदान आणि झुलेलाल गार्डन, दयानंद पार्क येथे स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेविका सुषमा चौधरी, गार्गी चोपरा, महेंद्र धनविजय, सहायक आयुक्त हरिश राऊत उपस्थित होते. आसीनगर झोनअंतर्गत झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सभापती वंदना चांदेकर, नगरसेवक मनोज सांगोळे, जितेंद्र घोडेस्वार, दिनेश यादव, नगरसेविका नसिम बोनो ईब्राहिम खान, सहायक आयुक्त गणेश राठोड उपस्थित होते. आरोग्य विभागाद्वारे सदर आणि महाल येथील रोग निदान केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. सदर येथील रोग निदान केंद्रात नगरसेवक किशोर जिचकार यांच्या हस्ते तर महाल येथील स्व.प्रभाकरराव दटके रोग निदान केंद्राच्या कार्यक्रमाला नगरसेविका सुमेधा देशपांडे आणि डॉ.नरेंद्र बहिरवार उपस्थित होते. इंदिरा गांधी रोग निदान केंद्र गांधीनगर याठिकाणी धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.अनिल चिव्हाणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर आयसोलेशन हॉस्पीटल आणि पाचपावली सुतिकागृह याठिकाणीदेखील वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिवहन विभागाद्वारे खापरी आणि हिंगणा येथील बस डेपो आणि मोरभवन बस स्थानकावर वृक्षारोपण परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप उपस्थित होते. जलप्रदाय विभागाद्वारे नवेगाव खैरी, पेंच प्रकल्प याठिकाणी जलप्रदाय विभागाद्वारे वृक्षारोपण करण्यात आले.

 

 

आम्ही घरापासून सुरू करू प्लास्टिकबंदी

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा संकल्प : मनपा-ग्रीन व्हिजीलद्वारे कार्यशाळा
 
नागपूर, ता. ५ :  पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या व्यतिरिक्त दैनंदिन उपयोगातल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा उपयोग करणे आजपासून आम्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्य बंद करू. यासाठी जनजागृतीचा वसा आजपासून स्वीकारू, असा संकल्प मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एकमुखाने केला.
 
निमित्त होते नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित कार्यशाळेचे. ‘प्लास्टिक प्रदूषणावर मात’ हा कार्यशाळेचा विषय होता. मनपा शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि शिक्षक सहभागी असलेल्या या कार्यशाळेत ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून आणि मूक अभियनातून प्लास्टिकच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांना बोलते केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी मूकनाट्यातून पर्यावरणाला धोका निर्माण होणाऱ्या कृती करून दाखविल्या. त्या कृती काय हे ओळखून विद्यार्थ्यांनी योग्य काय, ते अभिनयाच्या माध्यमातून करून दाखविले.
 
सदर कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, मनपातील भाजपच्या प्रतोद नगरसेविका दिव्या धुरडे, नगरसेविका श्रद्धा पाठक, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटजी उपस्थित होते.
 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रा. अनिल सोले म्हणाले, काही गोष्टींवर कायदेशीर बंदी आणणे आणि स्वयंसंकल्पाने काही गोष्टी आपल्या आयुष्यातून दूर करणे, यात बरेच अंतर आहे. ज्या गोष्टी पर्यावरण रक्षणात सहयोगी आहे अशा गोष्टींची सुरुवात मनपाने कायद्याची वाट न पाहता सुरू केली. नदी स्वच्छता अभियान, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, इथेनॉलवर बसचे संचलन आदी विधायक गोष्टींची सुरुवात केली आणि नागरिकांनीही त्याला तितकाच प्रतिसाद दिला. कुठलेही चांगले विचार रुजविण्यात विद्यार्थ्यांची भूमिका मोठी असते. आपण स्वत:पासून प्लास्टिकबंदी सुरू केली तर आपण या चळवळीतील क्रांतिकारी बनाल, असेही ते म्हणाले.
 
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवाचे शिक्षण महत्त्वाचे असते. मनपाच्या शाळा केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर मूल्यशिक्षणही देते, हे अशा उपक्रमांतून सिद्ध होते. प्लास्टिकबंदी, वृक्षारोपण, नैसर्गिक स्त्रोत आदींचे जतन करणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने ओळखायला हवी.
 
यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिकबंदी करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करू, अशी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मधु पराड यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनपा शिक्षण विभागाचे कर्मचारी वृंद आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णुदेव यादव, शीतल चौधरी, विकास यादव, अभय पौनीकर, कार्तिकी कावळे, अमोल भलम, शांतनू शेळके, आयुष शेळके, दादाराव मोहोड आदींनी सहकार्य केले.
 
चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये साधला नागरिकांशी संवाद
 
पर्यावरण दिवसाच्या निमित्तान नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी सायंकाळी धरमपेठ परिसरातील चिल्ड्रेन ट्राफिक पार्क येथे नागरिकांशी संवाद साधला. ‘प्लास्टिकचे दुष्परिणाम’ या विषयांवर स्वयंसेवकांनी नागरिकांची मते जाणून घेतली. प्लास्टिकबंदीसाठी काय करायला हवे यासंदर्भात नागरिकांच्या सूचना नोंदवून घेतल्या. सुमारे तीन तास चाललेल्या या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ३५० नागरिकांशी संवाद साधण्यात आला. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत स्वत:पासून प्लास्टिकबंदी करण्याचा संकल्प केला.

 

 

न्यू मनीषनगर-गांधीबाग ‘आपली बस’चा शुभारंभ

नागपूर, ता. ५ : न्यू सोमलवाडा, न्यू मनीषनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने मंगळवार ५ जूनपासून न्यू मनीषनगर-गांधीबाग ‘आपली बस’चा शुभारंभ केला.
 
यानिमित्त श्यामनगर येथे स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, नगरसेवक अविनाश ठाकरे, संदीप गवई, नगरसेविका विशाखा बांते, जयश्री वाडीभस्मे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गुणवंत कामडी, श्री. पाठक उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती बंटी कुकडे म्हणाले, नागपूर शहरातील ‘आपली बस’ अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. नागरिक मागेल त्या मार्गावर बस देण्याचा आमचा मानस आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याची मानसिकता आता बनत आहे. यापूर्वी न्यू मनीषनगर-बर्डी बस सुरू केली. आता गांधीबाग मार्गावर बस सुरू झाल्याने मनीषनगर दोन मुख्य भागांशी जोडले गेले. या दोन्ही मार्गावरील बसचा फायदा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नगरसेवक अविनाश ठाकरे यांनीही नागरिकांना मनपाच्या ‘आपली बस’चा वापर अधिकाधिक करण्याचे आवाहन केले. परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गुणवंत कामडी यांनी केले. यानंतर सर्व मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून बसचा शुभारंभ केला. यावेळी परिवहन नियंत्रक योगेश लुंगे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव प्रा. अरुण फाळके, सहसचिव रामचंद्र चुटे, कार्याध्यक्ष रामकुपाल तिवारी, उपाध्यक्ष डॉ. अशोक गुंडावार यांच्यासह अन्य सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अशोक कातुरे यांनी केले. सदर बसचा मार्ग न्यू मनीषनगर बस स्टॉप, श्यामनगर, काचोरे लॉन, बेसा टी-पॉईंट, रामेश्वरी चौक, विश्वकर्मा नगर, तुकडोजी पुतळा, मेडिकल चौक, बस स्टॅण्ड, टिळक पुतळा, बडकस चौक, गांधी पुतळा असा राहील. न्यू मनीषनगर येथून सकाळी ८ वाजता पहिली फेरी आणि सायंकाळी ५.३० वाजता अखेरीची बस राहील. गांधीबाग येथून सकाळी ९ वाजता पहिली बस तर सायंकाळी ६.३० वाजता अखेरची बस राहील. एका तासाच्या अंतराने बसफेऱ्या राहतील.
 
बस शुभारंभ कार्यक्रमानंतर नागपूर महानगरपालिका आणि स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने श्यामनगर परिसरात पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी वृक्ष लावून ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ असा संदेश दिला.

 

 

पर्यावरण दिनी महापालिका करणार वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा : स्थानिक स्वयंसेवी संघटनेचा घेणार सहभाग
 
नागपूर,ता. ४ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करणार आहे. शहरातील नाग, पिवळी, पोहरा नदीच्या काठावर आणि शहरात अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या पूर्वतयारीचा आढावा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सोमवारी (ता.४) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात घेतला.
 
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, वायुसेनेचे विंग कमांडर मनोज कुमार सिन्हा, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, (प्रभारी)मुख्य अभिंयता मनोज तालेवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त सर्वश्री राजेश कराडे,राजू भिवगडे, प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, हरिश राऊत, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता सी.जी.धकाते, मोती कुकरेजा, आर.एस भूतकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, उपअभियंता प्रदीप राजगिरे, मोहम्मद इजारईल, राजेश दुफारे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पर्यावरण दिनी महानगरपालिकेअंतर्गत कुठे-कुठे वृक्षारोपण करण्यात येणार आहे, याची माहिती संबंधित विभागप्रमुखामार्फत आयुक्तांनी घेतली. आरोग्य विभागाद्वारे भांडेवाडी येथे झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली. शिक्षण विभागाद्वारे मनपाच्या सर्व शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या क्रीडा संकुलांमध्ये तसेच खेळाचे मैदानांमध्ये क्रीडा विभागाद्वारे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहरातील तिन्ही नद्या नागनदी, पिवळी नदी, पोहरा नदी यांच्या काठावर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी दिली. जलप्रदाय विभागाद्वारे पेंच, गोरेवाडा येथील धरणाजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. परिवहन विभागाद्वारे खापरी बस डेपो, हिंगणा डेपो, मोरभवन बस स्टॉप येथे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली. आरोग्य विभागाद्वारे इंदिरा गांधी हॉस्पीटल, आयसोलेशेन हॉस्पीटल, पाचपावली सुतिकागृह, सदर आणि महाल येथील दवाखाने येथे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी यांनी दिली.
 
यानंतर महापालिकेच्या दहा झोनमध्ये होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमाबाबतची माहिती झोन सहायक आयुक्तांमार्फत आयुक्तांनी घेतली. लक्ष्मीनगर झोनअतंर्गत सकाळी ८.३० वाजता पोहरा नदीच्या काठावर सहकार नगर घाट येथे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याठिकाणी महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह हे उपस्थित राहतील. धरमपेठ झोनमध्ये हिलटॉप, रामनगर मैदान, फुटाळा शाळा, हजारीपहाड आणि रामनगर शाळा, हनुमान मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हनुमाननगर झोनअंतर्गत मानेवाडा घाट, भोला गणेश चौक, झोन कार्यालय, दुर्गानगर शाळा येथे, धंतोली झोनअंतर्गत नरेंद्र नगर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नेहरूनगर झोनमध्ये दिघोरी घाट, नरसाळा घाट आणि पोरा नदीच्या काठावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. गांधीबाग झोनमध्ये स्वीपर कॉलनी, मोमिनपुरा येथील मुस्लीम फुटबॉल मैदान, भानखेडा मैदान येथे, सतरंजीपुरा झोनअंतर्गत झोन कार्यालयात, बस्तरवारी शाळा आणि परिसरातील उद्यानात, लकडगंज झोनअंतर्गत कच्छीविसा मैदान, सतनामी मैदान, स्व. अण्णाभाऊ साठे सभागृह येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आसीनगर झोनअंर्गत झोन कार्यालयाच्या बाजुला असेलल्या मैदानात, वैशालीनगर घाट, यशोधरा उच्च प्राथमिक शाळा, सहयोगनगर मैदान येथे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मंगळवारी झोन अंतर्गत गोरेवाडा घाट, आकारनगर, मनपा दवाखाना, कुशीनगर मैदान येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
 
सर्व कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजता सर्व लावलेल्या झाडांची माहिती उद्यान विभागाला कळविण्यात यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. झाडे लावल्यानंतर त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे. सर्व स्थळावर खत आणि झाडे पुरविण्याची व्यवस्था उद्यान विभागाने करावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. ज्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी किती झाडे लावली आणि कोणती झाडे लावली याबाबतचे सूचना फलकही लावण्यात यावे, असे निर्देश आय़ुक्तांनी दिले.
 
मनपा मुख्यालयात सकाळी ८ वाजता महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र कंभारे यांनी दिली.

 

 

नगरसेवक रमेश पुणेकर यांचे उपोषण मागे

जलप्रदाय समिती सभापतींनी पाजले निंबू पाणी
 
नागपूर,ता.४ : प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी ओसीडब्ल्यू विरोधात ३१ मे पासून सुरू केलेले उपोषण जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले सभापती पिंटू झलके यांनी रमेश पुणेकर यांना निंबू पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडविले.
 
यावेळी नगरसेविका आभा पांडे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, ओसीडब्ल्यूचे राजेश कारला, श्री.नायक प्रामुख्याने उपस्थित होते. काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक २० च्या पाण्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. यासाठी नगरसेवक रमेश पुणेकर यांनी ओसीडब्ल्यू आणि जलप्रदाय विभागाला पत्र पाठविले. यानंतरही पाण्याच्या तक्रारी ओसीडब्ल्यूने सोडविल्या नाही. याविरोधात दिनांक ३१ मे पासून रमेश पुणेकर यांनी मस्कासाथ येथे बेमुदत उपोषण सुरू केले. जलप्रदाय समिती पिंटू झलके यांनी पुढाकार घेऊन प्रभागातील सर्व तक्रारी सोडविण्याचे आश्वासन दिले. पाण्यासंबंधित काही तक्रारी सोडविण्यात आलेल्या आहे. पुढच्या दोन दिवसात प्रभागातील सर्व तक्रारी सोडविण्यात येईल, असे आश्वासन पिंटू झलके यांनी दिले. यावेळी ओसीडब्लूचे अधिकारी व डेलीगेट्स यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

मनपाच्या अर्थसंकल्पात व्यापाऱ्यांच्या सूचनांना अंतर्भूत करणार : वीरेंद्र कुकरेजा

बाजार परिसरात स्वच्छतागृहांसाठी करणार विशेष तरतूद : विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
 
नागपूर,ता.४ : ‘ग्रीन सिटी क्लीन सिटी’ या संकल्पनेवर आधारीत यावर्षीचा नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी समाजातील विविध घटकांच्या सूचना आपण जाणून घेत आहोत. व्यापारी हा त्यापैकी एक महत्त्वाचा घटक असून त्यांच्या सर्व सूचनांचे स्वागत आहे. या सूचनांना अर्थसंकल्पात अंतर्भूत करु. विशेष म्हणजे याच सूचनांच्या आधारे शहरातील सर्व बाजार परिसरात स्वच्छतागृहांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करणार असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले.
 
व्यापाऱ्यांच्या दृष्टीकोनातून अर्थसंकल्पात काय असावे हे जाणून घेण्यासाठी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी (ता. ४) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक निशांत गांधी, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम उपस्थित होते.
 
सदर बैठकीत व्यापाऱ्यांनी एलबीटी वसुली, मालमत्ता कर, नागरी सुविधा याबाबत सूचना मांडल्या. एलबीटी संदर्भात बोलताना व्यापारी म्हणाले, एलबीटीसंदर्भात व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ज्या व्यापाऱ्यांकडून एलबीटीचा भरणा व्हायचा आहे, तो वसूल करण्यासाठी विविध व्यापारी असोशिएशन मनपाला मदत करेल. यासाठी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स येथे विशेष शिबिर लावण्याची सूचना श्री. हेमंत गांधी यांनी केली. हे शिबिर एका दिवसाकरिता नव्हे तर किमान १० दिवस असावे, अशीही सूचना आली. यासाठी व्यापारी आघाडी प्रचार करेल. अधिकाधिक एलबीटीची रक्कम या शिबिराच्या माध्यमातून वसूल होण्याचा प्रयत्न राहील, असेही श्री. गांधी म्हणाले. मालमत्ता करासंदर्भातही अनेक तक्रारी येत आहेत. यासाठी जो फॉर्म्यूला लावण्यात आला आहे, त्याची प्रसिद्धी करून जनजागृती करावी, असेही व्यापाऱ्यांनी सुचविले. खुल्या भूखंडाच्या डिमांड नोट मूळ मालकाच्या घरी जात नाही, तशी व्यवस्था करावी, बाजार परिसरात स्वच्छता गृहे नाहीत, जी आहेत त्याची साफसफाई होत नाही, त्यामुळे बाजार परिसरात नव्याने स्वच्छतागृहे बांधण्यात यावी, शाळांच्या परिसरात स्वच्छतागृहे तयार करण्यात यावी, मनपाच्या शाळा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना चालविण्यासाठी देण्यात याव्या, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या व्यावसायिक वाहनांचा बंदोबस्त करण्यात यावा अथवा त्यांच्याकडून दंड आकारण्यात यावा, अनेक बाजारात दुकानांसमोर होत असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशीही सूचना करण्यात आली.
 
यावर बोलताना सभापती वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, स्वच्छतागृहांबाबतची सूचना आपण गांभीर्याने घेतली असून त्यासाठी अर्थसंकल्पातच विशेष तरतूद करण्यात येईल. व्यापारी असोशिएशनने यासाठी यादी पुरवावी, अशी विनंती त्यांनी केली. स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचीही विशेष काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. एलबीटी वसुलीसाठी व्यापारी आघाडीच्या सहकार्याने २० ते २७ जून दरम्यान नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात मनपातर्फे विशेष शिबिर लावण्यात येईल. याबाबतीत मनपातर्फे व्यापकर प्रसिद्धी करण्यात येईल. व्यापारी आघाडीनेही संघटनेमार्फत व्यापाऱ्यांना पत्र पाठवावे, अशी सूचना त्यांनी केली. नागपूर शहरातील मालमत्तेच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातुलनेत उत्पन्न कमी आहे. मागील वर्षी २०२ कोटी कर वसुली झाली. यावर्षी ५५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली. त्याचप्रमाणे पाणी करासंदर्भातही आपण नियमित पाठपुरावा करीत आहे. अवैध नळ कनेक्शनसंदर्भात विशेष मोहीम सुरू आहे. अमृत योजनेमधून पाण्याची गळती कमी होईल आणि पाणी कराच्या वसुलीतही वाढ होईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून नागपुरात कोट्यवधींची कामे सुरू आहेत. या विकासकामांमुळे त्रास होऊ नये, यासाठी मनपा आवश्यक त्या सेवा पुरविण्याचे कार्य करीत आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात उद्यान आणि क्रीडा मैदानांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. व्यापाऱ्यांनी कर वसुलीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सभापती श्री. कुकरेजा यांनी व्यापाऱ्यांचे आभार मानले.
 
बैठकीला विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये सर्वश्री जे.पी. शर्मा, क्रिष्णा दायमा, राजेश कानुगो, विनोद जेठानी, सचिन पुनियानी, महेश बाथेजा, पंकज बक्शी, पंकज भोकारे, अर्जूनदास आहुजा, राजू व्यास, हेमंत गांधी, अशोक शनिवारे, राहुल जैन, उद्धव तोलानी, संजय वडलवार, राजेश मनियार, मनोज पोरसवानी, संजय अग्रवाल, राजेश गोयल यांचा समावेश होता.

 

 

सदर रोगनिदान केंद्र, इंदिरा गांधी रुग्णालयाला आरोग्य सभापतींची आकस्मिक भेट

कर्मचाऱ्यांना वेळेत येण्याचे निर्देश : पावसळ्यापूर्वी इमारतीची डागडुजी करा
 
नागपूर, ता. २ : नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित सदर रोग निदान केंद्र आणि इंदिरा गांधी रुग्णालयाला आरोग्य सभापती मनोज चापले यांनी शनिवारी (ता. २) सकाळी आकस्मिक भेट देऊ पाहणी केली व अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेत येण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
 
आरोग्य सभापती मनोज चापले यांच्यासोबत यावेळी अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, वैद्यकिय अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते. प्रारंभी सभापती चापले यांनी सदर रोगनिदा केंद्राला भेट दिली. रुग्णालयात उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. रुग्णांशीही त्यांनी संवाद साधला. पंचकर्म आयुर्वेदिक दवाखाना, एक्स-रे विभाग, दंतचिकित्सा यूनिटची त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते यांना त्यांनी दिले.
 
सदर रुग्णालयातील इमारतीच्या ओपीडी व अन्य काही ठिकाणी पाणी झिरपते. त्यामुळे पावसळ्यापूर्वी इमारतीची डागडुजी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
 
अनुपस्थित कर्मचाऱ्यांना द्या ‘कारणे दाखवा’ नोटीस
 
सदर रोगनिदान केंद्राच्या पाहणीनंतर त्यांनी गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांना काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. कुठलीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मनपाच्या प्रत्येक दवाखान्यात बायो-मेडिकल वेस्टसाठी डस्टबीन यथाशीघ्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळेत कर्तव्यावर हजर राहण्याचे निर्देश दिले. यानंतर कधीही रुग्णालयाचे आकस्मिक निरीक्षण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

 

 

मटन-मच्छी मार्केटचे काम मार्गी लावा

कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांचे निर्देश : माजी महापौर प्रवीण दटकेंसह केले बांधकामस्थळाचे निरीक्षण
 
नागपूर,ता.२ : मच्छीसाथ येथील मटन-मच्छी मार्केट बांधकामच्या पूर्ततेसाठी दिलेली वाढीव मुदत संपून १४ महिन्याचा काळ उलटला. प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी होणारा वेळ खपवून घेतला जाणार नाही. तातडीने सोमवार ४ जूनपर्यंत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून लवकरात लवकर मटन मार्केटचे काम मार्गी लावा, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी दिले.
 
शुक्रवारी (ता. १) यासंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर आज (ता.२) कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि माजी महापौर प्रवीण दटके यांनी मच्छीसाठी येथील निर्माणाधीन मटन-मच्छी मार्केटला भेट दिली. यावेळी भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, उपअभियंता कोहाड, कंत्राटदार अमित कावळे उपस्थित होते.
 
मागील अर्थसंकल्पात सदर इमारतीसाठी ६० लाखांची तरतूद असतानाही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे वाढीव मुदतीनंतरही १४ महिने उलटून काम पूर्ण झाले नाही. यामुळे ६० लाख रुपये परत गेले. याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मटन मार्केट बांधकामाची निविदा प्रक्रिया सन २०१३ मध्ये झाली. सन २०१६ मध्ये कार्यादेश निघाला. आठ महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करायचे होते. मात्र ते न झाल्याने ३१ मार्च २०१७ पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली. वाढीव मुदतीतही काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर कुठलेही कारण नसताना तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून तब्बल १४ महिने काम बंद राहिले. रखडलेल्या कामामुळे मटन मार्केट मालकांना सोबतच परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. जर आता सोमवार ४ जूनपर्यंत तातडीने प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.
 
वाढीव निधीसाठी मंजुरी घेताना इमारतीच्या विद्युत कामाकरिता निविदा काढण्याची प्रक्रियाही सुरू करा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी माजी नगरसेवक कल्पक भानारकर, तुषार लारोकर, मटन मार्केट असोशिएशनचे राजू लारोकर, जगदीश पारधी, नितीन लारोकर, मुकेश लारोकर, गिरीधारी कटारे, वामन लारोकर, राजेश पारधी, कुणाल लारोकर, विष्णू तुमाने, पियुष लारोकर उपस्थित होते.
 
दौऱ्यानंतर कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी सदर प्रकरणासंदर्भात आयुक्त वीरेंद्र सिंह यांना कामातील दिरंगाईबद्दल माहिती दिली. या कामाकडे अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले असून दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी सूचना केली. यावर आयुक्तांनी सदर प्रकरणासंदर्भात माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
 
आखाड्याच्या जुन्या इमारतीत ग्रंथालय
 
मटन मार्केटच्या इमारतीसमोरच जुनी आखाड्याची इमारत आहे. ह्या इमारतीचा सध्या काही उपयोग नाही. त्याचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करण्याचा सल्ला माजी महापौर प्रवीण दटक यांनी तेथील नागरिकांना दिला. या इमारतीमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका किंवा ई-लायब्ररी व्हावी यासाठी एक प्रस्ताव तयार करण्याची सूचना श्री. दटके यांनी केली. इमारतीची डागडूजी करून आणि नूतनीकरण करून विधायक कार्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी सांगितले.

 

 

हनुमान नगर, नेहरुनगर व गांधीबाग झोनचे आयुक्तांनी केले आकस्मिक निरिक्षण

नागरी सुविधा केंद्र अत्याधुनिक करुन, झोन कार्यालयातील भंगार त्वरित उचला : आयुक्तांचे निर्देश
 
नागपूर, ता. १ : प्रत्येक झोन कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्र अत्याधुनिक करुन जनतेला चांगल्या सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विशेष देणे आवश्यक आहे. प्रशासनाची गतीमानता वाढावी यादृष्टीने आवश्यक ती पावले उचला. झोन कार्यालय परिसरातील भंगार त्वरित उचलून कार्यालय परिसर स्वच्छ व नीटनेटका करा. यात कुठेही   अनियमितता आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश म.न.पा. आयुक्त श्री. विरेंद्र सिंह यांनी दिले.
 
शुक्रवारी (ता. १) सकाळी निगम आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांचेसह प्रथम हनुमान नगर झोन क्र. ३ त्यानंतर नेहरुनगर झोन क्र. ५, गांधीबाग झोन क्र. ६ या तिन्ही झोनचे आयुक्तांनी आकस्मिक निरिक्षण केले. झोन कार्यालयातील विविध विभागाचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
 
प्रारंभी निगम आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी हनुमान नगर झोन कार्यालयाला भेट दिली. यावेळी आयुक्तांनी झोन अंतर्गत असलेल्या विविध विभागाला भेट देऊन कर्मचा-यांशी संवाद साधला. तेथील कार्यप्रणाली जाणून घेतली  . या झोन कार्यालय ‍परिसरात मोठया प्रमाणात जुने विदयुत खांब व भंगार आढळले. वापरण्याजोगे साहित्य ठेवून अन्य साहित्याची विल्हेवाट लावा, असे निर्देश त्यांनी दिले. झोन कर्यालयातील नागरी सुविधा केंद्र अत्याधुनिक करुन झोन मध्ये येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना असुविधा होणार नाही यादृष्टीने विशेष लक्ष द्या. नागरी सुविधा केंद्र सुजज्ज, संगणीकृत करून अत्याधुनिक सुविधा पुरविण्याबाबत त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना राजू भिवगडे यांना दिले.
 
यानंतर आयुक्त यांनी नेहरु नगर झोनचा दौरा केला करून नागरी सुविधा केंद्राचे निरिक्षण केले. नागरी सुविधा केंद्र अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीने नव्याने ‍डिजाईन तयार करा, नागरी सुविधा केंद्रांतर्गत नागरिकांना कोणत्या सुविधा पुरविणार यासंदर्भात नियोजन करून तसे नमूद असलेला प्रस्ताव सात दिवसात सादर करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
 
झोन कार्यालयासमोरील भंगाराची त्वरित विल्हेवाट लावून परिसरात वृक्षारोपण करा. परिसराचे सौदर्यीकरण करा, असे सहायक आयुक्त राजेश कराडे यांना निर्देश दिले.
 
आयुक्तांनी त्यानंतर गांधीबाग झोनचे निरीक्षण केले. केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित इमारतीतील कार्यालय जुन्या कर विभागाच्या इमारतीत स्थानांतरित करण्यात आले आहे. त्याचीही पाहणी आयुक्तांनी केली. आयुक्तांनी संपूर्ण झोन परिसरातील विविध विभागाचे निरिक्षण केले. गांधीबाग झोनमधीलही भंगार त्वरित हटविण्याचे आदेश सहायक आयुक्त अशोक पाटील यांना दिले.      गांधीबाग झोन समोरील जुन्या नगरभवन इमारतीमध्ये अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे नव्याने नागरी सुविधा केंद्र तयार करण्याबाबत डिजाईन तयार करुन त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
 
झोनमधील सर्व कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर होतात अथवा नाही, बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरी लावतात की नाही याकडे स्वत: सहायक आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश तीनही झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.
 
यावेळी अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्यासह सहायक आयुक्त राजू भिवगडे, सहायक आयुक्त राजेश कराडे, सहायक आयुक्त अशोक पाटील, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.

 

 

डीपीडीसीची कामे पूर्ण करा : कुकरेजा

आमदारांनी घेतला निधी खर्चाचा आढावा : कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश
 
नागपूर, ता. १ : जिल्हा नियोजन विकास निधीअंतर्गत नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात होत असलेल्या उर्वरीत कामांचा वेग वाढवा. कामे झाल्यानंतर कंत्राटदारांची देयके तातडीने अदा करा. जिल्हा नियोजन विकास निधीचे स्वतंत्र लेखा शीर्ष तयार करा, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
 
जिल्हा नियोजन विकास निधीअंतर्गत शहरात होत असलेल्या कामांचा आणि त्यावर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्याकरिता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात शुक्रवारी (ता. १) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त वीरेंद्र सिंह, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार उपस्थित होते.
 
यावेळी उपस्थित सर्व आमदारांनी जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. या कामांचा वेग वाढविण्याचे निर्देश आमदारांनी अधिकाऱ्यांना दिले.
 
स्थानिक विकास निधी आणि राज्य शासनाकडून जी ठोस तरतूद करण्यात आली आहे त्याअंतर्गत सद्यस्थितीत शहरात ४२ ते ४५ कोटींची कामे आहेत. हा निधी राज्य शासनाकडून येत असल्यामुळे कंत्राटदारांना बिलांची रक्कम अदा करण्यास हरकत नसायला हवी. मात्र, ह्या निधीतील कामांच्या बिलांची रक्कम थकविली जाते, याबाबत आ. सुधाकर देशमुख व अन्य आमदारांनी नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना आयुक्त वीरेंद्र सिंह म्हणाले, काही अडचणींमुळे यापूर्वी तसे झाले असेल. परंतु आता यापुढे ज्या लेखाशीर्षांतर्गत जी कामे आहे त्या कामांचे पेमेंट संबंधित लेखाशीर्षांतर्गतच होईल.
 
सहाही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. नागपूर महानगरपालिकेने सहाही मतदारसंघात प्रत्येकी एक कनिष्ठ अभियंता आणि एक सहायक द्यावे, अशी सूचना केली. यावर कुठल्याही कामात अडथळा येणार नाही. यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

 

 

मच्छीसाथ मटन मार्केटचे काम तातडीने पूर्ण करा!

कार्यकारी महापौर पार्डीकर यांचे निर्देश : शनिवारी करणार पाहणी दौरा
 
नागपूर,ता.१ : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मच्छीसाथ येथे बांधण्यात येत असलेल्या मटन मार्केटचे काम वर्षभरापासून रखडले आहे. प्रशासकीय स्तरावर अडलेल्या ह्या कामातील अडचणी तातडीने दूर करा, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.
 
मच्छीसाथ येथील मटन मार्केटच्या बांधकामात असलेल्या अडचणी आणि त्यावरील उपायांच्या चर्चेसाठी शुक्रवारी (ता. १) महापौर कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, उपायुक्त राजेश मोहिते, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, सहायक आयुक्त (बाजार) विजय हुमणे, कंत्राटदार अमित कावळे उपस्थित होते.
 
यावेळी कार्यकारी अभियंता राजेश भूतकर यांनी मटन मार्केटच्या बांधकामासंदर्भातील माहिती दिली. सदर कामाच्या निविदा सन २०१३ मध्ये निघाल्या होत्या. सन २०१६ मध्ये कार्यादेश मिळाल्यानंतर बांधकाम सुरू झाले. मटन मार्केटच्या बेसिक इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, मार्केट लगत असलेल्या कत्तलखान्याचाही विस्तार करायचा असल्याने सदर बांधकामाचे नव्याने अंदाजपत्रक तयार करण्यात आले. पूर्वी या प्रकल्पाची किंमत ९० लाख होती. नव्या अंदाजपत्रकानंतर वाढीव ४० लाख अपेक्षित आहे. ह्या प्रोव्हीजनसाठी काम थांबले असल्याचे भूतकर यांनी सांगितले. बेसिक इमारतीमध्ये  पाणी कनेक्शन, ड्रेनेजचे काम झाले की आत व्यावसायिकांना बसता येईल, असेही भूतकर यांनी सांगितले.
 
कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर ह्यांनी रखडलेल्या कामावर तीव्र नापसंती व्यक्त केली. बजेटमध्ये प्रोव्हीजन असताना काम लांबणे, हे योग्य नाही. याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता. मात्र, अधिकाऱ्यांनी कुठलीही हालचाल केली नाही. आता तातडीने पुढील आठ दिवसांत सर्व अडचणी दूर करून काम तातडीने सुरू करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
 
शनिवारी २ जून रोजी सकाळी १० वाजता मटन मार्केटच्या प्रत्यक्ष बांधकामाची स्थिती बघण्यासाठी आपण स्वत: दौरा करणार असल्याची माहिती कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिली.

 

 

मानेवाडा, दिघोरी घाटाच्या सौंदर्यीकरणाला वेग द्या !

आमदार सुधाकर कोहळे : विविध प्रकल्पांची केली पाहणी
 
नागपूर, ता. १ : नागपूर शहरातील मानेवाडा घाट आणि दिघोरी घाटावरील सोयीसुविधा वाढविण्यात याव्या. सौंदर्यीकरण अजून वेगाने करण्यात यावे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने योग्य त्या माहितीदर्शक पाट्या लावण्यात याव्या, असे निर्देश आमदार सुधाकर कोहळे यांनी दिले.
 
यावेळी त्यांच्यासमवेत मनपाच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, हनुमाननगर झोनच्या सभापती रूपाली ठाकूर, नेहरूनगर झोनच्या सभापती रिता मुळे, नगरसेविका मंगला खेकरे, माधुरी ठाकरे, स्नेहल बिहारे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, उपविभागीय अभियंता कृष्णकुमार हेडाऊ, रक्षमवार उपस्थित होते.
 
प्रारंभी आमदार सुधाकर कोहळे यांनी मानेवाडा घाटाची पाहणी केली. घाटावर गार्डनींगचे शिल्लक असलेले काम तातडीने पूर्ण करा, घाटावर असलेल्या झाडांभोवती ओटे तयार करा जेणेकरून आगंतुकांना तेथे बसता येईल, दफनभूमीवर कम्पाऊंड तयार करा, घाटावर उघड्यावर असलेले इलेक्ट्रीक केबल विद्युत विभागाच्या सहकार्याने व्यवस्थित करा, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी, एलपीजी दहन व्यवस्थेचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे, घाटावरील अस्थी ठेवण्याच्या जागेवर योग्य सुविधा पुरवण्यात याव्यात, घाटाच्या पार्किंगमध्ये असलेले पथदिवे मध्यभागी लावण्यात यावे, घाटाच्या गेटवरील अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, घाटावर लाकडांचा आणि गोवऱ्यांचा मुबलक पुरवठा असावा, एका मृतदेहासाठी किती लाकडे देण्यात येतात याबाबत तसेच शव वाहिन्या, शीत पेटी, झोनल अधिकारी आदींचे मोबाईल क्रमांक असलेल्या पाट्या लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
दिघोरी घाटावर असलेल्या अस्वच्छतेबद्दल आमदार सुधाकर कोहळे आणि सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी नाराजी व्यक्त केली. घाट स्वच्छ करण्यात यावा आणि तातडीने गार्डनिंगचे काम सुरू करण्याचे निर्देश आ. कोहळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
यानंतर त्यांनी बिडीपेठ येथील आशीर्वाद नगर बाजार आणि नासुप्रच्या इंदिरा गांधी सभागृहाचीही पाहणी केली. त्याननतर बुधवार बाजार येथील प्रस्तावित भाजी मार्केटच्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पांसंदर्भात आवश्यक ते निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

 

अग्निशमन आणि विद्युत विभागातील कामांना वेग द्या !

सभापती लहुकुमार बेहेते : दोन्ही विभागातील कामांचा घेतला आढावा
 
नागपूर, ता. ३१   :  अग्निशमन आणि विद्युत विभागातील अनेक कामे संथगतीने सुरू आहेत. या कामांचा तातडीने पाठपुरावा करून त्याला वेग द्या. भरतीप्रक्रिया कुठलीही असो, त्याची माहिती समिती सदस्यांना यापुढे देण्यात यावी, असे निर्देश अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती लहुकुमार बेहते यांनी अधिकाऱ्यांना दिले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गुरुवारी (ता. ३१) आयोजित अग्निशमन व विद्युत समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला समितीच्या उपसभापती वर्षा ठाकरे, सदस्य ॲड. निशांत गांधी, अनिल गेंडरे, आशा नेहरू उईके, ममता सहारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, सी.जी. धकाते, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपअभियंता दीपक चिटणीस, सहायक अभियंता ए.एस. मानकर उपस्थित होते.
 
सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. अग्निशमन विभागामार्फत सन २०१७-१८ या काळात दिलेल्या सूचनापत्र परिपूर्णता प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र व त्यापासून मनपाला मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत चर्चा करण्यात आली. मनपाच्या उत्पन्नात भर घालण्याकरिता अन्य काय स्त्रोत आहे, याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. सभापती लहुकुमार बेहते यांनी त्रिमूर्तीनगर अग्निशमन स्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी याबाबत आतापर्यंत असलेल्या अडचणी आणि सध्या होत असलेल्या पाठपुराव्याबाबत माहिती दिली. वाठोडा येथील अग्निशमन केंद्राच्ळा बांधकामासाठी सुधारीत नकाशा तयार करण्यात आला आहे. नगररचना विभागाकडे तो मंजुरीकडे पाठविण्यात आला आहे तर लकडगंज येथील प्रस्तावित केंद्राच्या जागा मालकीबाबत स्थावर विभागाला कळविण्यात आले आहे. मोजणी अद्याप व्हायची असून त्याचाही पाठपुरावा सातत्याने सुरु असल्याची माहिती श्री. नरेश बोरकर यांनी दिली.
 
मनपाच्या अग्निशमन विभागाच्या नवनिर्मित प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामास होत असलेल्या विलंबाबाबत सभापती लहुकुमार बेहते यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आल्याने विस्तारीत बांधकामाच्या मंजुरीसाठी प्रकरण प्रलंबित असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
 
विद्युत विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सोलर वॉटर हिटर योजनेबाबतची माहिती कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांनी दिली. ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा ५० टक्के अनुदान केंद्र शासनाकडून येत होते. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. आता केंद्र शासनाने अनुदान बंद केले असले तरी मनपातर्फे हे अनुदान देत असते. आतापर्यंत या योजनेचा लाभ २७५५ लाभार्थ्यांनी घेतला असून ४०२ अर्जावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 
नागपूर शहरात एलईडी पथदिवे लावण्याचे काम प्रगतीपथावर आहे. एक लाख ३८ हजारांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ३२ हजारांवर एलईडी पथदिवे लावण्यात आले असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.
 
अग्निशमन विभागात वाहनचालकांसाठी जी भरती मोहिम राबविण्यात आली, त्याबद्दल समितीच्या कुठल्याही सदस्यांना माहिती नसल्याबद्दल सभापतींनी नाराजी व्यक्त केली. यापुढे या संपूर्ण प्रक्रियेची प्रत्येक माहिती समिती सदस्यांना देण्याचे निर्देश श्री. बेहेते यांनी दिले. बैठकीला विद्युत विभागाचे अभियंता आणि अग्निशमन विभागाचे स्थानाधिकारी उपस्थित होते.

 

 

मनपातील २४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

नागपूर, ता. ३१ : नागपूर महानगरपालिकेतील विविध विभागातील २४ कर्मचारी आज ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा मनपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
कार्यक्रमाला निगम अधीक्षक राजन काळे, समिती अधीक्षक सुनील रोटके, सहायक अधीक्षक (भविष्य निर्वाह निधी) दत्तात्रय डहाके, सहायक अधीक्षक (सामान्य प्रशासन विभाग) मनोज कर्णिक, डोमाजी भडंग प्रामुख्याने उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मान्यवरांनी शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे आणि भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देऊन सत्कार केला. सत्कारमूर्तींमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. शिंदे, राजस्व निरीक्षक के.जी. सोमकुंवर, डब्ल्यू. एस. वानखेडे, कनिष्ठ निरीक्षक पी.डी. रंगारी, के.बी. सोनवानी, हवालदार ओ. एम. मांडवेकर, मोहरीर रमेश ढवले, स्वास्थ निरीक्षक एस. के. गोरे, मुख्याध्यापिका लता बागडे, सहायक शिक्षिका सरोज खाडे, सविता शाहू, चपराशी एच.सी. मोहनिया, क्षेत्र कर्मचारी एन.पी. जांभुळकर, रेजा श्रीमती सी.डी. सुखदेवे, मजदूर श्रीमती एल. आर. बागडे, रमेश लोखंडे, चपराशी मिलिंद लवत्रे, मजदूर कांता जीवनतारे, सफाई कामगार राजाबाई समुंद्रे, प्रकाश समुंद्रे, श्रीमती गेंदा बिहुनिया, सुनीता कोल्हटकर, नामदेव डांगे, विजय पिल्लेवान यांचा समावेश होता.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. संचालन प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. आभार डोमाजी भडंग यांनी मानले.

 

 

कार्यकारी महापौरांसह सभापतींनी केली गोरेवाडा पाणीपुरवठा केंद्राची पाहणी

संभाव्य जलसंकटावर मात करण्यासंदर्भात केली अधिकाऱ्यांशी चर्चा
 
नागपूर, ता. ३१  :  संभाव्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी गोरेवाडा येथील जलशुद्धीकरण आणि पाणीपुरवठा केंद्राची पाहणी केली.
 
यावेळी मंगळवारी झोनच्या सभापती संगीता गिऱ्हे, नगरसेवक व नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे,उपअभियंता दीपक चिटणीस उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी सर्वप्रथम गोरेवाडा तलावाची पाहणी केली. या तलावात पेंचमधून येणाऱ्या पाण्याबद्दल माहिती घेतली. याच परिसरात नवीन पाणी टाकीचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्याबद्दलही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि सभापती पिंटू झलके यांनी घेतली.
 
यानंतर पेंच टप्पा एक प्रकल्प कार्यालयाला भेट दिली. यावेळी पेंचमधून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण कशा प्रकारे होते, संपूर्ण शहराला पाणीपुरवठा कशाप्रकारे होते, त्याचे कंट्रोलिंग कसे आहे, याबाबत प्लान्ट मॅनेजर डॉ. दिलीप ठाकरे आणि ओसीडब्ल्यूचे प्रवीण सरण यांनी माहिती दिली. नागपूर शहराला पाणीपुरवठा करताना कन्हान मधून किती दाबाने पाणी येते, प्रत्येक टाकीमध्ये किती दाबाने पाणी जाते, कुठे लिकेज झाले तर त्याची माहिती कंट्रोल रूमला कशाप्रकारे होते, याबाबत सर्व मान्यवरांना माहिती देण्यात आली.
 
नागपुरात जर पाणी टंचाईचे संकट आले तर अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था काय, ती कशाप्रकारे राबविण्यात येते याबाबत कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी आसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

मनपाचे कर्मचारी नदीकाठावर पर्यावरणदिनी लावणार ६० हजारांवर बांबूची झाडे

शासनाच्या कार्यक्रमांतर्गत होणार एक लाख वृक्षांची लागवड : अभिनव उपक्रमाच्या तयारीचे निर्देश
 
नागपूर, ता. ३१   :  महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. मात्र, तत्तपूर्वी ५ जून अर्थात पर्यावरणदिनी आयुक्तांसह मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी पाच याप्रमाणे शहरातील नदीकाठांवर सुमारे ६० हजार बांबू आणि आजनच्या  रोपट्यांची लागवड करणार आहे. पदाधिकारी, नगरसेवकही यामध्ये सहभागी होणार असून या अभिनव उपक्रमाच्या तयारीचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले आहे.
 
यासंदर्भात गुरुवारी (ता. ३१) मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी ङेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
 
नदीकाठावर बांबू आणि आजनच्या झाडांची लागवड करण्याची संकल्पना आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मांडली. शासकीय वृक्ष लागवड मोहिमेत एक लाख वृक्षांचे उद्दिष्ट असले तरी त्याव्यतिरिक्त नवा उपक्रम म्हणून नागपुरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी या तीनही ठिकाणी एकाच दिवशी, एकाच वेळी वृक्षारोपण केले जाईल. झोननिहाय या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असून नदीचे संपूर्ण नदीच्या पात्रात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नदी ज्या भागातून जाते त्या भागातील प्रभागातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसुद्धा प्रशासनातर्फे या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेतील प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी आणि प्रत्येक सफाई कामगारसुद्धा यामध्ये सहभागी होईल, अशी माहिती आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिली.
 
बांबू आणि आजनची वृक्ष लावण्यामागचा उद्देश असा की या झाडांना कुठलेही जनावरे खात नाही. त्यामुळे यांना ट्री गार्डची आवश्यकता पडणार नाही. नदीच्या तीरावर गाळ थांबविण्याचे कार्य ही वनस्पती करेल आणि या झाडांमुळे नदी तीराचे सौंदर्यही खुलेल.
 
या संपूर्ण उपक्रमाची तयारी आजपासून सुरू झाली असून ३ जून रोजी संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. शासकीय मोहिमेतील वृक्ष लागवडीची तयारी १० जूनपर्यंत पूर्ण करायची असून तो कार्यक्रम पुढे महिनाभर चालेल. याअंतर्ग़त नागपूर महानगरपालिकेच्या शाळा, खुले भूखंड, प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाने आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

 

 

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना

कृषि क्षेत्रातील मार्गदर्शक गमावला
 
भाजपमधील ज्येष्ठ नेते राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाची वार्ता ऐकून धक्काच बसला. पक्षात विविध पदे भूषविणारे, पक्षाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे, कृषी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार म्हणून भाऊसाहेबांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या सर्व क्षेत्रातील आमचा मार्गदर्शक आणि पक्षाचा ज्येष्ठ आधारस्तंभ आम्ही गमावला, याचे तीव्र दु:ख आहे. भाऊसाहेबांना नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली.
 
-नंदा जिचकार, महापौर, नागपूर.
 
जनसंग्रह असलेला नेता हरपला
 
राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची राजकारणावर चांगली पकड होती. कृषी क्षेत्र, सहकार क्षेत्रात त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यांचा जनसंग्रह मोठा होता. आमदार, विरोधी पक्ष नेते, खासदार, प्रदेशाध्यक्ष, कृषिमंत्री अशा विविध पदावर त्यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या निधनाने पक्षात ज्येष्ठ मार्गदर्शकाची पोकळी निर्माण झाली आहे. पक्षासाठी त्यांनी दिलेले समर्पण हे सदैव लक्षात राहील. भाऊसाहेबांना विनम्र आदरांजली.
 
-दीपराज पार्डीकर, कार्यकारी महापौर, नागपूर.

 

 

अनुपस्थितीबद्दल लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ द्या!

विधी समिती सभापतींचे निर्देश : एमआरटीपी ॲक्टअंतर्गत कारवाईची माहिती १५ दिवसांत द्या
 
नागपूर,ता.३० : महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना कायद्यान्वये करण्यात येणाऱ्या कारवाईसंदर्भातील झोननिहाय सविस्तर माहितीचा तुलनात्मक तक्ता तयार करून १५ दिवसांच्या आत विधी विभागाकडे सादर करण्याचे निर्देश विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले. महत्त्वपूर्ण बैठकीत अनुपस्थित असणाऱ्या लक्ष्मीनगर झोनच्या संबंधित अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बुधवारी (ता. ३०) विधी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभापती धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला समितीच्या उपसभापती संगीता गिऱ्हे, सदस्य जयश्री वाडीभस्मे, अमर बागडे, समिता चकोले, जुल्फेकार अहमद भुट्टो, शेख मोहम्मद जमाल, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, विधी अधिकारी व्ही.डी. कपले उपस्थित होते.
 
सदर बैठकीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना नियोजन कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात आलेल्या कारवाईची झोननिहाय माहिती सभापतींनी घेतली. यात जी प्रकरणे शासनाकडे अपीलमध्ये आहेत, जी प्रकरणे न्यायालयात आहेत, त्याचा पाठपुरावा कोण करतो, याबाबत सभापतींनी माहिती विचारली. मात्र, झोनस्तरावर वकील किंवा विधी सहायक उपलब्ध नसल्याने या प्रकरणांच्या पाठपुराव्यास विलंब होतो, अशी माहिती सहायक आयुक्तांनी दिली. समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम यांनी सदर कार्यात विधी विभागाशी समन्वय साधून त्यांची मदत घेण्याचे निर्देश दिले. झोनकडून मागणी आल्यास कायदेशीर बाबींच्या कार्यासाठी झोनस्तरावर विधी सहायक नेमण्याचे आश्वासन दिले. एमआरटीपी कायद्याअंतर्गत प्रकरणातील माहितीसाठी एक तुलनात्मक तक्ता तयार करण्यात यावा. ३१ मार्च २०१८ पर्यंतची प्रलंबित प्रकरणे, त्याची सद्यस्थिती, ठोकताळे तपासले अथवा नाही, कोणता वकील प्रकरण हाताळीत आहे अशी माहिती अंतर्भूत करून १५ दिवसांच्या आत विभागाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांकडे येणाऱ्या आणि तद्‌नंतर अनादरित होणाऱ्या धनादेशांबद्दलच्या प्रकरणांचा आढावा सभापतींनी घेतला. नागपूर महानगरपालिकेने सन २००६-०७ मध्ये अनादरित धनादेशाची सर्वाधिक ४९ प्रकरणे न्यायालयात दाखल केली होती. त्यापैकी ४८ प्रकरणे निकाली निघाली आहे. त्यानंतर मात्र कुठलेही प्रकरणे न्यायालयात प्रविष्ठ करण्यात आली नाही, अशी माहिती विधी अधिकारी कपले यांनी दिली. याबाबत सभापतींनी माहिती विचारली असता, बहुतांश धनादेश ही कर विभागातील असतात. अनादरित धनादेशप्रकरणी १३८ ची नोटीस दिल्यानंतर बहुतांश धनादेशाची रक्कम वसूल होते. काही प्रकरणात रक्कम अतिशय कमी असल्याने न्यायप्रविष्ठ करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याची माहिती झोन सहायक आयुक्तांनी दिली. यापुढे विधी विभागाने कर विभागाशी संपर्क साधून झोननिहाय अनादरित धनादेशाची माहिती घ्यावी आणि कायद्याच्या चौकटीत राहून नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश दिले.
 
मनपामध्ये आयुक्त, सत्तापक्ष नेते, माजी महापौर, विधी समिती सभापती, कायदा सल्लागार, अपर आयुक्त यांचा समावेश असलेली एक विधी समीक्षा समिती नेमण्यात आली आहे. या समितीने मनपाची न्यायालयातील प्रकरणे बघणाऱ्या आठ वकिलांचे काम थांबविले होते. आता नवीन वकिलांची नियुक्ती करताना वकिलांचा अनुभवाच्या आधारे नियुक्त करावयाच्या संख्येत तिपटीने अर्ज मागवा. त्याची छानणी करून विधी समितीच्या माध्यमातून समीक्षा समितीकडे ठेवण्याचे निर्देश सभापती धर्मपाल मेश्राम यांनी दिले.
 
मनपात असलेल्या दहाही विषय समित्यांसाठी एक निश्चित धोरण विधी समितीने तयार करावे या महापौरांच्या सूचनेनुसार सदर धोरणाचे प्रारूप आजच्या बैठकीत समितीने मांडले. काही दिवसांपूर्वी समितीने मुंबई आणि पुणे महानगरपालिकेचा दौरा केला. या दौऱ्यानंतरचा अहवाला विधी अधिकारी कपले यांनी समितीसमोर मांडला. मुंबई, पुणे महानगरपालिकेप्रमाणे नागपूर महानगरपालिकेत राजशिष्टाचार अधिकारी असावा, महानगरपालिकेच्या प्रकरणाकरिता स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करावी, महत्त्वाच्या प्रकरणात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांचे मत घेण्यासाठी पॅनल तयार करण्यात यावे, अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत.
 
बैठकीला झोन सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, राजू भिवगडे, सुभाष जयदेव, राजेश कराडे, प्रकाश वऱ्हाडे, विजय हुमणे, अशोक पाटील, हरिश राऊत उपस्थित होते.
 
 

 

मनपा शाळांतील गुणवंतांचा कार्यकारी महापौर पार्डीकर यांच्या हस्ते सत्कार
 
विज्ञान शाखेतून धम्मदीप गौरकर, कला शाखेतून शिरीन परवीन तर वाणिज्य शाखेतून सालेहा अंजुम अव्वल
 
नागपूर,ता.३० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी (ता. ३०) घोषित करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांचा तिन्ही विभागाच्या निकालाची सरासरी टक्केवारी ८४.४१ इतकी आहे. विज्ञान शाखेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेचा विद्यार्थी धम्मदीप धर्मपाल गौरकर (७६ टक्के), कला शाखेतून साने गुरुजी उर्दू उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी शिरीन परवीन हमीद खान (८१.५४ टक्के) आणि वाणिज्य शाखेतून एम. ए. के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी सालेहा अंजुम (७८.१५ टक्के)आणि रफानाझ (७८.१५) ह्यांनी संयुक्त प्रथम येण्याचा मान पटकाविला.
 
विज्ञान शाखेतून प्रथम तीनही विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेतील आहेत. या शाखेत द्वितीय क्रमांक मृणाल सुधाकर पानतावणे (७४ टक्के) तर तृतीय क्रमांक नकुल ज्ञानेश्वर ठाकरे (७३.६९ टक्के) यांनी पटकाविला. कला शाखेतून दुसरा क्रमांक साने गुरुजी उर्दू उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी सुमेला परवीन मो. जफर खान, तृतीय क्रमांक एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेच्या शायदा बेगम (७१.२३), वाणिज्य शाखेतून द्वितीय क्रमांक एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेची शबीना परवीन (७५ टक्के) हिने पटकाविला.
 
सर्व गुणवंतांचा यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या हस्ते महापौर कक्षात सत्कार करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, बसपाचे पक्षनेते मोहम्मद जमाल, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका प्रमिला मंथरानी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.
 
सर्व विद्यार्थ्यांचा सत्कारानंतर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, मनपा शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मनपाच्या शाळेत हलाखीच्या परिस्थितीतील कुटुंबांची पाल्ये शिकतात. त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. यापुढेही प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
 
विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे म्हणाले, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षकवृदांनी बरीच मेहनत घेतली. ९३ टक्के शाळांचा निकाल लागणे यावरून त्यांची मेहनत दिसून येते. मनपाच्या शाळेतूनही चांगले विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे या शाळेकडे विद्यार्थी वळविण्याचा प्रयत्न सध्याचे सभापती करीत आहेत, असे म्हणत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 
कार्यक्रमाचे संचालन शिक्षण विभागाचे प्रशांत टेंभुर्णे यांनी केले. आभार क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी देशकर, साने गुरुजी उर्दू उच्च प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती समीरा अली, एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका निखत खान उपस्थित होते.
 
शाळानिहाय निकाल :
 
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळा (विज्ञान शाखा : ९३ टक्के)
 
-साने गुरुजी उर्दू उच्च प्रा. शाळा (वाणिज्य शाखा : ९०.९० टक्के)
 
-ताजाबाद उर्दू उच्च माध्यमिक शाळा (विज्ञान शाखा : ९२.३० टक्के, कला शाखा : ८७.५ टक्के, वाणिज्य शाखा : ५० टक्के)
 
-एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळा (विज्ञान शाखा : ९२ टक्के, कला शाखा : ८१ टक्के, वाणिज्य शाखा : ७४ टक्के)

 

 

उर्जाबचतीसाठी स्वयंसेवकांचे आवाहन अन व्यापारांचा प्रतिसाद

पोर्णिमा दिवसानिमित्त मनपा-ग्रीन व्हिजील तर्फे जनजागृती : एका तासात २७०९ युनीट वीज बचत
 
नागपूर,ता. २९ : नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने आज (ता. २९) पौर्णिमा दिवसानिमित्त जनजागृती अभियान राबविण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या चिल्ड्रेन ट्राफिक पार्क, अजित बेकरी परिसरात स्वयंसेवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी व नागरिकांनी आपल्या प्रतिष्ठान व घरातील अनावश्यक वीज दिवे एक तासाकरिता बंद केले.
 
या जनजागृती कार्यक्रमादरम्यान नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल,  सहायक अभियंता अजय मानकर, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ् चैटर्जी यांनी स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. सर्व मान्यवरांनीही जनजागृती केली. ऊर्जाबचत ही काळाची गरज असून गेल्या काही वर्षांपासून नागपूर महानगरपालिका ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने ऊर्जाबचतीचा हा उपक्रम राबवित आहे. 
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी याबाबत बोलताना म्हणाले,  आमदार अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून अविरत राबविण्यात येत आहे. यामुळे आतापर्यंत व्यापारी आणि नागरिकांच्या सहकार्याने वीज बचत करण्यात आली आहे. दिवसेंदिवस या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढत असून आता उत्स्फूर्तपणे अनावश्यक वीज दिवे पोर्णिमा दिवसाव्यतिरिक्त अन्य दिवशीही नागरिक बंद ठेवत असल्याचे ते म्हणाले.
जनजागृती अभियानात ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, विष्णूदेव यादव, दादाराव मोहोड, अमोल भलमे, विकास यादव, मनपाचे कनिष्ठ अभियंता गजेंद्र तारापुरे, सुनील नवघरे आदी सहभागी झाले होते.
 
२७०९ यूनीटची बचत
प्रत्येक पौर्णिमा दिवसाला मनपाच्या प्रत्येक झोन कार्यालय व संबंधित कार्यालयातील विद्युत दिवे एक तासाकरिता बंद करण्यात येतात. जनजागृती मोहिमेदरम्यान व्यापारी आणि नागरिकही विद्युत दिवे बंद करतात. आज (ता. २९) रात्री ८ ते ९ या एक तासात एकूण २७०९.६४ युनीट विजेची बचत झाल्याची माहिती मनपाचे कनिष्ठ अभियंता सुनील नवघरे यांनी दिली.
 
यापुढे नियमित वीज बचत करणार!
पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने मनपा आणि ग्रीन व्हिजीलचे स्वयं सेवक आपल्यापर्यंत पोचले. आपण स्वतः पर्यावरणप्रेमी आहोत. यापुढे आपणही या उपक्रमात नियमित सहभागी होणार. उर्जाबचतीचे महत्त्व लोकांपर्यंत पोचविणाऱ.

 

 

बहादुरागाव आणि चिखलीपर्यंत ‘आपली बस’ सेवा सुरू

नागपूर, ता. २९ :  नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे बर्डी ते बहादुरागाव आणि बर्डी ते चिखली अशा दोन शहर बस सेवेचा शुभारंभ मंगळवारी (ता. २९) करण्यात आला.
 
बर्डी ते बहादुरागाव  मार्गे अयाचित मंदिर, रमणा मारोती, खरबी चौक, सुंदर नगर या बसचा शुभारंभ कार्यक्रम गरीब नवाज चौक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बहादुराचे सरपंच राजकुमार वंजारी, माजी सरपंच नरेंद्र नांदुरकर, राष्ट्रीय मानवाधिकार रक्षा समितीच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी दत्त, दिलीप चाफेकर यांची उपस्थिती होती. मनपाचे रामराव मातकर, डिम्टसचे सुनील पशिने, डेपो मॅनेजर सिद्धार्थ गजभिये व परिसरातील ज्येष्ठ नागरिकही यावेळी उपस्थित होते.
 
यापूर्वी सुरू असलेल्या बर्डी-शिवनी बसचा विस्तार चिखलीपर्यंत करण्यात आला. या नव्या सेवेचा शुभारंभ कार्यक्रम चिखली ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच सुनंदा लांजेवार, जि.प. सदस्य विनोद पाटील, शिवनीचे सरपंच भगवान कोरडे, मनपाचे रामराव मातकर, डिम्टस्‌चे सुनील पशिने, डेपो मॅनेजर सिद्धार्थ गजभिये उपस्थित होते.
 
बर्डी-बहादुरागाव बससाठी  रश्मी दत्त आणि नरेंद्र नांदुरकर तर बर्डी-चिखली बससाठी जि.प. सदस्य विनोद पाटील यांनी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या मागणीची दखल घेत त्यांनी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांना सदर सेवा सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सदर दोन्ही सेवा सुरू करण्यात आला. परिसरातील जनतेने या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

 

गंगाबाई घाटाचे सौदर्यींकरण लवकरच!

कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी केली पाहणी
 
नागपूर,ता.२९ : शहरातील सर्व दहन घाटांचे सौंदर्यीकरण लवकरच करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी मंगळवार (ता.२९) रोजी गंगाबाई घाटाची पाहणी केली व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
 
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, मनपाच्या प्रतोद दिव्या धुरडे, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेवक राजेश घोडपागे, विजय चुटेले, नगरसेविका श्रद्धा पाठक, सुमेधा देशपांडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, लकडगंज झोन सहायक आयुक्त सुभाष जयदेव, पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी मान्यवरांनी संपूर्ण घाटाची पाहणी केली व तेथील पायाभूत सुविधांचा अभाव आणि अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त केली. संपूर्ण घाटाचा परिसर पुढील दोन दिवसात स्वच्छ करण्यात यावा, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. गंगाबाई घाटालगत असलेल्या सुलभ शौचालयाची पाहणी यावेळी मान्यवरांनी केली. घाटाच्या परिसरात रात्रीच्या वेळी वावर असणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, असे निर्देश दीपराज पार्डीकर यांनी दिले.
 
घाट परिसरात असलेल्या सूचना फलकावर जुन्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्याजागी नवीन सूचना फलक तातडीने बसविण्यात यावे, असे निर्देश कार्यकारी महापौरांनी दिले. घाटाच्या बाहेरील परिसरात विसावा केंद्रालालगत असलेल्या फुटपाथला भेगा पडलेल्या आहे, काही जागी तो खचला आहे. तो तातडीने दुरूस्त करण्यात यावा, असे निर्देश स्थायी समिती सभापती वीरेद्र कुकरेजा यांनी दिले.
 
सध्या गंगाबाई घाटात दोन मोठे शोकसभा सभागृह आहे. त्यापैकी एक सभागृह वापरात नाही, त्याचा वापर कसा करता येईल या दृष्टीने विचार करण्यात यावा, अशी सूचना कार्यकारी महापौरांनी केली. दोन्ही शोकसभा सभागृहाचे नूतनीकरण आणि डागडुजी करण्याचा प्रस्ताव तयार करावा, असेही दीपराज पार्डीकर यांनी सांगितले. घाटामधील काष्ठ गोदाम, डिझेल शव दाहिनी, स्वच्छता गृह याची देखील पाहणी मान्यवरांनी केली. घाटावर अद्ययावत विद्युत व्यवस्था आणि एल.ई.डी लाईट्स बसविण्यात यावे, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. घाट परिसरात असलेल्या उद्यानाला विकसित करावे आणि त्या जागी उद्यान विभागामार्फत विविध झाडे लावण्यात यावी, अशा सूचना देखील त्यांनी केल्या.
 
गंगाबाई घाटालगत असलेल्या दफन घाटाची पाहणी यावेळी मान्यवरांनी केली. दफन घाटावर अस्वच्छता दिसून आल्यामुळे कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी नाराजी व्यक्त केली व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दफन घाटाचे समतलीकरण करावे आणि माती काढणाऱ्यांना एक प्रमाणमात्र शुल्काचा दर ठरवून देण्यात यावा, असे निर्देश दीपराज पार्डीकर यांनी दिले.
 
यावेळी गांधीबाग झोनचे कनिष्ठ अभियंता रवी बुंदाडे, झोनल अधिकारी सुरेश खरे, स्वास्थ निरिक्षक रोहिदास राठोड, आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.  

 

 

मनपाद्वारे शालेय पोषण आहारावर मुख्याध्यापकांची कार्यशाळा

नागपूर,ता.२९ : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अनुदान वितरण व यंत्रणेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणेसंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या तवीने मंगळवारी (ता.२९) महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे शाळा मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
 
नागपूर महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यशाळेच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी श्री. कोहर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
कार्यशाळेत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रास्ताविकातून शालेय पोषण आहार योजनेतील सुधारणांसंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुढील शैक्षणिक सत्राच्या नियोजनासंदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी पर्यावरणविषयक मार्गदर्शन केले. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने ५ जून रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत प्रत्येक शाळेतून किमान पाच विद्यार्थी पाठविण्याचे आवाहन त्यांनी मुख्याध्यापकांना केले.
 
कार्यशाळेचे संचालन सहायक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती प्रीती बंडेवार यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी संध्या पवार, दिलीप वाखतकर, श्री. टेंभुर्णे आदींनी सहकार्य केले.

 

 

अर्थ डे नेटवर्क पुरस्काराचे प्रमाणपत्र महापौर, आयुक्तांकडे सुपूर्द

‘शहर ग्रीन करो’ स्पर्धेत मनपा आणि ग्रीन व्हिजीलला मिळाला होता बहुमान
 
नागपूर,ता.२८ : पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात कार्यरत असलेल्या अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील शहरांसाठी ‘शहर ग्रीन करो’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १० लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण ४८ शहरांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नागपूर शहराचा समावेश विजेत्या पहिल्या दहा शहरांमध्ये झाला. अर्थ डे नेटवर्क तर्फे नुकताच हा पुरस्कार प्राप्त झाला. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटजी, सुरभी जैस्वाल यांनी हा पुरस्कार महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्याकडे सुपूर्द केला.
 
यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, मनपाचे क्रीडा सभापती नागेश सहारे, जैवविविधता समितीच्या सभापती दिव्या धुरडे उपस्थित होत्या. महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशन नागपूर महानगरपालिकेसोबत  वर्षभर पर्यावरणविषयक जनजागृतीसंदर्भात उपक्रम राबवित असतात. नदी स्वच्छता मोहीम, ऊर्जा बचतीसाठी पोर्णिमा दिवस, शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता अभियान, ओला आणि सुका कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, पर्यावरणपूरक गणेशोत्सवअंतर्गत तलाव संरक्षण, हरितम्‌ नागपूर (वृक्षारोपण) आणि पर्यावरण शिक्षण आदी पर्यावरणाशी संबंधित उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमुळे नागपूरकरांमध्ये ऊर्जा बचत, स्वच्छता अभियान आणि पर्यावरणासंबंधी जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशा उपक्रमांमध्ये नागपूर महानगरपालिका नेहमीच सोबत राहील, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी दिला.

 

 

इमारतींवरील टेलिकम्युनिकेशन टॉवरवर कर आकारणी करा

स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले यांचे निर्देश : कायदेशीर बाबी तपासून करणार तातडीने कार्यवाही
 
नागपूर, ता. २८   :  शहरातील मोठमोठ्या इमारतींवर असलेल्या टेलिकम्युनिकेशन टॉवरवर कोणाचेही बंधन नाही. ज्या इमारतीवर टॉवर आहे, त्या इमारतीच्या बांधकाम नकाशात टॉवरची मंजुरी नाही. असे असताना सर्वत्र उभे असलेले टॉवर बेकायदेशीर ठरवून त्यांना कर आकारणीच्या कक्षेत आणा, असे निर्देश स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या स्थापत्य समितीची बैठक सोमवारी (ता. २८) सिव्हील लाईन मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. सदर बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपसभापती किशोर वानखेडे, सदस्य जितेंद्र घोडेस्वार, राजकुमार शाहू, कमलेश चौधरी, सरीता कावरे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, निगम सचिव हरिश दुबे, नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे, सहायक आयुक्त (जाहिरात) विजय हुमने उपस्थित होते.
 
मोबाईल टॉवर संदर्भात स्थापत्य समितीने यापूर्वीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार नगर रचना विभागाने काय कार्यवाही केली, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे टॉवरवरील कार्यवाही थांबली असल्याचे नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे यांनी सांगितले. यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या कायदा विभागाशी, निगम आयुक्तांशी चर्चा करून पुढील १५ दिवसांत यासंदर्भात समितीला माहिती द्या. मोबाईल टॉवर म्हणजे स्वतंत्र बांधकामच असल्याने अवैध बांधकामाची नोटीस संबंधित कंपनीला पाठवून त्यावर निरनिराळ्या प्रकारच्या शास्तीची आकारणी करता येईल का, याबाबतही तपासणी करा, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले.
 
टी.ओ.डी. क्षेत्रात मेट्रोचे बांधकाम आहे, त्यामध्ये शिथिलता देण्यासंदर्भात शासनाचे काय आदेश आहे, याची माहिती समितीने प्रशासनाकडून घेतली. यासंदर्भात नागपुरातील ज्या-ज्या जनतेकडून हरकती-सूचना आलेल्या आहेत त्यावर सुनावणी करण्यासाठी आणि त्या शासनाकडे पाठविण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. छोट्या भूखंड धारकांच्या सूचना विचारात घेण्यात याव्या, असे मत मनपाने मांडले असल्याची माहिती सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे यांनी दिली. यासंदर्भात आवश्यक तो पाठपुरावा वेळोवेळी करण्यात यावा. शासनाकडे स्मरणपत्र पाठविण्यात यावे, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले.
 
शासन निर्णयानुसार ‘प्रशमित संरचना’ बाबत आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याची माहिती श्री. गावंडे यांनी दिली. यासंदर्भात झालेला ठराव ४ एप्रिल रोजी कार्यान्वित केला आहे. यासंदर्भात आजपर्यंत केवळ ७७ प्रकरणे प्राप्त झाले असून त्याची छानणी सुरू आहे. यावर निर्देश देताना सभापती संजय बंगाले म्हणाले, या विषयाच्या जनजागृतीत प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे. तातडीने याबाबत योग्य ती प्रसिद्धी करा. नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांची मदत घ्या. झोपडपट्टी भागात ऑटोरिक्षातून लोकांपर्यंत माहिती पोहचवा. होर्डिंग लावा. १५ जूनपर्यंत आवश्यक ती जनजागृती करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
 
यापुढे नागपूर महानगरपालिकेतूनही सर्व इमारती बांधकामांना मंजुरीसाठी ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करा. अधिकाधिक पेपरलेस व्हावे. शासनाच्या नगर रचना विभागाच्या ‘महावास्तू’ बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली या सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेत तातडीने करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

 

मनपातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व आयुक्त यांनी केले माल्यार्पण
 
नागपूर, ता. २८ : नागपूर महानगरपालिकेद्वारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सोमवारी (ता. २८) जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शंकरनगर स्थित पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती प्रामुख्याने उपस्थित होते.
 
याप्रसंगी नगरसेवक सुनील हिरणवार, निशांत गांधी, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता, शिवाजी नगर संघचालक डॉ. राजाभाऊ शिलेदार,  सावरकर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, अजय कुळकर्णी, प्रा.प्रमोद सोहणी, शिरीष दामले, मुकुंद पाचखेडे, महादेव बाजीराव, उमाकांत रानडे, कमला मोहता, रवींद्र कासखेडीकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
 
मनपा मुख्यालयात कार्यकारी महापौर आणि आयुक्त यांनी केले अभिवादन
 
नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राला कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक अग्निशमन अधिकारी सुनील राऊत उपस्थित होते. 

 

 

स्वच्छ फुटाळा मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे : दीपराज पार्डीकर

कार्यकारी महापौरांनी केली फुटाळा तलावाची पाहणी
 
नागपूर,ता.२८ : शहरातील सर्व तलाव व जलाशये ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संवर्धन व जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच मनपा प्रशासनाच्या नेतृत्वात सुरू झालेले स्वच्छ फुटाळा, स्वच्छ गांधीसागर मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी केले.
 
सोमवारी (ता.२८) कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी फुटाळा तलावाची पाहणी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दीपराज पार्डीकर यांनी प्रत्यक्ष तलावात उतरून स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. स्वच्छतेचे काम बघून समाधान व्यक्त केले. फुटाळा तलावातील जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते काम तसेच कायम सुरू ठेवावे, असे निर्देश पार्डीकर यांनी दिले. तलावाच्या परिसरातील अतिक्रमणही आता वाढणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिल्या.
 
काल रविवारी (ता.२७) मनपाचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फुटाळा तलावाची पाहणी केली. आवश्यक त्या सूचनाही केल्या. त्यांच्या सूचनेनुसारच तलावाच्या स्वच्छेतेसंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. तलावाच्या सभोवताल असलेल्या दुकानांना त्यांच्या भागातील स्वच्छतेची जबाबदारी देण्यात यावी, असेही दीपराज पार्डीकर यांनी सांगितले.
 
यावेळी युवराज नागपुरे, लक्ष्मण केळवदे यांच्यासह २२ जणांची चमू फुटाळा तलाव स्वच्छ मोहिमेत सहभागी आहे.

 

 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तलाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच – आयुक्त

महापालिकेद्वारे फुटाळा तलाव स्वच्छता अभियान
 
नागपूर,ता.२७. शहरातील सर्व जलाशये आणि तलाव ही आपलीच संपत्ती आहे. त्याला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे. मागील काही वर्षापासून नागपूर महानगरपालिका शहरातील अन्य शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नद्या व सरोवरे स्वच्छता अभियान राबवित आहे. परंतु नद्या व तलाव स्वच्छ केल्यानंतर त्या ठिकाणी कचरा व घाण न टाकता, तलावाची स्वच्छता राखण्यास सर्व नागरिकांनी व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तलाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असे आवाहन आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केले.
 
रविवारी (ता.२७) सकाळी ७ ते ९ या दरम्यान फुटाळा तलाव येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते, उच्च न्यायालच्या नागपूर खंडपीठाचे प्रबंध श्री.शर्मा, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर, धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे, सतरंजीपुरा झोन सहायक आयुक्त प्रकाश वराडे, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त राजेश कराडे, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, पशूचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले, उपअभियंता आर.व्ही.मुळे, रवी बुंधाडे, उप मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व जलाशये, तलाव, सरोवरे स्वच्छ करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. यावेळी फुटाळा तलाव व परिसराची आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी पाहणी केली. तलावातील जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, हे बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. तलावाच्या काठावर असेलेले झाडे व झुडपे, गाळ त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने काढण्यात आलेला गाळ व माती वासूसेना मुख्यालायाला व भांडेवाडी डंपींग यार्ड येथे कंपोस्ट करण्यासाठी देण्यात यावे, असे निर्देश दिले. तलावाच्या किना-यावर असलेली झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहे. त्या छाटून टाकाव्या, पण झाडांचे सौंदर्यीकरण बिघडता कामे अशा प्रकारे छाटण्यात याव्या, असेही त्यांनी सूचविले.
 
फुटाळा तलावाच्या सभोवताल अतिक्रमणाचा विळखा आहे. तेथील अतिक्रमण तातडीने काढून टाकण्यात यावे, व त्यावर कारवाई करावी, असेही निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. तलावा काठावर वराहपालन सुरू आहे. त्यावर तातडीने कारवाई करावी. तलावाच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टीने प्राळीव प्राणी घेऊन येण्यास मज्जाव करावा, असे निर्देश दिले.
 
फुटाळा येथील तलाव स्वच्छता अभियानात पर्यावरण प्रेरणा विदर्भ, स्वच्छ असोसिएशन, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, नीरी, ऑल इंडिया इन्सिट्युट ऑफ लोकल गव्हर्मेंट, भारतीय वायूसेना, वायसेनानगर मुख्यालय, ४ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नेव्हल विंग, नागपूर गार्डन क्लब, तलाव बचाव समिती, ईक्वी सिटी, मनपा अग्निशमन विभाग, सर्प मित्र, सर्व झोनचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.
 
यावेळी उपस्थित विविध संस्थांच्या पदाधिका-यांमध्ये अनसूया छाबरानी, लिना बुधे, जयंत पाठक, निलांजन भौमिक, शरद पालिवाल, दिनेश तहलीयानी, विजय लिमये, अग्निशमन विभागाचे मोहन गुडधे, सुनील राऊत, केशव कोठे, धंतोली झोनचे श्रीकांत वैद्य, सर्पमित्र स्वप्निल बोधाने, साहिल शरणागत, आशिष गायकवाड, आशीष मेंढे, अनिकेत खेरकर, तलाव बचाव सिमितीचे युवराज नागपूरे व यांची चमू यांच्यासह आरोग्य विभागाचे रोहिदास राठोड व सर्व झोनल अधिकारी उपस्थित होते.  
 
मनपा स्वच्छ पर्यावरण ठेवण्यासाठी प्रयत्नशील – महापौर
 
नागपूर महानगरपालिका पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून शहरातील सर्व नद्या व तलाव सातत्याने स्वच्छ करित आहेत. तरिही सर्व नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी व्हावे, तसेच एकदा स्वच्छता केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी घाण व कचरा न टाकता आपले नागरिकत्वाचे कर्तव्य पार पाडावे, अशी कळकळीची विनंती चीनला रवाना होण्यापूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी केली.
 

 

महापौर नंदा जिचकार चीनला रवाना

पर्यटनावर आधारीत आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेत घेणार सहभाग
 
नागपूर, ता. २६ : चीनमधील झेंग शू शहरात पर्यटन या विषयावर आधारीत आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी महापौर नंदा जिचकार शनिवारी (ता. २६) रात्री चीनला रवाना झाल्या.  परिषदेत त्या ‘नागपूरच्या शाश्वत विकासात पर्यटन कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकेल’, याबाबत सादरीकरण करतील.
 
‘सिटी टुरिझम इनोव्हेशन इन द शेअरिंग इकॉनॉमी’ या संकल्पनेवर सदर परिषद आयोजित करण्यात आली आहे.  पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या जगभरातील शहरांतील महापौर आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे तज्ज्ञ या परिषदेच्या माध्यमातून आपले अनुभव मांडतील. या परिषदेत ‘बेल्ट ॲण्ड रोड’ टुरिजम सिटीज समीट, परिसंवाद, आंतरराष्ट्रीय पर्यटन शहर प्रदर्शन राहील. शाश्वत शहरी विकासात पर्यटन महत्त्वाची भूमिका बजावू शकेल काय, याबाबत विचारमंथन करण्यात येणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून नागपूरच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न राहील.
 
 

 

परिवहन सभापतीपदी जितेंद्र कुकडे यांची अविरोध फेरनिवड
 
नागपूर,ता. २५ :  नागपूर महानगरपालिका परिवहन समितीच्या सभापतीपदी जितेंद्र (बंटी) कुकडे यांची अविरोध फेरनिवड झाली.
 
परिवहन समिती सभापतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे शुक्रवारी (ता. २५) या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सकाळी ११ वाजतापर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याच्या वेळेपर्यंत केवळ नगरसेवक जितेंद्र कुकडे यांनी दोन नामांकन पत्र दाखल केले होते. एका नामांकन पत्राच्या सूचक नगरसेविका अर्चना पाठक तर अनुमोदक विद्या मडावी होत्या. दुसऱ्या नामांकन पत्राच्या सूचक अभिरुची राजगिरे आणि अनुमोदक उज्ज्वला शर्मा होत्या. छानणीअंती दोन्ही नामांकन पत्र वैध ठरले. एकाचे उमेदवाराचे नामांकन अर्ज असल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जितेंद्र कुकडे यांना अविरोध विजयी घोषित केले.
 
निवडीनंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सभापतीपदी निवड झालेले जितेंद्र कुकडे यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, निगम सचिव हरिश दुबे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप आणि परिवहन समितीचे सदस्य उपस्थित होते.

 

 

 

शांतनु गोयल यांनी स्वीकारला अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

नागपूर,ता.२५. नागपूर महानगरपालिकेचे रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्त झालेले भा.प्र. सेवेतील अधिकारी शांतनु गोयल यांनी गुरूवारी (ता.२४) अतिरिक्त आय़ुक्त रवींद्र कुंभारे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. 
 
शांतनु गोयल हे मुळ कानपूरचे आहे. त्यांनी बीट पिलानी  येथून बी.ई. ऑनर्स (इलेक्ट्रॉनिक्स) केले आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१२ तुकडीचे अधिकारी आहे. यापूर्वी शांतनु गोयल हे गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यापूर्वी राजुरा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून ही त्यांनी काम केले आहे.
 
अतिरिक्त आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर श्री. गोयल यांनी आज महापौर नंदा जिचकार व आयुक्त विरेंद्र सिंह यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्याकडे  सामान्य प्रशासन विभाग, अभियोजन, निवडणूक, अग्निशामक व समाजकल्याण इ. विभागाचे प्रत्यायोजन आयुक्त विरेंद्र सिंह यांनी केले आहे.

 

 

लकडगंजमधील मनपाच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने काढा : आयुक्त वीरेंद्र सिंह

पिवळी नदी, लेंडी तलावालाही दिली भेट : नदी स्वच्छता अभियानाची पाहणी
 
नागपूर, ता. २५ :  लकडगंज झोन कार्यालयाच्या मागे नागपूर महानगरपालिकेचा भूखंड आहे. हा भूखंड टिंबर मर्चंट असोशिएशनला लीजवर देण्यात आला आहे. मात्र या संपूर्ण जागेवर भटक्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण तातडीने उठवा आणि संपूर्ण जागेवर सुरक्षा भिंत बांधा, असे निर्देश मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
आयुक्तांनी शुक्रवारी (ता. २५) सकाळी ८ वाजता लकडगंजमधील संबंधित जागेला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. मनपाच्या मोक्याच्या जागेवर असलेल्या भूखंडावर असलेले अतिक्रमण पाहून आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी चिंता व्यक्त केली. अशा जागांवर अतिक्रमण होण्याची वाट बघू नका. अशा जागांना सुरक्षा भिंतीचे कवच द्या. अतिक्रमण जेथे-जेथे आहे ते तातडीने हटवा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
 
यानंतर त्यांनी जुन्या भंडारा मार्गावरील इतवारी रेल्वेस्थानक पुलानजिकच्या मटन मार्केट असलेल्या हरिगंगा इमारतीची पाहणी केली. सहायक आयुक्त (बाजार) विजय हुमणे यांनी आयुक्तांना इमारतीबाबतची माहिती दिली. या इमारतीसंदर्भातही आयुक्तांनी आवश्यक ते निर्देश संबंधितांना दिला. यानंतर पिवळी नदीच्या ज्या भागात स्वच्छता अभियान सुरू आहे, त्या गौतम नगर, समता नगर परिसराला भेट दिली. स्वच्छता अभियानादरम्यान काढण्यात येणारा गाळ भिंतीला रेटून लावा. त्यानंतर तो गाळ टिप्परने इतरत्र हलवा जेणेकरून पाण्यासोबत तो वाहून जाणार नाही, असे निर्देश दिले.
 
पिवळ्या नदीच्या तीराची मालकी पूर्णपणे नागपूर महानगरपालिकेची आहे. या तीरावरची घाण स्वच्छ करून येथे वृक्षारोपण करा, जेणेकरून भविष्यात अतिक्रमण होणार नाही, असे निर्देश त्यांनी दिले.
 
यानंतर आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी लेंडी तलावाची पाहणी केली. या ठिकाणी उपमहापौर दीपराज पार्डीकर हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांनी तलावालगतच्या अतिक्रमणाची माहिती आयुक्तांना दिली. तलावाचे पाणी निघून जाण्यासाठी असलेल्या आऊटलेटवर मोठे अतिक्रमण आहे. त्यामुळे पाणी निघून जाण्याचा मार्ग बंद झाल्याची माहिती उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिली. तलाव पूर्णपणे वनस्तींनी व्यापलेला आहे, याबाबत आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. मागील वर्षीही तलावाच्या स्वच्छतेसाठी १५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. परंतु जोपर्यंत तलावावरील अतिक्रमण हटविले जात नाही, तोपर्यंत तलाव स्वच्छ होणार नाही, हे वास्तव श्री. पार्डीकर यांनी सांगितले.
 
लेंडी तलावासंदर्भात तातडीने सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात यावा. अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन तातडीने अतिक्रमण हटविण्यात यावे, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे यांना दिले.
 
आयुक्तांच्या दौऱ्यात संबंधित ठिकाणचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये सहायक आयुक्त (अतिक्रमण) अशोक पाटील, सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, सहायक आयुक्त (बाजार) विजय हुमणे उपस्थित होते. 

 

 

म.न.पा. आयुक्त व स्थायी समिती सभापती यांनी केला जरिपटका भागाचा संयुक्त दौरा

पाणी प्रश्न तातडीने सोडवा : मा. आयुक्त
 
नागपूर,ता.२४ :* प्रभाग क्र. १ मधील जरिपटका परिसरात विविध समस्या जसे पाणी प्रश्न, स्वच्छता व इतर समस्येच्या संदर्भात म.न.पा. आयुक्त श्री. वीरेंद्र सिंह यांनी स्थायी समिती सभापती श्री. वीरेंद्र कुकरेजा समवेत जनतेशी संवाद साधून विविध समस्या जाणून घेतल्यां. यावेळी म.न.पा. दुर्बल घटक समिती सभापती श्री. महेंद्र धनविजय, नगरसेविका श्रीमती प्रमीला मथराणी, अप्पर आयुक्त श्री. रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता (ज.प्र) श्री. संजय गायकवाड, ओ.सी.डब्ल्यू. चे वितरण व्यवस्थापक श्री. राजेश कॉलरा, जनसंपर्क अधिकारी श्री.अशोक कोल्हटकर, संजय चौधरी, ओ.सी.डब्ल्यूचे डेलीगेट श्री. रत्नाकर पंचभाई आदी आवर्जून उपस्थित होते.
     
यावेळी प्रभागाचे नगरसेवक व स्थायी समिती सभापती श्री. विरेंद्र कुकरेजा यांनी आयुक्त यांना जरिपटका भागात पाणी कमी प्रमाणात मिळते व पिण्याचे पाणी बरोबर मिळत नसल्याचे निर्देशनास आणून दिले. यावेळी मा. आयुक्त यांनी लगेच गुरुनानक सोसायटी, बाघाबाई ले-आऊट, ग्यानचंदानी लाईन, बाबा हरदास गल्ली, बचवाणी गल्ली, टहलराम किराणा दुकान परिसर,सिंधु नगर, जुना जरिपटका आदी भागातील फीरुन नागरिकांशी पाणी प्रश्नाबाबत थेट संवाद साधला. या भागात पाणी पुरवठा बरोबर होत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच विविध तक्रारीची मा.आयुक्त यांनी दखल घेऊन या भागात नळाच्या प्रेशर वाढवा, टॅकरच्या फे-या वाढवा तसेच या भागातील जनतेला मुबलक पाणी दररोज मिळण्याबाबत त्वरित उपाययोजना करा असे निर्देश कार्यकारी अभियंता श्री. संजय गायकवाड व ओ.सी.डब्ल्यू. चे वितरण व्यवस्थापक श्री. राजेश कॉलरा यांना दिले.
     
यानंतर आयुक्तांनी परिसरातील स्वच्छतेच्या कार्याचे निरिक्षण केले. रस्त्यावरील चेंबरवर कव्हरची डागडूजी करा, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी नियमित सफाई करा, रस्त्याच्या कडेला व फुटपाथवर कचरा त्वरित उचला, सफाई कर्मचा-यांना हातानी  कचरा उचलण्याकरीता हॅडग्लोब व मास्कचा वापर करण्याची सुचना केली.
     
यावेळी म.न.पा. आयुक्त यांनी जरिपटका येथील दयानंद पार्कमध्ये जावून तेथील जनसुविधेचा आढावा घेतला, बॅटमिंटन कोर्ट, ग्रीनजिम, वॉकींग ट्रॅक तसेच पार्किंग व शौचालयाचे निरिक्षण केले.
     
उदयानात येणा-या नागरिकांना कोणतेही त्रास होणार नाही व आवश्यक सुविधाबाबत दक्षता घेण्याचे निर्देश संबंधीत अधिका-यांना दिले.

 

 

२६ ला खासदार महोत्सवाचा समारोप

महापौरांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
 
नागपूर,ता. २४ : नागपुरात सध्या खासदार महोत्सव सुरू आहे. शनिवारी २६ मे रोजी खासदार महोत्सवाचा समारोप यशवंत स्डेडियम येथे होणार आहे. या समारोपाच्या पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी गुरूवारी (ता.२४) मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात घेतला.
 
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त वीरेंद्र सिंह, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, मनपाच्या प्रतोद दिव्या धुरडे, उपनेत्या वर्षा ठाकरे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर देऊळगावकर, नागपूर मेट्रो रेल्वेचे रवींद्र धकाते, अखिलेश हळवे, पोलिस सहायक आयुक्त (वाहतूक) जयेश भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी, मुंजे चौकात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामाला तात्पुरते बंद करण्यात यावे व वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्याचे निर्देश दिले. मुंजे चौकात उभारण्यात आलेले सेंट्रींग आणि बॅरिकेट्‌स काढण्यात यावे, असे निर्देश मेट्रो रेल्वेला दिले. यशवंत स्टेडियमकडे जाणारा तो मुख्य मार्ग असल्याने तो वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी सूचना महापौर नंदा जिचकार यांनी केली.
 
मॉरीस कॉलेजजवळ मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू आहे. तेही काम दोन ते तीन दिवस थांबविण्यात यावे, असे निर्देश महापौरांनी दिले. धंतोली पोलिस स्टेशन ते मेहाडिया चौक या ठिकाणी सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी समारोपाच्या दिवशी किमान पायी येणाऱ्यांसाठी तो रस्ता चालू करण्यात यावा, असे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले. यशवंत स्टेडियम समोरील मनपाचे अधिकृत वाहन पार्किंग़ समारोपाच्या दिवशी सकाळपासूनच  सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. समारोपीय कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी दीनानाथ हायस्कूल, होमगार्ड मैदान, न्यू इंग्लीश हायस्कूल, इंडियन जिमखाना या ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
पटवर्धन मैदान व पंचशील चौक या ठिकाणी स्टार बसेसचे पार्किंग असते. त्या दिवशी पटवर्धन मैदानातील ४० बसेस काढून त्या ठिकाणी व्हीआयपी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी आणि समारोपीय कार्यक्रमाच्या पाहुण्यांना घेऊन येणाऱ्या बसेस इंडियन जिमखाना येथे लावण्यात याव्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांना दिले.
 
यशवंत स्टेडियममधील अंतर्गत व बाह्य स्वच्छता ही तातडीने करण्यात यावी आणि स्टेडियमचे सर्व १२ ही दरवाजे खुले करण्यात यावे, त्या ठिकाणी काही डागडुजी करावयाची असल्यास तीही करावी, असे निर्देश महापौरांनी दिले. यशवंत स्टेडियम परिसरातील व स्टेडियमकडे जाणारे रस्त्यांवर असलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, असेही महापौर यावेळी बोलताना म्हणाल्या.
 
यावेळी बैठकीला धंतोली झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी यांच्यासह संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. 

 

 

महापालिकेद्वारे गांधीसागर तलाव येथे श्रमदान

- कर्मचारी व अधिकाऱ्यांचाही सहभाग
 
नागपूर,ता. २४ : नागपूर महानगरपालिकेद्वारे गांधीसागर तलाव येथे गुरूवारी (ता.२४) सकाळी ७ ते ९ या दरम्यान श्रमदान करण्यात आले. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचा यात विशेष सहभाग होता. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह आणि अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी संपूर्ण तलाव परिसराची पाहणी केली.
 
यावेळी त्यांच्यासमवेत धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नगरसेवक प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षला साबळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, धंतोली झोनचे प्रभारी सहायक आयुक्त राजू भिवगडे, माजी नगरसेवक मनोज साबळे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे गांधीसागर तलाव येथे स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याच्या कामाची झोननिहाय आखणी करण्यात आली असून प्रत्येक झोनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. तलावाच्या बाजूचा सर्व परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. तलावाच्या लगत असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटा, हे करताना तलावाचे सौंदर्य कायम राहील, याची विशेष काळजी घेण्यात यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
तलावाच्या लगत असलेल्या पायऱ्या आणि संरक्षक भिंत खचण्याच्या मार्गावर आहे. त्याची डागडुजी त्वरित करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तलावाच्या सभोवताल अवैधरित्या वाहने पार्किंग केली जातात.  अवैध पार्किंग हटविण्याचे निर्देशही आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
गांधीसागर तलावाच्या काठावर साचलेला गाळ दिसल्याने आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. हा गाळ हा तातडीने काढण्यात यावा, आवश्यक असल्यास उपकरणांचा वापर करा, नाहीतर मनुष्यबळाचा वापर करून गाळ काढण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार यांना दिले.
 
तलावालगत असलेल्या भाऊजी पागे उद्यानाची आयुक्तांनी यावेळी पाहणी केली. अनावश्यक असलेली झाडे किंवा जी झाडे पडलेली आहे ती तातडीने काढून टाकावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. पुढील सात दिवस हे स्वच्छता अभियान कायम ठेवावे असे निर्देशही आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. तलावाच्या सभोवताल असलेले अतिक्रमणही काढण्यात यावे, असे निर्देश वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
यावेळी रमन विज्ञान केंद्राजवळ नेहरूनगर झोन सभापती राजेश कराडे, धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे, लक्ष्मीनगर झोनचे उपअभियंता रवींद्र मुळे, भाऊजी पागे उद्यानाजवळ सतरंजीपुरा झोनचे सहायक आय़ुक्त प्रकाश वराडे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, नातिक चौक ते टाटा पारसी शाळेजवळ स्थावर विभागाचे आर.एस.भुते आणि विभागाचे कर्मचारी, टिळक पुतळ्याजवळ गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, विभागीय अधिकारी सुरेश खरे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. 

 

 

परिवहन समितीचा २५.०३ लाख शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सुपूर्द

मागील वर्षी केलेल्या आठ संकल्पांची पूर्ती : वीर माता, भगिनींसाठी मोफत प्रवास
 
नागपूर, ता. २४   :  नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या वतीने २४४.८२ कोटी उत्पन्नाचा, २४४.५७ कोटी खर्चाचा आणि २५.०३ लाख शिलकीचा अर्थसंकल्प सभापती बंटी कुकडे यांनी स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडे सादर केला.
 
सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ‘ब’चे उत्पन्न २४४.७१ कोटी अपेक्षित आहे. सुरुवातीची शिल्लक ११.२८ लाख धरून एकूण अपेक्षित उत्पन्न २४४.८२ कोटी राहील. त्यातील २४४.५७ कोटी खर्च होईल, असे अपेक्षित आहे.
 
अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार चालू आर्थिक वर्षात इथेनॉल इंधनावर संचालित ५५ ग्रीन बस, तीनही डिझेल बस ऑपरेटरच्या माध्यमातून २३६ डिझेल बस, १५० मिडी बस तसेच महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी स्वतंत्र तेजस्वीन मिडी बसेस संचालित करण्याचा नागपूर महानगरपालिकेचा मानस आहे. पर्यावरणपूरक धोरण राबविणे हा नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाचा मानस असून याअंतर्गत २५ बायोगॅस बसेस, ७० इलेक्ट्रिक बसेस अशा एकूण ५३६ बसेसे ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होत आहे.
 
वीर माता, भगिनींसाठी मोफत प्रवास
 
चालू आर्थिक वर्षात परिवहन समितीतर्फे अनेक नवीन आणि महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘मी जिजाऊ’ मोफत प्रवास सवलत योजनेअंतर्गत देशासाठी कर्तव्यावर तैनात असताना शहीद झालेल्या आणि मनपातील अग्निशमन व आणीबाणी विभागातील शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबातील शहीदांच्या वीर माता, वीर भगिनी आणि वीर कन्या यांना ‘तेजस्विनी बस तथा सर्वच शहर बस सेवेतील बस’ मध्ये मोफत बस पास उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यासाठी १५ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. बस थांब्यालगत वॉटर एटीएमची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, सौर ऊर्जेद्वारे विद्युत निर्मिती करून इलेक्ट्रिक बस चार्ज करण्यासाठी त्याचा उपयोग यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागामार्फत प्रमुख बस स्थानकावर व्हिल चेअरची उपलब्धता, बस स्थानकावर वेळापत्रक लावणे, जाहिरात कंत्राट देऊन उत्पन्न स्त्रोत वाढविणे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या थांब्यावर शेड नाही अशा ६०० थांब्यावर नावीन्यपूर्ण फलकाची निर्मिती करून थांब्यावरील बस पार्किंगची जागा राखीव करण्याकरिता नावीन्यपूर्ण रंगसंगतीचे पेंटिंग करण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
डेपोसाठी नवीन जागा
 
सध्या डिझेल बस ऑपरेटर्सकरिता असलेल्या डेपो व्यतिरिक्त शहराच्या पूर्व भागात वाठोडा येथे मनपाच्या १०.८० एकर जागेवर डिझेल बस डेपोकरिता जागा विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ग्रीन बस ऑपरेटरकरिता वाडी नाका येथे डेपोकरिता जागा विकसित करून देण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. खापरी नाका येथे इथेनॉल पंप उभारणी करण्या आली आहे.
 
आठ संकल्पांची पूर्ती
 
परिवहन समितीद्वारे प्रवाशांना कार्यक्षम सेवा पुरविणे व विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्याच्या दृष्टीने मागील वर्षी दहा संकल्प समितीने निश्चित केले होते. त्यातील आठ संकल्प पूर्णत्वास आल्याचा विश्वास सभापती बंटी कुकडे यांनी अर्थसंकल्पात केला आहे. ‘मागेल त्याला बस’ या तत्वावर ६५ नवीन मार्गावर नव्याने बस फेऱ्यांची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी योजनेअंतर्गत सवलत देण्याची अंमलबजावणीही करण्यात आली. ज्या दोन संकल्पाची पूर्ती अद्याप झाली नाही त्यामध्ये बस थांब्यालगत उपाहार गृहाची निर्मिती करणे, त्यासाठी बेरोजगार युवकांना काळजीवाहक म्हणून नेमणे आणि बस थांब्याची स्वच्छता, निगा व सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविणे आणि सार्वजनिक व खासगी सहभागातून टर्मिनल विकसित करणे ह्यांचा समावेश आहे. हा विषय एकत्रितरीत्या विभागीय प्रशासनाच्या अख्यत्यारीत प्रगतीपथावर आहे.
 
तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक
 
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी समितीतर्फे ०७१२-२२७७९०९९ हा टोल फ्री व ७५००००४६५ हा व्हॉटस्‌ ॲप क्रमांक जाहीर करण्यात आल्या होत्या. टोल फ्री क्रमांकावर १४४७६ सूचना व तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १३८८८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. व्हॉटस्‌ॲपवर एकूण ७७६ सूचना व तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६८६ चा निपटारा करण्यात आला.

 

 

लेटलतीफ कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही !

मनपा आयुक्तांनी केला धंतोली व धरमपेठ झोनचा केला आकस्मिक दौरा
 
नागपूर,ता.२३ : झोन कार्यालयाची वेळ १० वाजताची आहे. कार्यालयीन वेळा पाळायलाच हव्या. दहा वाजतानंतर जो कर्मचारी येईल, त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिला. बुधवारी (ता.२३) आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी धंतोली आणि धरमपेठ झोन कार्यालयाचा आकस्मिक दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते.
 
सकाळी दहा वाजता आयुक्त वीरेंद्र सिंह हे धंतोली कार्यालयात पोहचले. कुठलीही पूर्वसूचना नसताना आयुक्त झोन कार्यालयात आल्याने कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. आयुक्तांनी आल्याबरोबरच झोन कार्यलायचे दरवाजे बंद केले. आतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हालचाल वही तपासली. त्यावेळी विभागीय उपअभियंता एम.के.सिंग हे अनुपस्थित असल्याने आयुक्तांनी संताप व्यक्त करीत त्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. दरवाज्याचा बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात यावी आणि त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे प्रस्ताव सादर करण्यात यावे, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
झोनमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम लागू करण्यात यावी. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती ही बायोमॅट्रिक पद्धतीने करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. दहा नंतर कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना यानंतर निलंबित करण्यात येईल, अशी तंबीही आयुक्तांनी यावेळी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, सहायक अधीक्षक श्रीकांत वैद्य उपस्थित होते.   
 
धरमपेठ झोनमध्येही निलंबनाचे आदेश
 
धरमपेठ झोन कार्यालयात आयुक्त वीरेंद्र सिंह १०.१५ वाजता पोहोचले. तेथेही त्यांना कर्मचाऱ्यांची लेटलतिफी निदर्शनास आली. यावर त्यांनी संताप व्यक्त केला. असे जर नेहमीच होत असेल तर हे योग्य नाही. यापूर्वीही समज दिल्यानंतर असेच होत असेल तर आता गय करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी कर्तव्यावर वेळेवर न पोहोचणाऱ्या धरमपेठ झोनमधील चार आणि धंतोली झोनमधील एक अशा पाच जणांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
 
निलंबित केलेल्या कर्मचा-यांची नावे
 
१)               श्री. मनोज सिंग - उपअभियंता (धंतोली झोन क्र.४)
 
२)               श्री.एम.जी.भोयर - जलप्रदाय विभाग (सध्या कार्यरत धरमपेठ झोन, प्रकाश विभाग)
 
३)               श्री.ए.एस.शेख - क्षेत्र कर्मचारी फायलेरिया विभाग (सध्या कार्यरत धरमपेठ झोन, प्रकाश विभाग)
 
४)               श्री.नितिन झाडे - स्थापत्य अभियांत्रिकी लोककर्म विभाग (सध्या कार्यरत धरमपेठ झोन)
 
५)               श्री.अनिल निंबोरकर - सुतार, लोककर्म विभाग (सध्या कार्यरत धरमपेठ झोन )

 

 

नाईक तलाव सौंदर्यीकरणातील बाधितांना महापौरांच्या हस्ते घरकुल वाटप

नारा-नारी येथे पुनर्वसन : ६१ जणांना दिले घरकुल वाटप पत्र
 
नागपूर,ता. २३ : तेलीपुरा-तांडापेठ येथील नाईक तलाव सौंदर्यीकरणात जी घरे जात आहेत त्या लोकांचे व अन्य विकास प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन नारा-नारी येथे करण्यात आले आहे. तेथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचे वाटपपत्र बुधवारी (ता. २३) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते महापौर कक्षात नागरिकांना वाटप करण्यात आले.
 
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत शहरी गरीब नागरिकांना मुलभूत सुविधा या योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पानुसार नारा नारी या वस्तीत सदर घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी एकूण २५ चौ.मी. (२६९ चौ. फूट) चटई क्षेत्राच्या बांधकामात एक बैठक खोली, एक शयन कक्ष, एका स्वयंपाकाच्या खोलीसह शौचालय व स्नानगृह इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. सदर योजनेअंतर्गत ५० टक्के वाटा केंद्र शासन, ३० टक्के वाटा राज्य शासन तर उर्वरीत वाटा महानगरपालिका व लाभार्थ्याला उचलावा लागतो.
 
बुधवारी महापौर कक्षात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नागपूर महानगरपालिकेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने घरकुल वाटपपत्र प्रदान करण्यात आले. नाईक तलाव परिसरातील विकास कामासाठी बाधित झालल्या ७१ कुटुंबांपैकी ४० पात्र लाभार्थ्यांना तसेच इंदिरा नगर नाला परिसरातील दोन, संजय गांधी नगर नाला परिसरातील आठ, भीमरत्न नगर परिसरातील १० व बोरियापुरा येथील एक अशा एकूण ६१ लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे उपअभियंता आर.जी. राहाटे, उपअभियंता पंकज पाराशर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात लक्ष्मी वासुदेव खंडारे, मोगरा मुरली साहू, पंढरी कृष्णा पिंपरीकर, राधाबाई चंद्रशेखर सावरकर, अन्नपूर्णा अन्नाजी चांदेकर, लिला पंढरी हेडाऊ, दामू महालू सोनकुसरे, नैनाबाई सिन्हा, कलाबाई खापेकर, मालाबाई बन्सोड, आशा कुशाल कांबळे, कल्पना प्रकाश ढवळे यांना घरकुल वाटपपत्र देण्यात आले.

 

 

मनपा आयुक्तांनी केली नदी स्वच्छता अभियानाची पाहणी

नागपूर,ता.२३ : नागपूर महानगरपालिकेद्वारे लोकसहभागातून ७ मे पासून नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. अभियानादरम्यान सुरू असलल्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बुधवारी (ता.२३) केली. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
शहरातील तिन्ही नद्या स्वच्छ करण्याचे काम महापालिकेद्वारे युद्धपातळीवर सुरू आहे. पोरा नदी स्वच्छता अभियानाचे काम एअरपोर्ट सेंटर पॉईंट, बेसा रोड, नरसाळा आणि नागनदी स्वच्छता अभियानाचे काम लोकांच्या शाळेजवळ सुरू आहे. आतापर्यंत तिन्ही नद्या मिळून १२ किमी स्वच्छता करण्यात आली आहे. तिन्ही नदीतून एकूण २६४१२ घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे.
 
नदी स्वच्छता अभियानाबाबत आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी समाधान व्यक्त केले. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त राजेश कराडे, हनुमाननगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

 

 

नागपूर महानगरपालिका आणि युरोपियन युनियनमध्ये भागीदारी करार

शाश्वत शहरी विकास, स्मार्ट सिटी मिशनच्या गरजेसंदर्भात कृती आराखडा तयार करणार
 
नागपूर, ता. २३ : नागपूर महानगरपालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये बुधवारी (ता. २३) इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार झाला. नागपूर (भारत) आणि कार्लस्रू (जर्मनी) या शहरांच्या शहरी विकासातील प्राथमिकतांमधील सहकार्याचे क्षेत्र ओळखण्यासाठी आणि विस्तारासाठी हा भागीदारी करार करण्यात आला आहे. या करारावर नागपूरच्या वतीने महापौर नंदा जिचकार, महानगरपालिका आयुक्त वीरेंद्र सिंह आणि कार्लस्रूच्या वतीने आयूसीचे भारतातील कार्यक्रम संचालक पियर रॉबर्टो रेमिटा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. 
                
यावेळी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर उपस्थित होते. 
 
भारत या कार्यक्रमांतर्गत नागपूर आणि कार्लस्रू हे संयुक्तपणे विशेषत: शाश्वत शहरी विकास आणि भारतातील स्मार्ट सिटी मिशनच्या गरजेसंदर्भात स्थानिक कृती योजना तयार करणार आहेत. या करारावर स्वाक्षरी करण्याआधी आय.यू.सी.चे भारताचे प्रतिनिधी आशीष वर्मा (शाश्वत विकास तज्ज्ञ) यांनी प्रकल्पाबद्दल सादरीकरणाद्वारे थोडक्यात माहिती दिली. सदर कार्यक्रमाचा उद्देश, अंमलबजावणीची प्रक्रिया आणि शहरांमध्ये असलेल्या समस्यांची माहिती दिली. नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी नागपूर शहर, संधी आणि आव्हाने याबाबत थोडक्यात माहिती दिली. आययूसी कार्यक्रम नागपूर शहराला ज्ञान विनिमय योजनेच्या दृष्टीने कशी मदत करतो हे सांगताना स्मार्ट सिटी नियोजनाची अंमलबजावणी याबाबत महत्त्वाचे मुद्दे विषद केले. शहरी विकास आणि नगरपालिका सेवांना एकत्रित करण्यास प्राधान्य, कार्बनचा कमी उपयोग आणि शहरी नवीनीकरण, शाश्वत गतीशीलता याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. शहरी विकासाच्या प्राथमिकतांना अंमलात आणण्यासाठी त्यांना सर्वोत्तम धोरण ओळखण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी आय.यू.सी-भारत संघ आणि कार्लस्रू शहराने कार्य करावे, अशी विनंती केली. 
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह म्हणाले, नागपूर शहरातील शाश्वत शहरी विकासाशी संबंधित मुद्द्यांबद्दल नागपूर शहर जाणून घेण्यासाठी व युरोपीय शहरांमध्ये काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या भागीदारीमुळे नागपूर आणि कार्लस्रू हे शाश्वत शहरी विकासाशी संबंधित विषयांवर एकत्रितपणे काम करतील. यामध्ये शहरी गतिशीलता, कमी कार्बन उत्सर्जन आणि शहरी नवीन उपक्रम तसेच शहरी विकास आणि नगरपालिका सेवांचे एकीकरण यांचा समावेश असेल. कार्लस्रू शहर स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. त्यांच्या गतिशीलता योजनेचे मॉडेल खूप उत्साहवर्धक आहे. नागपूर आणि कार्लस्रू यांच्यातील ज्ञानविनिमय सक्षम होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  
 
महापौर नंदा जिचकार यांनीदेखिल या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. जागतिक हवामानातील बदल आणि शाश्वत शहरी विकासाच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाकांक्षी पद्धतीने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, हवामान बदलाचा प्रतिकुल परिणाम नागरिकांच्या जीवनावर होऊ लागला आहे. बदललेले वातावरण आणि नैसर्गिक पर्यावरणाचा निकृष्ट दर्जा यासाह आता हवामान बदलाच्या प्रतिकुल परिणामांवर मात करण्यासाठी ठळक आणि अभिनव कृती करणे कार्लस्रूच्या सहकार्याने आय.यू.सी. कार्यक्रमाद्वारे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात नागपुरातील भावी पिढीने चांगले जीवन जगावे अशी आपली इच्छा असून या कार्यक्रमासाठी आपण पूर्ण सहकार्य करू, असेही त्यांनी म्हटले.
 
काय आहे आय.यू.सी. कार्यक्रम?
 
आय.यू.सी. कार्यक्रम भारत, पूर्व आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकामधील युरोपीयन युनियनमधील शहरे आणि भागीदार शहरांमधील शाश्वत शहरी विकासावर सहकार्य वाढवितो. कार्यक्रमाद्वारे शाश्वत शहरी विकासाच्या समस्यांना हाताळण्यासाठी नवा दृष्टीकोन जोडण्यात येईल. दोन्ही शहरांचे प्रतिनिधी विनिमय भेटीस उपस्थित राहतील आणि शहरांच्या शाश्वत नागरी विकासास चालना देण्यासाठी स्थानिक कृती योजना विकसित करतील.

 

 

जैवविविधतेचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी

महापौर नंदा जिचकार : जैवविविधता दिवसानिमित्त सातपुडा वनस्पती उद्यानाला दिली भेट, औषधी वनस्पतींचे केले निरीक्षण
 
नागपूर, ता. २२ :   निसर्गातील प्रत्येक वस्तू एकमेकांवर अवलंबून आहे. ही साखळी तुटली तर निसर्गाचा समतोल बिघडेल. बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आपल्या जीवनावर पडला आहे. त्यामुळे जैवविविधतेकडे आपण कमालीचे दुर्लक्ष करीत आहोत. ह्या नैसर्गिक संपदेचे जतन हे आपले कर्तव्य आहे. जैवविविधतचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे उद्‌गार महापौर नंदा जिचकार यांनी काढले.
 
जागतिक जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतील जैवविविधता समितीने स्थानिक सातपुडा वनस्पती उद्यान येथे नगरसेवकांच्या दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यादरम्यान संवाद साधनाता महापौर नंदा जिचकार बोलत होत्या.
 
यावेळी जैवविविधता समितीच्या अध्यक्षा दिव्या धुरडे, सदस्य निशांत गांधी, धंतोली झोनच्या सभापती विशाखा बांते, हनुमाननगर झोनच्या सभापती रूपाली ठाकूर, ज्येष्ठ नगरसेविका रूपा राय, चेतना टांक, मंगला खेकरे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्याविभागाचे प्रमुख डॉ. रमाकांत गजभिये, सातपुडा वनस्पती उद्यानाचे प्रभारी अधिकारी डॉ. व्ही. यू. राऊत, वरिष्ठ संशोधन सहायक संजीव परहाटे, तेलंगखेडी उद्यानाचे पी. एन. भुते यांची उपस्थिती होती.
 
महापौर नंदा जिचकार व अन्य सदस्यांनी यावेळी ६५ एकर इतक्या मोठ्या परिसरात पसरलेल्या उद्यानातील विविध ठिकाणांना भेट दिली. आमराईतील विविध प्रजातींची झाडे, हर्बल गार्डनमधील शतावरी, अनंतमूळ, गवती चहा, हड्डीजोड वनस्पती, अमलतास, सिट्रोनिला, काळी हळद, अमृतवेल, लेंडीपिवळी आदी औषधी वनस्पती, विविध प्रकारच्या तुळशी, ग्रीन हाऊस मधील वनस्पतींबद्दल सविस्तर माहिती घेतली. या सर्व वनस्पतींच्या उपयोगाबाबत प्रा. रमाकांत गजभिये यांनी माहिती दिली.
 
सातपुडा वनस्पती उद्यान म्हणजे नागपूरकरांसाठी ठेवा आहे. ह्याचे जतन झाले पाहिजे. विविध शाळांतील विद्यार्थ्यांना येथे आणून या सर्व वनस्पतींबद्दल माहिती दिल्यास भावी पिढीला या नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व पटेल, त्याचे जतन करण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होईल, असे महापौर नंदा जिचकार यावेळी बोलताना म्हणाल्या. जैवविविधता समितीच्या माध्यमातून येथे महानगरपालिकेतील संपूर्ण पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. या वनस्पतींबद्दल आणि उद्यानातील जैवविविधतेबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न राहील, असा जैवविविधता समितीच्या अध्यक्ष दिव्या धुरडे यांनी सांगितले. महाराजबाग येथील नर्सरीत अशा प्रकारच्या वनस्पती उपलब्ध असल्याची माहिती डॉ. रमाकांत गजभिये यांनी दिली. तेलंगखेडी उद्यानातही अशाच वनस्पती असून त्या उद्यानाचे सौंदर्यीकरण करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 

 

पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती वर उपाययोजना म्हणून प्रशासन यंत्रणा सज्ज ठेवा : महापौर

मान्सूनपूर्व तयारीचा घेतला आढावा
 
दहाही झोनमध्ये स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टीम उभारणार !
 
नागपूर,ता. २२ : पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती वर उपाययोजना म्हणून महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. मंगळवार (ता.२२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत मान्सूनपूर्व तयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
यावेळी आयुक्त विरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, सी.जी. धकाते, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके प्रामुख्याने उपस्थित होते.
 
प्रशासनाने केलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा महापौरांनी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे आणि मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यामार्फत घेतला. महापालिकेद्वारे नैसर्गिक पूर प्रतिबंधक आराखडा १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. झोनस्तरावर एक नियंत्रण कक्ष स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टीम दोन दिवसात उभारण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. दहाही झोनमधील नियंत्रण कक्षातील आपतकालीन मोबाईल क्रमांकांची यादी मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला देण्यात यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले. नियंत्रण कक्षाला अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्या पथकाने आकस्मिक भेट द्यावी, त्याठिकाणी गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
रस्त्यांवरील झाडांच्या वाढलेल्या फांद्याची छाटणी करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित विभागाला दिले. झोनमध्ये असलेले पाणी उपसण्याचे पंप, मशीन्स व पावसाळ्यात लागणारे उपकरणे दुरूस्त करून ठेवण्याचे व झोननिहाय उपकरणे, पंप, मशीन्स याची यादी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावी, असे आदेश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. जीर्ण झालेल्या इमारतींची यादी तयार करून त्या इमारतींची माहिती झोन सहायक आयुक्ताला द्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
 
शहरातील ज्या भागात पावसाचे पाणी शिरते, ते भाग ओळखून त्या ठिकाणी असलेले रहिवासी व अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात यावी, गरज पडल्यास त्यांना सुरक्षा स्थळी पोहचविण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी केली. प्रत्येक झोनमधील एखादे सुरक्षा स्थळ सहायक आयुक्तांनी शोधून ठेवावे, असेही निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
गडरलाईन स्वच्छ करण्यात यावी, गडर उघडे असतील तर त्यावर पावसाळ्यापूर्वी झाकणे लावण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिले. दर पावसाळ्यात नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचते त्याची पर्यायी सोय प्रशासनाने काय केली आहे, याचा आढावा महापौरांनी घेतला. त्यावर नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचल्यास तो रस्ता बंद करण्यात यावा, पर्यायी रस्त्याचा वापर करण्याची सूचना देणारा फलक त्या ठिकाणी लावण्याचे आदेश आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी दिले. अशाच प्रकारच्या घटना ज्या ठिकाणी घडत असेल त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. पावसामुळे रस्त्यावर खड्डे तयार होतात. जर पाऊस सुरू असेल तर तात्पुरते माती टाकून खड्डे बुजविण्यात यावे, पाऊस संपल्यानंतर कायमस्वरूपी खड्डे बुजविण्यात यावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिले.
 
बैठकीला उपअभियंता प्रदीप राजगिरे, शकील नियाजी, श्री.खोत, सर्व झोन सहायक आयुक्त, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

क्रेझी कैसल घटनेतील दोषीवर कारवाई करू : नंदा जिचकार

अंबाझरी येथील क्रेझी कॅसल येथे झालेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. घटनेची संपूर्ण शहनिशा करून जो दोषी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. क्रेझी कॅसलची लीज संपली आहे. त्यांना जागा सोडण्याची नोटीस बजाविण्यात असून त्यांनी जागा रिकामी केली नाही, क्रेझी कॅसलवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.

 

 

नवीन ड्रेनेज लाईन निर्माण कार्याचे भूमिपूजन

धरमपेठ आंबेडकर नगर वसाहतीत कार्यक्रम : महापौर, आमदार देशमुखांची उपस्थिती
 
नागपूर, ता. १९ : नागपूर महानगरपालिका प्रभाग क्र. १५ धरमपेठ आंबेडकर नगर वसाहतीतील जुनी ड्रेनेज लाईन बदलून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (ता. १९) आंबेडकर नगर बौद्ध विहार येथे महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास गजघाटे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधाकर देशमुख, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, नगरसेविका रूपा राय, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, निशांत गांधी, प्रभाग अध्यक्ष अमर पारधी उपस्थित होते.
 
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर शहरातील अनेक ड्रेनेज लाईन जुन्या झाल्या आहेत. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आता आवश्यक त्या ठिकाणच्या ड्रेनेज लाईन बदलण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर शहराला नुकताच स्वच्छ सर्वेक्षणमध्ये राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाला. लोकांची मानसिकता आता बदलत आहे. नागपूर शहर स्वच्छ, सुंदर करण्यात लोकसहभाग आवश्यक आहे. पुढील वर्षी स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर प्रथम क्रमांकावर येण्यासाठी आता पुन्हा एकदा सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
आमदार सुधाकर देशमुख म्हणाले, नागपूर शहराची हवा स्वच्छ आहे. नागपूर शहर हिरवे आहे. लोकांची साथ मिळाली तर स्वच्छ पुरस्कारात नागपूर देशात अव्वल येईल, यात शंका नाही.
 
कार्यक्रमाला प्रमोद थूल, प्रसन्ना राऊत, शैलेंद्र वाजपेयी, स्मृती राघव, श्रीमती पाटील, हंसराज सूर्यवंशी, संजय कश्यप, मनोज हिरणवार, हरिभाऊ फाटक, अनिल जैसवाल, ॲड. प्रकाश दुर्गे, स्वप्नील मसराम, महेश रामडोहकर, योगेश सोनकर्रे, गुड्डू गुप्ता, राजेश कनोजिया, श्यामलता नायडू, किशोर कनोजिया, अनिल गोरे, श्रीमती भोयर उपस्थित होते.

 

 

पाणी व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा करा : कुकरेजा

स्थायी समिती सभापती , आयुक्तांनी घेतला आढावा : डीआरएच्या कार्यप्रणालीवर ओढले ताशेरे
 
नागपूर, ता. १८ :  नागपुरात पाच लाख ३२ हजार मालमत्ता आहेत. त्यानुसार पाणी कनेक्शनही याच तुलनेत असायला हवे. कर विभागासोबत जलप्रदाय विभागाने समन्वय साधून तातडीने नवीन कनेक्शन द्यावे, ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक लावावे, चोरी गेलेल्या मीटरबाबत एनईएसएलने तातडीने निर्णय घ्यावा आणि नव्याने मीटर द्यावे आणि चालू आर्थिक वर्षात पाणी बिल वसुलीपोटी ३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
 
डीआरए नामक कन्सल्टन्सीने सादर केलेला प्रकल्प राबविण्याचे कार्य ओसीडब्ल्यू करीत आहे. मात्र डीआरएच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत स्थायी समिती सभापतींनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भातही एनईएसएलने तातडीने निर्णय घ्यावा, असेही निर्देश सभापती कुकरेजा यांनी दिले.
 
नागपूर शहरात होणारा पाणीपुरवठा, नागरिकांच्या तक्रारी, थकीत बिलाची वसुली, अवैध नळ कनेक्शनचे नियमितीकरण, अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती आदी विषयांवर सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात विशेष बैठक पार पडली. बैठकीला मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नगरसेवक सुनील हिरणवार, मनोज सांगोळे, शेषराव गोतमारे, जुल्फेकार भुट्टो, राजेश मानकर, नगरसेविका सोनाली कडू, मंगला खेकरे, अर्चना पाठक, विद्या कन्हेरे, मनिषा अतकरे, अभिरुची राजगिरे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर, लेखाधिकारी शिंदे, ओसीडब्ल्यूचे सर्वश्री मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय, उपसंचालक (ग्राहक सेवा) राहुल कुलकर्णी, उपसंचालक राजेश कालरा उपस्थित होते.
 
सध्या नागपुरात तीन लाख ३० हजार एकूण नळ कनेक्शन असून त्यापैकी दोन लाख ४० हजार ग्राहकांच्या मीटरची रीडींग घेण्यात येते. ५३ हजार ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात येते तर २२ हजार ग्राहकांना फ्लॅट बिल पाठविण्यात येते. थकबाकीदारांमध्ये ५० हजार ते एक लाख थकबाकी असलेले २२७६ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सुमारे १५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एक लाखांवरील थकबाकीदार ७९३ आहेत. पाच हजारांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या एक लाख २४ हजार आहे. एक लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या २२७६ पैकी १८०० ग्राहकांची नळ जोडणी कापली असून अन्य ग्राहकांना नोटीस देण्यात आले असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
ज्या ग्राहकांचे मीटर चोरीला गेले आहे, अशा ग्राहकांकडे पुढील १५ दिवसांत मीटर लागायला हवे. यासाठी ग्राहकांना प्रथम नोटीस देण्यात यावी. १५ दिवसांत ग्राहकांनी मीटर बदलवावे, अन्यथा मनपा ते मीटर बदलवेल. मीटरची किमत सहा महिन्यांत बिलामधून टप्प्याटप्प्याने वसूल केली जाईल, असे निर्देश सभापती कुकरेजा यांनी दिले. यावर झालेल्या चर्चेनंतर ग्राहकांनी ५० टक्के रक्कम द्यावी, ५० टक्के रक्कम ओसीडब्ल्यूने भरावी, अशी सूचना काही सदस्यांनी दिली. चर्चेअंती हा विषय निर्णय घेण्यासाठी एनईएसएलकडे पाठविण्याचे निर्देश सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. जुन्या बिलाच्या तडजोडीचा निर्णय घेण्याचा विषयही एनईएसएलकडे वर्ग करण्यात आला. अनेक पाणी पुरवठा पाईपलाईनवर सीमेंट रस्ते तयार झाले आहेत. यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत आपण स्वत: लक्ष घालू, असे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सांगितले.
 
पुढील बैठकीपासून ओसीडब्ल्यूने वसुलीचे महिनानिहाय विवरण सादर करावे, असेही निर्देश स्थायी समिती सभापती कुकरेजा यांनी दिले. बैठकीला ओसीडब्ल्यूचे डेलिगेटस्‌ व अन्य संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

'स्वच्छ सर्वेक्षण २०१८' चे पुरस्कार जाहीर

नागपूर शहराला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार 
 
नागपूर, ता. १६ : 'स्वच्छ सर्वेक्षण २०१८' चे पुरस्कार आज (ता. १६) नवी दिल्लीत जाहीर करण्यात आले. नागपूर हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले आहे.
 
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी ह्यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्र हे सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील एकूण नऊ शहरांना पुरस्कार मिळाले असून सहा राष्ट्रीय स्तरावरचे तर तीन विभागीय स्तरावरचे पुरस्कार आहेत. राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पुरस्कारामध्ये नागपूर शहराचा समावेश आहे.
 
नागपूरच्या महापौर नंदा जिचकार आणि तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या नेतृत्वात नागपूर शहराने ही कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. तत्कालीन आयुक्त अश्विन मुदगल यांनी शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण चमू कामाला लावली होती. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षणा संदर्भात झोन निहाय बैठका घेऊन कृती आराखडा प्रत्यक्षात उत्तरविला. स्वच्छ सर्वेक्षणात कुठेही कमी राहु नये यासाठी म्हापैर नंदा जिचकार, तत्कालीन मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी आणि अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवकांनी वस्त्यावस्त्यामध्ये मध्ये दौरे करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. स्वच्छ्ता अम्बेसडरची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात स्वच्छ्ता सर्वेक्षणाची माहिती पोचविली.
 
लोकसहभागासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागपुरकरांनीही जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला. लोकप्रतिनिधी, मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छ्ता दूत आदीच्या सामूहिक प्रयत्नातून नागपूर शहराने ही यशश्री खेचून आणली. स्वच्छता अम्बेसेडर डॉ. चंद्रशेखर मेश्राम, आरजे निकेता साने, हास्य कवि मधुप पांडेय, डॉ. अमित समर्थ, कौस्तभ चैटर्जी यानीही जनतेचे आभार मानले आहे.
 
जनतेचे आभार : महापौर नंदा जिचकार
नागपूर शहराने स्वच्छ सर्वेक्षणात मारलेली मुसंडी हे सामूहिक प्रयत्नाचे फलित आहे. पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानासोबतच जनतेने या सर्वेक्षणात जो भरभरून प्रतिसाद दिला, त्याबदल जनता आणि सर्वांचे महापौर या नात्याने मी आभार मानते आणि सर्व नागपूरकरांचे अभिनंदन करते.
 
सामूहिक प्रयत्नाचे यश : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल
नागपूरने स्वच्छ्ता सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवर मिळविलेले यश हे सामूहिक प्रयत्नाचे आणि प्रामाणिक कामगिरीचे फलित आहे. मनपातील अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगारांनी खरच प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. नागरिकांमध्ये जाण्यास नगरसेवकांनी सहकार्य केले. लोकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केले. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो.
 
नागपूरकरांचे अभिनंदन : आयुक्त वीरेंद्र सिंह
स्वच्छता सर्वेक्षणात बाजी मारलयबद्दल नागपूरांसह सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. यापुढेही अशीच सामूहिक कामगिरी करून सर्व क्षेत्रात यश प्रप्त करू.
 
महापौर आणि आयुक्तांच्या नेतृत्वाने दिले यश : स्वच्छता अम्बेसडर कौस्तभ चैटर्जी
सन २०१७-१८ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणाला महापौर नंदा जिचकार आणि तत्कालीन आयुक्त अश्विन मुदगल यांच्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने गती दिली. या दोघांच्याही काम करण्याच्या पद्धतीने अशिकारी, कर्मचारी आणि अभियानात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाच्या स्वयंसेवकांना प्रोत्साहन मिळाले. काम करण्याची ऊर्जा मिळाली आणि यामुळेच स्वच्छता सर्वेक्षण लोकांपर्यंत पोचले. या दोन्ही नेतृत्वाचे आणि सर्व संबंधितांचे मी अभिनंदन करतो.

 

 

सुदामपुरी, भांडेप्लॉट मधील पाणी समस्येवर तीन दिवसांत तोडगा काढा

महापौर, आयुक्तांचे निर्देश : विरोधी पक्ष नेत्यांसह ऐकल्या समस्या
 
नागपूर, ता. १६ :  प्रभाग क्र २७ मधील सुदामपुरी, भांडे प्लॉट परिसरातील ज्या भागात पाण्याचा वेग कमी आहे तेथे पाण्याचा वेग वाढवा आणि तीन दिवसांत आवश्यक त्या उपाययोजना करून नियमित पाणी द्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
सुदामपुरी परिसरातील काही भागात अनेक दिवसांपासून पाणी नाही. पाणी आले तर त्याचा फोर्स कमी असतो. कमी वेळ पाणी पुरवठा असतो, टँकर नियमित येत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि नगरसेविका दिव्या धुरडे यांच्या विनंतीवरून महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, झोन सभापती रिता मुळे, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, माजी नगरसेविका ताराबाई नखाते, ओसीडब्ल्यूचे राजेश कालरा उपस्थित होते.
 
यावेळी नागरिकांनी महापौर व आयुक्तांसमोर पाण्याच्या समस्या मांडल्या. महापौरांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना या समस्येवर आतापर्यंत काय उपाय केले, याची माहिती घेतली. परिसरात पाण्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा आणि तीन दिवसांत येथील पाणीपुरवठा सुरळीत करा, असे निर्देश महापौरांनी दिले.
 
यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी एनआयडी कॉम्प्लेक्स, आयुर्वेदिक कॉलनी, भांडे प्लॉट आदी परिसरातही पाणी समस्या असल्याची बाबत लक्षात आणून दिली. यावेळी एनआयटी कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी महापौर व आयुक्तांना निवेदनही सादर केले.
 
यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
 

 

पाच हजारांवर गप्पी मासे पाण्यात सोडले
 
डेंग्यू दिवस : हिवताप व हत्तीरोगविभागातर्फे दहाही झोनमध्ये प्रभातफेरी
 
नागपूर, ता. १६ :  राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये ‘गप्पीमासे वितरण काढण्यात आली. या दरम्यान शहरभरात निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सुमारे पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.
 
दहाही झोनअंतर्गत काढण्यात आलेल्या प्रभातफेरीमध्ये स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेविका रेखा साकोरे, वनिता दांडेकर, रूपा राय, शीतल कामडे, जयश्री वाडीभस्मे, दिव्या धुरडे, झिशान मुमताज अंसारी, आशा ऊईके, सैय्यदा बेगम, कांता रारोकर, भावना संतोष लोणारे, मंगला योगेश लांजेवार, नगरसेवक सुनील हिरणवार, मनोज सांगोळे, सतीश होले, संजय चावरे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, राजू वराटे, विजय काळे सहभागी झाले होते.
 
प्रभातफेरीच्या प्रारंभी उपस्थित नागरिकांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्याबाबतची शपथ घेली. प्रभातफेरीचे आयोजन  लक्ष्मीनगर झोनमध्ये सोमलवाडा रुग्णालयातून, धरमपेठ झोनमध्ये रामदासपेठ येथून, हनुमान नगर झोनमध्ये झोन कार्यालयातून, धंतोली झोनमध्ये पार्वतीनगर येथून, नेहरूनगर झोनमध्ये नवीन नंदनवन पाण्याच्या टाकीजवळून, गांधीबाग झोनमध्ये मोमीनपुरा येथून, सतरंजीपुरा झोनमध्ये मेहंदीबाग येथून, लकडगंज झोनमध्ये वर्धमाननगर येथून, आशीनगर झोनमध्ये रिपब्लिकन नगर येथून तर मंगळवारी झोनमध्ये जरीपटका येथून प्रभातफेरी करण्यात आले होते. दरम्यान नागरिकांना आरोग्य शिक्षण व कीटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान पत्रके वाटून, स्टीकर, पोस्टर लावून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर गप्पीमासे वाटप कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक झोनमध्ये करण्यात आले होते.
 
पाच हजारांवर मासे वाटप
 
प्रभातफेरीदरम्यान सर्व झोनमधून एकूण ३१०० घरांना भेटी देण्यात आल्या. या भेटीत कुलरमध्ये ३८३०, निरुपयोगी विहिरींमध्ये २७, टाक्यांमध्ये ८१९, मातीच्या भांड्यांमध्ये १५५, कारंज्यांमध्ये सात, मोठ्या नाल्यांमध्ये सात, लहान नाल्यांमध्ये नऊ, तळघरांमध्ये पाच, रिकाम्या भूखंडांवर तीन, बांधकामाच्या स्थळी असलेल्या लिफ्टच्या खड्ड्यांमध्ये तीन, वेगवेगळ्या प्रकारच्या खड्ड्यांमध्ये १२ आणि अन्य ठिकाणी २०७ असे एकंदर पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.

 

 

अतकर ले-आऊटमधील रस्त्याचे भूमिपूजन

नागपूर, ता. १५ :  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रभाग ३० मधील अतकर ले-आऊटमधल रस्त्याचे भूमिपूजन प्रभागाचे नगरसेवक व क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्या हस्ते पार पडले.
 
यावेळी प्रभाग ३० चे महामंत्री छोटे साहाब खान, युवा मोर्चाचे सैय्यद जाकीर अली, भाजप अल्पसंख्यांक  सेलचे बाबा सैफुद्दीन, युनूस भाई, अलीम भाई, धरती शेख, नागरिक नागराण भुते, मुश्ताक भाई, बाबा भाई, ईकबाल भाई, अदनान भाई उपस्थित होते.

 

 

डेंग्यू दिवसानिमित्त १६ ला गप्पी मासे वितरण रॅली

हिवताप व हत्तीरोग विभागाचे आयोजन : गप्पीमाशांचे नि:शुल्क वाटप
 
नागपूर, ता. १५ :  राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये ‘गप्पीमासे वितरण रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गप्पी माशांचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे.
 
सदर रॅली कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये काढण्यात येणार आहे. प्रभातफेरीच्या माध्यमातून लोकांमध्ये हिवताप, डेंग्यू व इतर कीटकजन्य आजाराबाबत लोकांचा सहभाग घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. वर्दळीच्या ठिकाणी नि:शुल्क गप्पीमासे वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता प्रभातफेरी निघेल. लक्ष्मीनगर झोनमध्ये सोमलवाडा रुग्णालयातून, धरमपेठ झोनमध्ये रामदासपेठ येथून, हनुमान नगर झोनमध्ये झोन कार्यालयातून, धंतोली झोनमध्ये पार्वतीनगर येथून, नेहरूनगर झोनमध्ये नवीन नंदनवन पाण्याच्या टाकीजवळून, गांधीबाग झोनमध्ये मोमीनपुरा येथून, सतरंजीपुरा झोनमध्ये मेहंदीबाग येथून, लकडगंज झोनमध्ये वर्धमाननगर येथून, आशीनगर झोनमध्ये रिपब्लिकन नगर येथून तर मंगळवारी झोनमध्ये जरीपटका येथून प्रभातफेरी निघेल, अशी माहिती हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली.

 

 

नदी स्वच्छता अभियानाला गती

आतापर्यंत काढला आठ हजार घनमीटर गाळ
 
नागपूर, ता.१४ :   नागपूर महानगरपालिकेच्या ७ मे पासुन सुरू झालेल्या नदी स्वच्छता अभियाने गती धरली आहे. १३ मे पर्यंत तीनही नदीतून आठ हजार घनमीटर गाळ काढण्यात आलेला आहे.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे केंद्रीय नदी व पर्यावरण स्वच्छता योजनेअंतर्गत ७ मे ते २० जून या काळात नागपुरातील नाग, पिवळी, पोरा नदी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. विविध झोनमध्ये येणाऱ्या नदी स्वच्छतेच्या या कार्याने गती धरली असून आतापर्यंत आठ हजार घनमीटर गाळ नदीतून काढण्यात आलेला आहे. तीनही नद्या मिळून २८४४ मीटर लांब नदी स्वच्छ करण्यात आली आहे.
 
या अभियानामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, नागपूर मेट्रो रेल्वे, ओसीडब्ल्यू, तसेच शहरातील उद्योग समूह, संस्था सहभाग नोंदवित आहे. या अभियानात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

 

मुलांना घड़विणाऱ्या मातांचा सत्कार आणि गीतांची मेजवानी

मातृ दिनानिमित्त मनपाचे आयोजन : नागपूरकरांची भरगच्च उपस्थिती
 
नागपूर, ता. १३ : विपरीत परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या, आवड़ीला करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्याच प्रोत्साहनाने ज्यांची मुले विविध क्षेत्रात यशाच्या पताका फड़कवित आहेत, अशा मातांचा ह्रद्य सत्कार आज नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला.
 
निमित्त होते नागपूर महानगरपालिकेतर्फे कविवर्य सुरेश भट सभागृहात मातृदिनानिमित्त आयोजित "अशी असते आई" या कार्यक्रमाचे. 
 
तमन्ना इवेंट यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, उपायुक्त रवींद्र देवतळे, तमन्ना इवेंट्सचे आसीफ खान, नित्यानंद तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
यावेळी विविध क्षेत्रात नागपूर शहराची मान उंचावणाऱ्या कर्तबगार मुलांच्या मातांचा सत्कार करण्यात आला. क्रिकेटपटू मोना मेश्राम हिची आई छाया मेश्राम, बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले हिची आई अंजली भाले, आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू निखिलेश तभाने याची आई कल्पना तभाने, धावपटू मोनिका राऊत हिची आई सुलोचना राऊत, यांच्यासह गोदावरी झाडे, रेखा शेलारे, अरुणा गौरखेडे, वंदना अंतूरकर, मृण्मयी घनोटे, अर्चना पारधी, अनुपमा रंभाड या मातांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 
 
याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आई या दोनच अक्षरांमध्ये विश्व सामावले आहे. माणसाच्या जन्मापासून अंतापर्यंत ही अक्षरे तो विसरू शकत नाही. आज आपल्या देशात कुटुंब व्यवस्थेतील संस्कार केवळ आईमुळे टिकून आहेत, म्हणूनच येथील संस्कृतीचा अभ्यास परदेशातील लोक करतात, असे म्हणत त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
 
सृष्टी बारलेवार हिने गायलेल्या “लोरी सुना फिर से” या गाण्याने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या गाण्यानंतर सृष्टीची आई रंगमंचावर आली आणि तिच्यासाठी 'निंबोणीच्या झाडामागे” हे गीत गायले. “एकटी एकटी घाबरलीस ना” आणि “मेरी माँ“ ही दोन गाणी तिने सादर केली. श्रेया खराबे हिने “पास बुलाती है” या गाण्याने एन्ट्री घेतली. त्यानंतर “तू कितनी अच्छी है“, “आई सारखे दैवत” आदी गाणी तिने सादर केली. सुप्रसिद्ध गायक फरहान साबरी आणि झैद अली यांनी आईवर आधारित लोकप्रिय  गाणी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामल देशमुख हिने केले.
 
कार्यक्रमाला जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, मंगळवारी झोन सभापती संगीता गिरे, हनुमान नगर झोन सभापती रुपाली ठाकूर, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका मंगला खेकरे, नेहा वाघमारे, विरंका भिवगड़े, पाटील, शीतल कामडी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, क्रीड़ा निरीक्षक नरेश चौधरी, आदीं उपस्थित होते.

 

 

महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत फुटाळा तलावावर स्वच्छता अभियान- दहाही झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

- तलावातील अतिक्रमण आणि गाळ काढला
 
नागपूर,ता.१२: नागपूरकरांची चौपाटी म्हणून ओळखला जाणाऱ्या फुटाळा तलाव आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. फुटाळा तलावाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करतानाच तलावातील गाळ काढण्यासही या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने प्रारंभ करण्यात आला.
 
मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात सकाळी ७ ते ९ या वेळात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात संपूर्ण दहाही झोनच्या सहायक आयुक्तांसह झोनल अधिकारी व झोनमधील कर्मचारी तसेचग्रीनव्हिजीलफाऊंडेशनचेस्वयंसेवकसहभागी झाले होते. सर्व झोनला फुटाळा तलावालगतचा एक-एक परिसर स्वच्छतेसाठी विभागून देण्यात आला होता. स्वत: झोनच्या सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनात संबंधित झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांना स्वच्छतेसाठी मिळालेला परिसर स्वच्छ केला. आयुक्त वीरेंद्र सिंह आणि महापौर नंदा जिचकार यांनी संपूर्ण परिसराची आणि अभियानाची पाहणी करीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला.
 
दरम्यान आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी अमरावती मार्गाकडील मंदिरापासून बॉटनिकल गार्डनपर्यंत फुटाळा तलावाच्या पाळीवरून चालत अभियानादरम्यान होत असलेल्या स्वच्छतेची पाहणी केली. तलावात साचलेल्या वनस्पतींना कसे काढता येईल, याबाबत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशीचर्चाकेली. यासाठी नीरीची मदत घेता येईल का, याची पडताळणी करा, जसे शक्य आहे ती पद्धत वापरून तलावातील वनस्पती पावसाळ्यापूर्वी काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.फुटाळा चौपाटीवर ठिकठिकाणी कचरा पेटी लावण्यात याव्या. वाढलेल्या झुडपी वनस्पती काढण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
 
यावेळी अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सर्वश्री महेश मोरोणे, राजू भिवगडे, राजेश कराडे, सुभाष जयदेव, प्रकाश वऱ्हाडे, हरिश राऊत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, उद्यान अधीक्षक चोरपगार, नासुप्रचे कनिष्ठ अभियंता पंकज आंबोरकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सुरभी जैस्वाल उपस्थित होत्या. 
 
बॉटल्स, निर्माल्यचा कचरा
 
मनपा आयुक्त वीरेंद्रसिंह यांना पाहणीदरम्यान तलावात प्रचंड प्रमाणात प्लास्टिक आणि काचेच्या बॉटल्स आढळल्या. निर्माल्याने तलाव भिंतीलगतचे पाणी अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त झालेले आढळले. हाकचराकाढण्यालाप्राधान्यक्रमदेण्यातयावा, अशासूचनात्यांनीकेल्या.फुटाळा तलावालगत असलेल्या पाळीवर अनेक नागरिक, युवा, लहान मुले फिरत असतात. याच पाळीवर भिंतीला लागून एक उघडी डीपी आयुक्तांना दिसली. त्यातील वायर बाहेर आलेले होते. आयुक्तांनी तातडीने नासुप्रच्या अभियंत्यांना बोलावून तातडीने नवीन डीपी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
गोठा, पानठेल्याचेअतिक्रमणहटविले
 
या सफाई अभियानादरम्यान तलावाच्या काठावर मंदिराजवळील पाळीवर असलेलेपानठेल्याचे पक्के बांधकाम, तलावात पाणी नसलेल्या भागावर बांधण्यातआलेलागोठा आणि तलावातच असलेली एक झोपडी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी भुईसपाट केली.
 
तलावाचे खोलीकरणही सुरू
 
परिसर स्वच्छतेसोबतच फुटाळा तलावाचे खोलीकरणही सुरू करण्यात आले. आज मंदिराच्या दिशेने हे खोलीकरण सुरू झाले. पाच जेसीबी आणि चार पोकलॅण्डच्या साहाय्याने गाळ काढण्याची प्रक्रिया आयुक्तासमक्ष सुरू करण्यात आली.
 
महापौरांनी वाढविला उत्साह
 
आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाची पाहणी महापौर नंदा जिचकार यांनी केली. त्यांनी स्वत: संपूर्ण फुटाळा परिसराला फेरफटका मारत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. फुटाळाच्या सौंदर्यीकरणासाठी आणि स्वच्छतेसाठी काय मदत हवी ती घ्या पण नियमित स्वच्छता ठेवा, असे त्यांनी सांगितले. यापुढे तलावात निर्माल्य टाकणाऱ्यांवर दंड आकारण्यात येईल, असे फलक लावण्याचे निर्देश महापौरांनी दिले. धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरतीही यावेळी उपस्थित होते.

 

 

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा

उपायुक्त रवींद्र देवतळे यांचे निर्देश : आपत्ती व्यवस्थापनाबाबत घेतला आढावा
 
नागपूर, ता. ११ : पुढील महिन्यात पावसाळा सुरू होतोय. तत्पूर्वी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने झोनस्तरावर काय-काय सोयी हव्यात याबाबतचा अहवाल तातडीने द्या आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश मनपाचे उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, सहायक आयुक्त राजू भिवगडे, महेश मोरोणे, सुभाष जयदेव, राजेश कराडे, प्रकाश वऱ्हाडे, कोठे उपस्थित होते.
 
शहरातील ज्या जुन्या इमारती आहेत, ज्या पडण्याच्या स्थितीत आहे अशा इमारत मालकांना नोटीस देण्यात याव्या, रस्त्यावरील खड्डे ज्यात पाणी साचू शकते असे खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, नादुरुस्त पंप तातडीने दुरुस्त करा, शिक्षण विभागाने शाळा आणि वर्गखोल्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्वरेने उपलब्ध होतील, अशी व्यवस्था ठेवा असे निर्देश उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी दिले. ज्यांची घरे मोडकळीस आली आहे, मुसळधार पावसामुळे ज्या घरांना हानी होऊ शकते, अशी घरे नागरिकांनी तातडीने दुरुस्त करून घ्यावीत, आणीबाणीच्या परिस्थितीत महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष, झोन कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. देवतळे यांनी केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शासनाच्या सर्व विभागांशी समन्वय ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

 

कस्तुरंचद पार्क सौंदर्यीकरणाच्या सुधारित आराखड्याला हेरिटेज समितीची मंजुरी

झिरो माईलची देखभाल व दुरूस्ती मेट्रोरेल्वेला करण्याचे निर्देश
 
नागपूर,ता.११. कस्तुरचंद पार्कच्या सौंदर्यीकरणाच्या सुधारीत आराखड्याला हेरिटेज संवर्धन समितीने तत्वतः मंजुरी प्रदान केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी नगररचना विभागाकडे नकाशे सादर करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.११) मनपा मुख्यालयातील नगररचना विभागात नीरीचे माजी संचालक डॉ.तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली हेरिटेज संवर्धन समितीची बैठक पार पडली.
 
यावेळी समितीचे सदस्य वास्तुविशारद अशोक मोखा, इतिहास विभागाच्या प्र-पाठक डॉ.शोभा जोहरी, स्ट्रक्चरल अभियंता पी.एस.पाटणकर, एलएडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला चक्रदेव, नगररचना विभागाच्या नागपूर वभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, मनपाचे नगररचनाकार श्री. सोनारे, नागपूर मेट्रोरेल्वेचे अतिरिक्त महाप्रबंधक राजीव येलवटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डनवीस, प्रामुख्याने उपस्थित होते.
 
कस्तुरचंद पार्क येथे जनसुविधा अंतर्गत जॉगिंग, वॉकिंग, सायकल ट्रॅक, वृक्षलागवड, हिरवळ इत्यादी कामे करण्याकरिता मनपाच्या प्रकल्प विभागाद्वारे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मागील बैठकीत समितीला दोन वेगवेगळे प्रस्ताव प्राप्त झाल्याने सुधारीत आराखडे पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश समितीने दिले होते. त्यानुसार प्रकल्प विभागाने सुधारीत आराखडे सादर केले. समितीने सर्व बाबी तपासून आराखड्यांना मंजुरी देत पुढील कार्यवाहीकरिता ते नगररचना विभागाकडे पाठविले आहे.
 
झिरो माईल परिसरात नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे ‘हेरिटेज वॉक’ तयार करण्याचा प्रस्ताव या बैठकीत आला. त्याला समितीने मंजुरी प्रदान करीत पुढील बैठकीत त्याचे सादरीकरण करावे, असे सूचित केले. झिरो माईल स्तंभाची व परिसराची देखभाल व दुरूस्ती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने करावी, असे निर्देश समितीने दिले.
 
सेमिनेरी हिल्स परिसरात सेंटर पॉईंट शाळेने हेरिटेज समितीची परवानगी न घेता बांधकाम केले आहे. याबाबत विवेक सिंग यांनी परिसरातील झाडांची आणि पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार समितीकडे  केली. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष डॉ.तपन चक्रवर्ती यांनी डॉ.उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमण्याचे आदेश दिले. या उपसमितीत अशोक मोखा आणि श्री. पाटणकर हे दोन सदस्य म्हणून काम करतील. ही उपसमिती तपास करून योग्य तो निर्णय घेईल, असे श्री. चक्रवर्ती यांनी सांगितले.
 
कस्तुरचंद पार्क येथे ३४ दिवस अमर सर्कस चालविण्यासाठी नीरज घाडगे यांनी प्रस्ताव समितीपुढे सादर केला. उच्च न्यायालयाने दिलेले कस्तुरचंद पार्कच्या वापराबाबतचे निर्देश लक्षात घेता सदर प्रस्तावाला हेरिटेज संवर्धन समितीने नामंजूर केले.

 

 

दहा दिवसात शहरातील सर्व नाले साफ करावे : मनोज चापले

वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीची आढावा बैठक
 
नागपूर,ता.१० : पुढील महिन्यात पावसाळा सुरू होईल. पुढील दहा दिवसात शहरातील सर्व नाले स्वच्छ करण्यात यावे, जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.
 
गुरूवार (ता.१०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीची आढावा बैठक पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य प्रमोद कौरती, लखन येरावार, दिनेश यादव, समिती सदस्या विशाखा बांते, गार्गी चोपरा, वंदना चांदेकर, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी (दवाखाना)डॉ.अनिल चिव्हाने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले, हिवताप व हत्तीरोग विभागाच्या जयश्री थोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
सदर बैठकीत एप्रिल महिन्यात झालेल्या सभेच्या कार्यवाहीला मंजुरी देण्यात आली. शहरातील नाले सफाई व नदी स्वच्छता अभियानाचा झोननिहाय आढावा सभापती चापले यांनी घेतला. शहरात   दहाही झोनचे छोटे मोठे असे एकूण २०४ नाले आहेत. त्यापैकी १३५ नाले हे मनुष्यबळाच्या साहाय्याने स्वच्छ केले जात आहेत. त्यापैकी उर्वरित नाले हे पोकलेंडच्या साहाय्याने स्वच्छ केले जात असल्याची माहिती सर्व झोनल अधिकाऱ्यांनी दिली. यापैकी ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे ३० मे पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन झोनल अधिकाऱ्यांनी दिले.
 
गडरमध्ये आणि विहिरीमध्ये गुदमरून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर काय उपाययोजना करता येईल याकरिता बैठकीत चर्चा करण्यात आली. मनपाद्वारे दोन सक्शन मशीन्स आणि दोन रिसायकलर मशीन्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. आणखी दोन मशीन्स मागविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली. भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डला सातत्याने आग लागत आहे. त्या ठिकाणी विद्युत व्यवस्था, संरक्षक भिंत आणि कायम स्वरूपी एक सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे याचा आढावा यावेळी घेण्यात आला. याबाबतची निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील काही दिवसात कार्यादेश देण्यात येत असल्याची माहिती श्री.दासरवार यांनी दिली. मनपाच्या हद्दीत अवैध मटन,चिकन विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई करण्यात यावी, असे आदेश सभापती चापले यांनी दिले. मुंजे चौकातील नाल्यात मेट्रो रेल्वेने माती टाकल्याने नाली बुजण्याची शक्यता आहे. मनपाच्या उपद्रव प्रतिबंध पथकाद्वारे मेट्रो रेल्वेवर एक लाख रूपयाचा दंड लावण्यात यावा आणि काम त्यांच्याच कंत्राटदाराकडून करून घेण्याचे आदेशही सभापती चापले यांनी दिले. कीटकजन्य रोगावर मनपाने केलेल्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
 
यावेळी स्वास्थ निरिक्षक रोहिदास राठोड, नोडल अधिकारी डॉ.मठपती यांच्यासह मनपाच्या दहाही झोनचे झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

बर्डी-न्यू सोमलवाडा, समतानगर बस फेरी सुरू

नागपूर, ता. ९ :  नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे बर्डी-प्रभूनगर-न्यू सोमलवाडा ही फेरी नव्याने तर बर्डी-समतानगर ह्या फेरीचा विस्तार करण्यात आला आहे.
 
बर्डी-प्रभूनगर-न्यू सोमलवाडा मार्गे नरेंद्र नगर या बस फेरीचे उद्‌घाटन नगरसेविका विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक संदीप गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहन पडोळे, रविकांत चोरघडे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
समता नगर-बर्डी-जेरीन लॉन या बस सेवेचे उद्‌घाटन नगरसेविका वनिता दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर दाते व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
सदर बस फेऱ्यांसाठी मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी पाठपुरावा केला. सदर बस सेवेची मागणी येताच परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी तत्परतेने दखल घेऊन परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी त्यावर कार्यवाही केली. या दोन्ही मार्गावरील बसने नागरिकांनी प्रवास करावा व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

 

 

नागरिकांच्या पाणी समस्या गांभीर्याने घ्या : महापौर

धरमपेठ झोनमध्ये पाणी बैठक : नगरसेवकांनी मांडल्या समस्या
 
नागपूर,ता.९ : पाण्यासंदर्भात  नागरिकांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यासंदर्भात ओसीडब्ल्यूचे अधिकारी दखल घेत नाही. नागरिकांच्या समस्या गांभीर्याने व प्राधन्याने सोडविण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या वतीने झोन निहाय बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी (ता.९) धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांची बैठक झोन कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, उपसभापती श्रद्धा पाठक, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, नगरसेवक अमर बागडे, हरिश ग्वालबंशी, कमलेश चौधरी, नगरसेविका रूतिका मसराम, दर्शनी धवड, उज्ज्वला शर्मा, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, उपअभियंता प्रदीप राजगिरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी झोनअंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या समस्या नगरसेवकांनी महापौरांपुढे मांडल्या. काही प्रभागांमध्ये पाण्याचा दाब कमी असल्याची नगरसेवकांनी तक्रार केली. पाण्याचा प्रवाह नियमित करण्याचे व पाणी वेगाने कसे येईल, याबाबत विचार करून तक्रार तीन दिवसात सोडविण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
प्रभागामध्ये काही ठिकाणी पाण्याचे मीटर लावले आहे आणि काही ठिकाणी लावले नाही, अशी समस्या नगरसेवक कमलेश चौधरी आणि नगरसेविका रूतिका मसराम यांनी केली. याबाबत बोलताना महापौरांनी प्रत्यक्ष ठिकाणी नगरसेवकांसोबत दौरा करून पाहणी करावी, ज्या ठिकाणी मीटर लावणे शिल्लक आहे, त्या ठिकाणी मीटर लावण्यात यावे, असे निर्देश दिले.
 
धरमपेठ, रामदासपेठ या भागातही पाण्याच्या कमी दाबाची समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याची तक्रार संजय बंगाले यांनी केली. त्यावर बोलताना या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, जर पाणी समस्या सोडविल्या नाही तर ओसीडब्ल्यूवर दंड आकारण्यात येईल, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी दिला.
 
यावेळी बैठकीला ओसीडब्ल्यूचे राजेश कारला आणि प्रवीण शरण यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

 

‘मदर्स डे’ला होणार मातांचा सत्कार

मनपाचे आयोजन : ‘आई’ला समर्पित हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम
 
नागपूर,ता.९ : जागतिक मदर्स डेचे निमित्त साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने परिस्थितीवर मात करून मुलांना घडविणाऱ्या तसेच उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही ‘आई’ म्हणून आपली जबाबदारी तेवढ्याच समर्थपणे पार पडणाऱ्या मातांचा सत्कार करण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘आई’ला समर्पित हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमही आयोजित करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती नागेश सहारे यांनी पत्रपरिषदेत दिली.  
 
पत्रपरिषदेला क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, तमन्ना इव्हेंटचे आसीफ खान, नित्यानंद तिवारी उपस्थित होते. ह्या भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन रविवार १३ मे रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेसोबत तमन्ना इव्हेंट ॲण्ड एन्टरटेंमेन्ट यांच्या सहकार्याने पब्लिक रिलेशन ब्रैण्ड बौण्डिंग आयडियाच कंपनी संगीतमय कार्यक्रमाची प्रस्तुती करणार असल्याचे सभापती नागेश सहारे यांनी सांगितले.
 
गीत कार्यक्रमात प्रख्यात पार्श्वगायक बाजीराव मस्तानी व पद्‌मावत फेम फरहान साबरी यांच्यासह राईजिंग स्टार-२ चे जैद अली, नागपूर शहरातील प्रतिभावंत गायिका वॉईस ऑफ इंडिया फेम सृष्टी बार्लेवार  आणि श्रेया खराबे सहभागी होतील. अशी माहिती तमन्ना इव्हेंटस्‌चे आसीफ खान यांनी दिली.
 
सत्कार कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांची प्रमुख उपस्थिती राहील. कार्यक्रम नि:शुल्क असून प्रवेश पत्रिकांकरिता आसीफ खान (मो. ९३७३८०४८८१) ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी केले आहे.

 

 

मनपाच्या परिवहन विभागाचा प्रस्तावित वार्षिक अर्थसंकल्प समितीला सादर

नागपूर,ता.८ : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०१७-१८ चे सुधारीत अर्थसंकल्प आणि सन २०१८-१९ चा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्याकडे सोपविला.
 
सदर अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने परिवहन उपक्रमांसाठी महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यांतर्गत जे-जे स्वतंत्र शीर्ष अर्थसंकल्पामध्ये नियोजित करावयाचे होते त्या सगळ्या बाबींचा प्रामुख्याने ह्या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘शहर परिवहन निधी’ हे शीर्ष परिवहन उपक्रमाच्या परिचलनाकरिता उघडण्यात आलेले आहे. महसुलाच्या जादा शिलकीचा विनियोग करण्याकरिता अंदाजपत्रकात एका स्वतंत्र शीर्षाखाली ‘महसुली राखीव निधी’ या नावाचे स्वतंत्र शीर्ष उघडण्यात आले आहे. ‘परिवहन सुधारणा निधी’ सुद्धा स्थापन करण्यात आले आहे. शैक्षणिक सहल, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी व इतर घटकांना सवलत देण्याकरिता ‘पंडित दीनदयाल उपाध्याय, पथ अंत्योदय योजनेअंतर्गत आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याकरिता ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत स्वतंत्र शीर्ष उघडण्यात आले आहे.
 
चालू अर्थसंकल्पीय वर्षात परिवहन विभागाच्या विकासात व प्रशासकीय कामात गतीमानता आणण्याच्या दृष्टीनेही काही योजना पूर्णत्वास नेण्याचा मानस अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने २५ बायोगॅस व ७० इलेक्ट्रिक ए.सी. बसेस शहर बस सेवेत दाखल करणे, प्रवासी उपलब्धता व आवश्यकतेनुसार शहराच्या जास्तीत जास्त विविध मार्गावर बसेसची सेवा देणे, मनपाच्या विविध जागांवर बस ऑपरेटरकरिता वर्कशॉप व डेपो विकसित करणे, पार्किंगच्या जागा निर्माण करून पार्किंग शुल्क वसुलीद्वारे शहर बस सेवेत होणारी तूट भरून काढणे, शहर बसेसवर तसेच बस स्टॉपवर जाहिरातीसाठी कंत्राट देऊन उत्पन्न घेणे, बस डेपो आणि सर्व बसेसमध्ये संनिरिक्षण प्रणाली (सीसीटीव्ही) निर्माण करणे, महिलांकरिता तेजस्विनी बस सुरू करणे आदींचा यात समावेश आहे.
 
परिवहन विभागाच्या बैठकीला सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, समिती सदस्य सर्वश्री प्रवीण भिसीकर, नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, अभिरुची राजगिरे, अर्चना पाठक, उज्ज्वला शर्मा, मनिषा धावडे, विद्या मडावी, वैशाली रोहणकर, कल्पना कुंभलकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, निगम सचिव हरिश दुबे, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, लेखा अधिकारी भारद्वाज, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, केदारनाथ मिश्रा आदी उपस्थित होते.

 

 

कागदपत्रांची पडताळणी करूनच निर्णय घ्या : प्रवीण दटके

संत्रा मार्केट व खोवा मार्केटमधील परवानेधारकांच्या प्रश्नांबाबत घेतला आढावा
 
नागपूर,ता.८ : संत्रा मार्केट व खोवा मार्केट येथील परावानेधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच निर्णय घेण्यात यावे, असे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.
 
मंगळवारी (ता.८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात संत्रा व खोवा मार्केट येथील परवानेधारकांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल,  अग्निशमन समिती सभापती लहुकमार बेहेते, नगरसेवक संजय बालपांडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, एनईएसएलचे संचालक डॉ. आर.झेड. सिद्दिकी, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, बाजार अधीक्षक मदन सुभेदार, गांधीबाग झोन सहायक आयुक्त अशोक पाटील, सहायक आयुक्त (जाहिरात व बाजार) विजय हुमने प्रामुख्याने उपस्थित होते.
 
संत्रा मार्केटमधील महानगरपालिकेच्या मालकीची काही जागा नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता देण्यात येत आहे. तेथील परवानेधारकांना पर्यायी जागा देण्यात येत आहे. त्यासाठी असोशिएशनमार्फत आलेली पत्रे आणि परवानेधारकांची सूची तपासून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश प्रकल्प समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिले. ही कार्यवाही करीत असताना कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, अशीही सूचना प्रवीण दटके यांनी केली.

 

 

मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केली प्रशासकीय कार्यालयाची आकस्मिक पाहणी

कार्यालय नीटनेटके, परिसर स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे निर्देश
 
नागपूर,ता. ८ : प्रशासकीय इमारतीतील प्रत्येक विभागात स्वच्छता असायलाच हवी. त्यात कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही. कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर यावे. कुठेही अनियमितता आढळून आल्यास विभागप्रमुखांवरच कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिला.
 
मनपा आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर श्री. वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी (ता. ८) मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांना आकस्मिक भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रत्येक विभागाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके,  आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता राजेश रहाटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी आयुक्तांनी प्रारंभी सामान्य प्रशासन विभाग, लेखा व वित्त विभाग, कर संकलन व कर आकारणी विभाग, स्थानीय संस्था कर विभाग (एलबीटी) आणि नगररचना विभागात भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. कामकाज कसे चालते याची माहिती जाणून घेतली. तेथील शौचालये अस्वच्छ असल्याने ते त्वरित स्वच्छ करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. महिन्याच्या अखेरीस वर्कशीट, लॉग रिपोर्टचा गोषवारा व्यवस्थितपणे तयार करण्यात यावा, महत्त्वाची कागदपत्रे फाईल क्रमवार कपाटात ठेवण्यात यावी, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेवर कार्यालयात यावे, दररोज प्राप्त झालेल्या अर्जाचा वेळेवर निपटारा लावा, असे आदेश दिले. पुढच्या पंधरा दिवसात सर्व कागदपत्रे अद्ययावत व सुरळीत करण्यात यावी, असेही आयुक्त यांनी सांगितले.
 
अधिकारी व कर्मचारी यांच्या नावाचे फलक व त्यांच्याकडे असलेले कार्यविवरण हे दर्शनी भागात लावण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. मनपाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नोटीस सूचना भिंतीवर न लावता फलकावर लावण्यात याव्या, अशाही सूचना त्यांनी केल्या. इमारतीत अग्निशमन यंत्रणा सुसज्ज व अद्ययावत करण्याचे व त्याची एक वेळा तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. फाईल्स क्रमवार लावाव्यात. संबंधितांकडून सफाई व स्वच्छता करून घ्यावी. स्वच्छतेच्या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, अशी ताकीद संबंधित विभागप्रमुखांना दिली.
 
त्यानंतर आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांची तातडीची बैठक घेतली. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी कार्यालयात अनुपस्थित कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल घेऊन उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश दिले.

 

 

अवैध नळ कनेक्शन तातडीने वैध करा

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : लक्ष्मीनगर झोनची पाणी बैठक
 
नागपूर,ता.८ : प्रभाग क्र. ३८ मध्ये जयताळा परिसरात असलेले सुमारे ७०० अवैध कनेक्शन तातडीने वैध करा. त्यासाठी परिसरात पुढील पाच दिवसांत विशेष शिबिर लावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या निर्णयानुसार सध्या पाणी समस्येबाबत नगरसेवकांची झोननिहाय बैठक सुरू आहेत. याअंतर्गत मंगळवारी (ता. ८) गायत्रीनगर पाण्याची टाकी येथील कार्यालयात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांची बैठक पार पडली. सदर बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, उपसभापती श्रद्धा पाठक, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक लखन येरावार, नगरसेविका सोनाली कडू, ॲड. मीनाक्षी तेलगोटे, उज्ज्वला बनकर, प्रणिता शहाणे, लक्ष्मी यादव, वनिता दांडेकर, सहायक आयुक्त महेश मोरोणे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड उपस्थित होते.
 
सदर बैठकीत प्रभागनिहाय नगरसेवकांनी पाण्याच्या समस्या मांडल्या. काही भागात पाणी पुरवठा कमी होतो. काही नागरिकांच्या तक्रारी आहेत. जयताळा परिसरात अवैध नळ कनेक्शनमुळे अनावश्यक पाणी जाते. असे कनेक्शन कापण्याबाबत चर्चा झाली तेव्हा नगरसेविका उज्ज्वला बनकर यांनी कनेक्शन कापू नका. नागरिक पैसे द्यायला तयार आहेत. ते कनेक्शन वैध करा, अशी सूचना केली. त्यावर महापौरांनी तातडीने त्या परिसरात ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी शिबिर लावून नळ कनेक्शन वैध करा, असे निर्देश दिले.
 
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, इतर झोनच्या तुलनेत लक्ष्मी नगर झोनमध्ये पाण्याची समस्या कमी आहे. मुबलक पाणी आहे. फक्त नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांच्या तक्रारी येतात. ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे आणि नागरिकांच्या तक्रारींची त्वरित दखल घ्यावी, असे निर्देश दिले. बैठकीला ओसीडब्ल्यूचे अधिकारी राजेश कालरा, अन्य अधिकारी व डेलिगेटस्‌ उपस्थित होते.

 

 

नदी स्वच्छता अभियानाचा थाटात शुभारंभ

महापौर, आमदारांची उपस्थिती : नाग, पोरा, पिवळी नदीच्या स्वच्छतेला सुरुवात
 
नागपूर,ता.७ : नागपूर महानगरपालिकेद्वारे संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत २० जूनपर्यंत राबविण्यात येणाऱ्या नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आज (ता. ७) करण्यात आला. नाग नदी, पिवळी नदी, पोरा नदी या तीनही नद्यांच्या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ विधीवत पूजा करून महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला.
 
नाग नदी
 
आज सकाळी नाग नदी स्वच्छता अभियान शुभारंभाचा मुख्य कार्यक्रम नंदनवन स्थित केडीके महाविद्यालयाजवळील नदी पात्रात झाला. यावेळी माजी महापौर व आमदार प्रा.अनिल सोले, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, माजी महापौर प्रवीण दटके राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, परिवहन समिती सभापती जीतेंद्र (बंटी) कुकडे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, विधी समितीचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम, प्रतोद दिव्या धुरडे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, माजी स्थायी समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक हरिश डिकोंडवार, राजेश घोडपागे, नगरसेविका भारती बुंडे, मनिषा कोठे, मनीषा धावडे, वंदना भगत, समिता चकोले, उज्ज्वला शर्मा, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, माजी अतिरिक्त आयुक्त व एनईएसएलचे संचालक डॉ.आर.झेड.सिद्दिकी, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग)महेश धामेचा, मुख्य अभियंता मनोज तालेवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता सी.जी.धकाते, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, उपअभियंता (नदी, सरोवर व प्रकल्प) मोहम्मद इजराईल, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त राजेश कराडे, लकडगंज झोन सहायक आयुक्त सुभाष जयदेव, ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, सर्पमित्र विश्वजीत उके, रामसागर डंभारे, विशाल डंभारे  प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पोरा नदी
 
पोरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सहकार नगर घाटाजवळील पोरा नदी पात्रात झाला. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त वीरेंद्र सिंह, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती लहुकुमार बेहेते, नगरसेवक संदीप गवई, किशोर वानखेडे, नगरसेविका सोनाली कडू, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, वनिता दांडेकर, पल्लवी शामकुळे, लता काडगाये, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर आदी उपस्थित होते.
 
पिवळी नदी
 
जुना कामठी रोड नाका, कळमना वस्ती येथील पिवळी नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आमदार प्रा.अनिल सोले व उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी जेसीबीची विधीवत पूजा करून पिवळी नदी स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी एक जेसीबी, एक पोकलेंड, एक टिप्पर मशीन्सच्या साहाय्याने आणि २५ कर्मचारी मनुष्यबळाद्वारे पिवळी नदी स्वच्छतेचे कार्य होणार आहे. यावेळी सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, नगरसेवक शेषराव गोतमारे, गोपीचंद कुमरे, संजय चावरे, नगरसेविका भाग्यश्री कानतोडे, मनीषा अतकरे, निरंजना पाटील, नगरसेवक राजकुमार शाहू, माजी अपर आयुक्त व एनईएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आर.झेड. सिद्दीकी, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, मोहम्मद इजराईल, गणेश कानतोडे, आरोग्य झोनल अधिकारी राजीव राजुरकर, उपअभियंता रमेश कोहाडे, नीळकंठ अंबादरे, आशीष कुंभारे, खेमराज पारधी, रोझी परवीन शेख यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी २५ सफाई कामगार या कार्यात सहभागी होते.  
 
महापालिकेने १५ टप्प्यात या कामाची आखणी केली असून प्रत्येक टप्प्याचा प्रमुख अधिकारी नेमण्यात आलेला आहे. मागील वर्षी तिन्ही नदी मिळून सुमारे ७२ हजार टन माती आणि गाळ काढण्यात आला होता. यावर्षीही यापेक्षा जास्त गाळ व माती काढण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, ओसीडब्ल्यू, नागपूर मेट्रो रेल्वे, डब्ल्यूसीएल, नासुप्र ह्या संस्था नदी स्वच्छता मोहिमेला लागणारी यंत्रसामुग्री, उपकरणे महापालिकेला उपलब्ध करून देणार आहे.
 
नदीतून निघणारा गाळ व माती भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये जमा करण्यात येणार आहे. नदीतून निघाणारा गाळ व माती तिथेच साचू न देता लगेच त्याची विल्हेवाट करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली.

 

 

वाढत्या उन्हापासून बचावासाठी जनजागृतीची व्यापकता वाढवा : महापौर

‘हिट ॲक्शन प्लान’चा घेतला आढावा : काळजी घेण्याचे आवाहन
 
नागपूर,ता.७ : नागपुरात उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हापासून बचावासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे जनजागृती सुरू आहे. त्याची व्यापकता वाढवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
उन्हापासून बचावासाठी आणि आरोग्यावर परिणाम पडू नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत गेल्या काही वर्षांपासून नागपुरात ‘हिट ॲक्शन प्लान’ राबविण्यात येत आहे. मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी आता उन्हाची तीव्रता वाढली आहे. आता जनजागृतीची खरी गरज आहे. त्यामुळे हिट ॲक्शन प्लान अंतर्गत सध्या काय सुरू आहे, याचा आढावा घेण्यासाठी महापौर कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महापौर नंदा जिचकार यांच्यासह स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी व संबंधित झोनचे झोनल आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
 
‘हिट ॲक्शन प्लान’ अंतर्